Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 30 September 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक –३० सप्टेंबर २०१९ सकाळी ७.१० मि.
****
v विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या ५१ उमेदवारांची घोषणा; २३ विद्यमान आमदारांना पुन्हा संधी;
१८ नवीन चेहरे; माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, अमित
देशमुख, सुरेश वरपूडकर आणि डॉक्टर कल्याण काळे यांचा समावेश
v भारतीय जनता पक्ष-
शिवसेना युतीच्या जागा निश्चित; आज किंवा उद्या घोषणा होण्याची शक्यता; शिवसेनेनं विद्यमान
आमदारांना दिले एबी फार्म
v दर नियंत्रणासाठी सर्व प्रकारच्या कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा
केंद्र सरकारचा निर्णय
v मुलींच्या
सन्मानार्थ कार्यक्रमांचं आयोजन करून, त्यांचं स्वागत करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन
आणि
v एक लाख रुपयांची लाच घेताना पैठणचा तहसिलदार महेश सावंतला अटक
****
काँग्रेस पक्षानं राज्य विधानसभा निवडणुकीसाठी काल
५१ उमेदवारांची पहिली यादी घोषित केली. यात नांदेड जिल्ह्यातल्या भोकर मतदारसंघातून
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली. नांदेड उत्तरमधून डी.पी.
सावंत, नायगाव- वसंतराव चव्हाण, देगलूर- रावसाहेब अंतापूरकर, हिंगोली जिल्ह्यातल्या
कळमनुरीतुन - संतोष टारफे, परभणी जिल्ह्यातल्या पाथरीतून सुरेश वरपुडकर, औरंगाबाद जिल्ह्यातल्या फुलंब्रीतून
डॉक्टर कल्याण काळे, लातूर जिल्ह्यातल्या लातूर शहर मतदारसंघात अमित देशमुख, निलंगा
-अशोक पाटील निलंगेकर, औसा- बसवराज पाटील, उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूरमधून आमदार
मधुकरराव चौधरी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय संगमनेरमधून प्रदेशाध्यक्ष
बाळासाहेब थोरात, ब्रम्हपुरीतून विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, नागपूर
उत्तर माजी मंत्री -नितीन राऊत, धारावी -वर्षा गायकवाड, सोलापूर मध्य- प्रणिती शिंदे,
पलुस-कडेगावमधून विश्वजीत कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पहिल्या यादीत काँग्रेसनं
२३
विद्यमान आमदारांना पुन्हा संधी दिली आहे
तर यादीत १८ नवीन चेहऱ्यांचा समावेश आहे. याशिवाय काही माजी आमदारांनाही पुन्हा संधी देण्यात आली आहे.
आम आदमी पक्षानंही काल आणखी सात उमेदवारांची घोषणा
केली. यात जालन्यातून कैलास फुलारी यांच्यासह ठाणे, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातल्या
उमेदवारांचा समावेश आहे.
****
महाराष्ट्र आणि हरियाणातल्या विधानसभा निवडणुकीसाठी
उमेदवार निश्चित करण्याकरता भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत काल दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत शिवसेनेसोबतच्या
युतीसाठी जागा निश्चितीचं धोरणही ठरवण्यात आलं आहे. दोन्ही पक्षाच्या युतीची आज किंवा
उद्या घोषणा होण्याची शक्यता आहे. शिवसेनेला जवळपास सव्वाशे जागा सोडण्याचा निर्णय
घेण्यात आला असून राज्यात विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली
ही निवडणूक लढवण्याबाबत निर्णय झाला असल्याचं सूत्रानं सांगितलं.
दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जवळपास सर्वच विद्यमान आमदारांना काल मुंबईत उमेदवारीसाठी आवश्यक असलेले एबी फॉर्म वाटप केले. यात औरंगाबाद पश्चिममधून संजय शिरसाठ, पैठण- संदीपान
भुमरे, जालन्यातून राज्यमंत्री अर्जुन खोतकर, हिंगोलीतून संतोष बांगर, उमरग्यामधून ज्ञानराज चौगुले, आणि वाशिममधून विश्वनाथ सानप यांचा समावेश आहे.
****
सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला विधानसभा मतदारसंघासाठी
शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून भाऊसाहेब रूपनर यांच्या नावाची घोषणा
काल आमदार गणपतराव देशमुख आणि पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी केली. गेल्या
५० वर्षापासून हा मतदारसंघ शेतकरी कामगार पक्षाच्या ताब्यात आहे. सलग ११ वेळा आमदार
गणपतराव देशमुख यांनी या मतदारसंघाचं विधानसभेत प्रतिनिधित्व केलं आहे.
****
कांद्याचे वाढते दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र
सरकारनं सर्व प्रकारच्या कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. ही बंदी तात्काळ प्रभावानं
लागू झाली आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयानं कांद्याच्या निर्यातीवरच्या बंदीबाबतच्या
धोरणात दुरुस्ती करुन हा निर्णय घेतला. त्याआधी, कांद्याच्या उपलब्धतेचा नेमका अंदाज
यावा, तसंच बाजारात आणखी कांदा आणण्याबाबत शेतकरी, व्यापारी आणि निर्यातदारांना तयार
करता यावं, यासाठी सरकारनं संयुक्त सचिव दर्जाच्या दोन अधिकाऱ्यांना त्यांच्याशी चर्चा
करण्याकरता महाराष्ट्रात पाठवलं होतं. केंद्र सरकार राज्यांच्या मागणीनुसार त्यांना
कांद्याचा पुरवठा करत आहे. सरकार कांद्याची मागणी भागवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करेल,
असं अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री राम विलास पासवान यांनी सांगितलं.
****
मुलींच्या सन्मानार्थ कार्यक्रमांचं आयोजन करून,
नव्या पद्धतीनं त्यांचं स्वागत करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमात ते काल बोलत होते. या श्रृंखलेचा सत्तावन्नावा
भाग काल प्रसारित झाला. आपल्या संस्कृतीमध्ये मुलींना लक्ष्मी मानलं गेलं आहे. त्यामुळे
येत्या दिवाळीत गावांमध्ये आणि शहरांमध्ये मुलींच्या सन्मानार्थ विविध कार्यक्रमांचं
आयोजन करावं, त्याचबरोबर आपल्या मुलींच्या यशाबद्दल सामाजिक माध्यमातून अधिकाधिक माहिती
शेअर करावी, यासाठी ‘भारत की लक्ष्मी’ या हॅशटॅगचा वापर करण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी
केलं. सध्या देशभरात सुरू झालेल्या नवरात्र, गरबा, दुर्गापूजा आणि येणाऱ्या दसरा, दिवाळी,
भाऊबीज, छठपूजा अशा सर्व सणांनिमित्त पंतप्रधानांनी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या.
दोन ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या एकवेळ उपयोगात येणाऱ्या
प्लास्टिक मुक्ती मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहनही पंतप्रधानांनी यावेळी केलं.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या
औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
खरेदी केलेली कुळाची जमिन परत मिळण्याच्या मूळ मालकाच्यावतीनं
दाखल झालेल्या प्रकरणात, तक्रारदाराच्या बाजूनं निकाल देण्यासाठी एक
लाख रुपयांची लाच घेताना औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठणचे तहसिलदार महेश सावंत यांच्यासह
तिघाजणांना काल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी अटक केली. विधिज्ञ कैलास सोपान
लिपणे पाटील आणि बद्रीनाथ कडूबा भवर अशी अन्य दोघांची नावं आहेत. तहसिलदारानं सावंत
यांनी तक्रारदाराच्या बाजूनं निकाल देण्याकरता लिपणे यांच्या मार्फत ३० लाख रूपयांची
लाच मागितली होती. या लाचेचा पहिला हप्ता भवर मार्फत स्वीकारताना काल या तिघांना पकडण्यात
आलं.
****
शारदीय नवरात्रोत्सवाला काल उत्साहात सुरुवात झाली.
उत्सवाचा पहिलाच दिवस पर्यटक आणि भाविकांनी देवीच्या सर्वच ठिकाणच्या मंदिरांमध्ये
दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. देवीच्या महाराष्ट्रातल्या साडेतीन शक्तिपीठांपैकी
एक असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरात संबळ-तुतारीच्या
निनादात आणि आई राजा उदे उदेच्या जयघोषात जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्या हस्ते
घटस्थापना करण्यात आली.
नांदेड जिल्ह्यातल्या माहूर गडावरील रेणुका मातेच्या,
तसंच बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई इथल्या योगेश्वरी देवीच्या उत्सवालाही काल मोठ्या
उत्साहात प्रारंभ झाला. कोल्हापूर इथं महालक्ष्मीच्या मंदिरात सकाळी साडे आठ वाजता
तोफेची सलामी देत देवीच्या मंदिरात घटस्थापना करण्यात आली. परभणी जिल्ह्यातही नवरात्रोत्सवाला
पारंपारिक पद्धतीनं सुरुवात झाली.
औरंगाबाद शहरात कर्णपुरा देवीच्या मंदिरात काल पहाटे
महापूजा, आरती आणि घटस्थापना करण्यात आली.
****
नवरात्र महोत्सवानिमित्त पंढरपूर इथल्या विठ्ठल-रुक्मिणी
मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. रुक्मिणी मंदिरात फुलांची,
तर विठ्ठल मंदिरात तुळशीच्या पानांची आरास करण्यात आली आहे. चौथ्या माळेला रुक्मिणीला
फुलांची साडी, तर दसऱ्याच्या दिवशी सोन्याची साडीने सजवण्यात येणार असल्याची माहिती
मंदिर प्रशासनाचे प्रभारी अधिकारी गजानन गुरव आणि व्यवस्थापक बालाजी गुरव यांनी दिली.
****
तुळजापूरच्या तुळजाभवानीसाठीचा अहमदनगर जिल्ह्यातल्या
निंबलक येथून पलंग पाठवण्याची अनेक वर्षाची परंपरा आहे. काल या पलंगाचं प्रस्थान झालं
असून, अहमदनगर शहरातून वाजत गाजत मिरवणूक काढून हा पलंग तुळजापूरकडे मार्गस्थ झाला.
****
काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री अशोक
चव्हाण यांनी काल नांदेड जिल्ह्यातल्या
भोकर इथं प्रचार फेरी काढून शक्ती प्रदर्शन केलं. या फेरीत आमदार अमिता चव्हाण,
आमदार अमर राजूरकर सहभागी झाले होते. नवरात्र महोत्सवाच्या पहिल्या
दिवशी त्यांनी सहकुटुंब माहूर इथं जाऊन रेणुकामातेचं दर्शन घेतलं. त्यानंतर भोकर इथं येऊन कालपासून प्रचाराला प्रारंभ केला.
दरम्यान, चव्हाण हे आज भोकर विधानसभा मतदारसंघातून
उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
****
साहित्यिकांना आपल्या साहित्याबद्दल ममत्व असणं ही
बाब घातक असल्याचं मत ज्येष्ठ साहित्यिक, चित्रकार भ. मा. परसवाळे यांनी व्यक्त केलं आहे. हिंगोली
इथं झालेल्या मराठवाडा साहित्य परिषदेच्या ७६वा वर्धापन दिन सोहळ्यात ते काल बोलत होते.
निरपेक्ष बुद्धीनं साहित्याची निर्मिती होणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले. यावेळी मराठवाडा
साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, कार्यवाह डॉक्टर दादा गोरे, कोषाध्यक्ष
कुंडलिकराव अतकरे, समीक्षक-विचारवंत ऋषिकेश कांबळे, माजी प्राचार्य जे. एम. मंत्री
यांची उपस्थित होती.
****
परभणी शहरातल्या खंडोबा बाजार इथल्या जलकुंभ परिसरातली
मुख्य जलवाहिनी फुटल्यानं पाणी वितरण व्यवस्था खोळंबली आहे. जलवाहिनी दुरुस्त करण्याचं
काम युद्धपातळीवर सुरु असून, शहरात दोन दिवस पाणी पुरवठा होणार नसल्याची माहिती महापालिकेचे
शहर अभियंता वसीम पठाण यांनी दिली.
****
नांदेड जिल्ह्यात जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून गरोदर महिलांसाठी 'दुर्गा बाळ गणेश महोत्सव' साजरा करण्यात येत आहे. गरोदर माता आणि नवजात शिशुंचं आरोग्य उत्तम राहण्यासाठी
हा उपक्रम राबवण्यात येत असून, याअंतर्गत महिलांना आरोग्य, आहारासंबंधी मार्गदर्शन
करण्यात येणार आहे. जिल्ह्यातल्या १६ ग्रामिण आणि आदिवासी
प्रकल्पांतून ९० अंगणवाडी पर्यवेक्षिकांमार्फत २७० अंगणवाडी केंद्रातल्या दोन हजार
२४७ गरोदर महिलांसाठी प्रायोगिक तत्वावर हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
*****
***
No comments:
Post a Comment