Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 27 September 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक –२७ सप्टेंबर २०१९ सकाळी ७.१० मि.
****
** राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आजपासून अर्ज दाखल करता येणार
** विधानसभा
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय
जनता पक्षाच्या राज्य प्रतिनिधींची पक्षाध्यक्ष अमित शहा सोबत चर्चा तर काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या
बैठकीत १०० उमेदवारांची नाव निश्चित
** राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष
शरद पवार आज दुपारी मुंबईत सक्तवसुली संचालनालयाच्या कार्यालयात जाणार
आणि
** राज्यात पावसामुळे विविध भागात झालेल्या
दुर्घटनेत ३० बळी
****
राज्य विधानसभा निवडणुकीची अधिसूचना आज जारी होणार आहे. आजपासून
४ ऑक्टोरपर्यंत उमेदवारांना
नामनिर्देशनपत्र सादर करता येणार आहे. पाच ऑक्टोबरला अर्जांची छाननी होईल तर सात ऑक्टोबरपर्यंत अर्ज
मागे घेता येणार आहेत. एकवीस ऑक्टोबरला मतदान तर चोवीस ऑक्टोबर मतमोजणी होणार आहे.
****
भारतीय
जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी काल नवी दिल्लीत आगामी राज्य विधानसभा
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य प्रतिनिधींची बैठक घेतली. निवडणुकीच्या रणनितीवर
यावेळी चर्चा करण्यात आली. पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह अन्य
नेते या बैठकीला उपस्थित होते.
****
काँग्रेस पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या
काल झालेल्या बैठकीत राज्य विधानसभा निवडणुकीच्या १०० उमेदवारांची नाव निश्चित झाली
असल्याचं सूत्रानं सांगितलं. यापूर्वी झालेल्या बैठकीत साठ उमेदवारांची यादी अंतिम
करण्यात आली होती, असं सूत्रानं सांगितलं. छाननी समितीनं ४५ नावांची शिफारस केली होती,
त्यापैकी ३२ नावांना बैठकीत मंजुरी देण्यात आल्याचं प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष
बाळासाहेब थोरात यांनी बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं.
एकूण २८८ सदस्य संख्या असलेल्या विधानसभेसाठी
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रत्येकी १२५ जागा लढवत असून उर्वरीत ३८ जागा
मित्र पक्षांना सोडण्यात आल्या आहेत.
****
शेतकरी संघटना आणि स्वतंत्र भारत पक्षानं विधानसभा निवडणुकीसाठी
घोषित केलेल्या पहिल्या यादीत
औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर मतदार संघातून सीताराम उगले, पैठण - त्र्यंबक जाधव,
जालना - प्रताप लहाने, घनसावंगी - अप्पासाहेब कदम, माजलगाव - अशोक नरवडे, नागपूर -
अरुण केदार तर माजी आमदार वामनराव चटप यांना चंद्रपूर जिल्ह्यातल्या राजुरा मतदार संघातून
उमेदवारी दिली आहे.
****
सांगलीचे धनगर समाजाचे नेते गोपीचंद
पडळकर यांनी वंचित आघाडी सोडण्याचा तर स्वाभिमानी शेतकरी
संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकरी यांनीही पक्ष सोडण्याचा काल निर्णय जाहीर केला. हे दोघेही भाजपमध्ये जाण्याची
शक्यता वर्तवण्यात येत आहे.
****
राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष
शरद पवार यांच्याविरूद्ध गुन्हा नोंदवल्यानंतर ते आज दुपारी मुंबईत सक्तवसुली संचालनालय
- ईडीच्या कार्यालयात जाणार आहेत. पक्ष कार्यकर्त्यांनी
ईडीच्या कार्यालय परीसरात जमा होऊ नये, असं आवाहन पवार यांनी केलं आहे. मात्र ईडीनं आतापर्यंत पवार किंवा अन्य
कोणालाही या प्रकरणी चौकशीसाठी बोलावलेलं नाही. पोलिसांनी ईडी कार्यालयाच्या परिसरात
जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत.
दरम्यान, काल
दुसऱ्या दिवशीही या घटनेचे पडसाद राज्यात उमटले. या घटनेच्या निषेधार्थ औरंगाबाद आणि परभणी जिल्हा बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. शहरातल्या विविध भागासह
सिल्लोड, कन्नड, पैठण, गंगापूर, वैजापूर या तालुक्यातही काही भागात बंद पाळण्यात आला.
औरंगाबाद शहरात निदर्शनंही करण्यात आली. नांदेड जिल्ह्यातल्या भोकर फाटा इथं काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या
वतीनं रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं.
दरम्यान,
राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्या प्रकरणी
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. अहमदनगर जिल्ह्यात
राळेगण सिद्धी इथं वार्ताहरांशी बोलतांना त्यांनी शिखर बँक घोटाळ्या संदर्भातल्या जवळपास
वीस चौकशी अहवालात पवार यांचं नाव कुठेही नसल्याचं सांगितलं. जे दोषी नाहीत त्यांना
विनाकारण अडकवू नये, असं मत हजारे यांनी व्यक्त केलं.
****
‘मन की
बात' या आकाशवाणीवरुन प्रसारित होणाऱ्या कार्यक्रम श्रृंखलेत पंतप्रधान नरेंद्र मोदी
येत्या रविवारी सकाळी ११ वाजता देशविदेशातल्या नागरिकांशी संवाद साधणार आहेत. मन की
बात या कार्यक्रम मालिकेचा हा सत्तावन्नावा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व
केंद्रावरुन तसंच डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट एआर आय डॉट कॉम या संकेतस्थळावरुन या
कार्यक्रमाचं प्रसारण होईल.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित
केलं जात आहे.
****
मराठवाड्यासह
राज्यात कालही अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे
राज्यात ३० जणांचा मृत्यू झाला.
औरंगाबाद
शहरातही काल जोरदार पाऊस झाला.
जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्यानं पाण्याची
आवक वाढली असून, नागमठाण आणि नांदूर मधमेश्वर धरणातून सुमारे ६० हजार घनफूट प्रतिसेकंद
वेगानं पाणी दाखल होत आहे. यामुळे
जायकवाडी धरणाचे १२ दरवाजे अडीच फुटानं तर चार दरवाजे तीन फुट उघडण्यात आले
आहेत. सध्या धरणातून ४५ हजार ६०५ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी गोदावरी पात्रात सोडण्यात
येत असल्याचं जायकवाडी पाटबंधारे विभागानं कळवलं आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या भंडारदरा, निळवंडे, ओझर आणि
मुळा या धरणांतूनही पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत असल्यामुळे जायकवाडी धरणातून
आणखी पाणी सोडण्यात येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनानं गोदाकाठच्या
गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नाशिक जिल्ह्यातही पावसामुळे, दोन दिवसात पाच जणांचे बळी गेले.
नाशिकच्या गंगापूर धरणातून काल दोन हजार २०० फूट प्रतिसेकंद वेगानं पाणी नदीपात्रात
सोडण्यात आलं.
मुंबई,
नवी मुंबई, शहरातही काल पाऊस झाला. पुणे शहरात झालेल्या अतिवृष्टीत आतापर्यंत १८ जणांचा
मृत्यू झाला, तर ६१ जनावरं दगावली. सखल भागात पाणी साचल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं
आहे. लष्कर, राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक आणि स्थानिक प्रशासनानं आतापर्यंत ५७५ जणांना
सुरक्षित स्थळी हलवलं आहे.
धुळे शहरात
काल संध्याकाळनंतर जोरदार पाऊस झाला. जळगाव जिल्ह्यातल्या भवरखेडे इथं वीज पडून पाच
जणांचा मृत्यू झाला.
लातूर
जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात पडलेल्या
पावसामुळे उदगीर तालुक्यातल्या हाळी जवळील नदीला चांगलं पाणी आलं. औसा तालुक्यात सुद्धा
जोरदार पाऊस झाल्यामुळे काही शेताचे बांध फुटले असून कोथिंबर उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान
झालं आहे. मात्र लातूरला
पाणी पुरवठा होत असलेलं मांजरा धरण अद्यापही कोरडं आहे.
जालना
जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातल्या तडेगाव इथले दोन युवक काल पूर्णा नदीत वाहून गेले.
कचरु गोफणे आणि नासेर नबी सय्यद अशी त्यांची नावं असून, हे दोघे काल दुपारी बैल धुण्यासाठी
नदीत उतरले असता, ही घटना घडली.
****
चंद्रपूर
- नागपूर रस्त्यावर जांब
जवळ काल माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांच्या ताफ्यातल्या एका गाडीला अपघात होऊन दोन जणांचा मृत्यू झाला,
ता अन्य पाच जण जखमी झाले.
****
सोलापूर विभागात धावणाऱ्या अधिकच्या
मालगाड्यांमुळे निझामाबाद ते पंढरपूर आणि पुणे ते निझामाबाद प्रवासी रेल्वेगाडी तीन महिन्यापर्यंत रद्द करण्यात आली आहे. तसंच याच कालावधीत नांदेड ते दौंड प्रवासी रेल्वेगाडी
कोपरगावपर्यंतच धावणार असल्याचं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क
कार्यालयानं कळवलं आहे.
****
परभणी जिल्ह्याच्या सोनपेठ तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी
नदीकाठच्या रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था झाली असून, रस्ता दुरुस्तीसाठी सात गावांनी
काल घेतलेल्या महापंचायतीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकून सर्वच
उमेदवारांना गावबंदीचा निर्णय घेतला आहे. सोनपेठ तालुक्यातल्या गोदावरी काठच्या अकरा
गावांच्या रस्त्यांचा दळणवळणाचा गंभीर प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित आहे.
****
No comments:
Post a Comment