Regional Marathi
Text Bulletin, Aurangabad
Date – 28
September 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ सप्टेंबर २०१९ दुपारी १.०० वा.
****
स्कॉर्पिन श्रेणीतली दुसरी पाणबुडी आय एन एस खांदेरीचं
आज मुंबईत माझगाव डॉक इथं संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते जलावतरण झालं. पाणबुडीची
निर्मिती करणाऱ्या काही मोजक्या देशांमध्ये भारताची ओळख असणं, ही अत्यंत अभिमानाची
बाब असल्याचं संरक्षणमंत्री यावेळी म्हणाले. किनारपट्टीलगतच्या प्रदेशांवर मुंबईवरच्या
२६/११ सारखा हल्ला करायच्या तयारीत काही विघातक शक्ती आहेत मात्र त्यांचे हे मनसुबे
धुळीला मिळवले जातील असं त्यांनी सांगितलं. सशस्त्र सेनेला जास्तीत जास्त मजबूत करण्यावर
केंद्रसरकारचा भर असल्याची माहिती त्यांनी
दिली. आय एन एस खांदेरी या पाणबुडीमुळे भारतीय नौदल अधिक सक्षम झालं आहे, याची जाणीव
पाकिस्तानला व्हायला हवी, असं सांगून, देशातल्या
शांततेचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला. पाकिस्तानचे पंतप्रधान
पाठिंब्यासाठी दारोदार फिरून स्वतःच हसं करून घेत आहेत, असंही राजनाथ सिंह यांनी यावेळी
म्हटलं.
****
ग्रामीण भागात शाश्वत उपजीविकेची साधनं असावीत आणि
खेडी स्वयंपूर्ण व्हावीत, यादृष्टीनं रोजगारांचं विकेंद्रीकरण व्हायला हवं, असं मत
केंद्रीय ग्रामविकासमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी व्यक्त केलं आहे. हैदराबाद इथं
झालेल्या ग्रामीण संशोधक स्टार्ट-अप परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यात, ते काल बोलत होते.
शेतकऱ्यांची प्रगती आणि ग्रामविकासाकरता, केंद्र सरकार अनेक उपाय योजना राबवत आहे,
असं ते म्हणाले. तरुणांमधले अभिनव कल्पनांचे जनक नवाभारताच्या उभारणीत महत्त्वपूर्ण
घटक ठरतील, असं त्यांनी सांगितलं. ग्रामीण भागाच्या परिवर्तनासाठी युवावर्गानं केंद्रसरकारच्या
विविध योजनांचा लाभ घेऊन उद्योजक व्हावं, असं आवाहन तोमर यांनी यावेळी केलं.
****
भारत, फ्रान्स, ब्रिटन,दक्षिण आफ्रिका, कॅनडा यांच्यासह
वीस देशांनी ऑनलाईन माध्यमातून होत असलेल्या खोट्या बातम्यांच्या प्रसारा विरोधातल्या
करारावर काल स्वाक्षऱ्या केल्या. या कराराअंतर्गत माध्यमांचं स्वांतत्र्य अबाधित राहावं
यासाठी निरीक्षक म्हणून काम पाहणाऱ्या `रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स` या गटाची स्थापना
करायला या सर्व देशांनी एकमतानं मंजुरी दिली.
****
भारतरत्न लता मंगेशकर आज नव्वदावा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांनी आपल्या पार्श्वगायनाच्या कारकिर्दीत दादासाहेब फाळके पुरस्कार मिळवला आहे.
लता मंगेशकर यांनी छत्तीसपेक्षा जास्त भारतीय आणि प्रादेशिक भाषांमध्ये गाणी गायचा विक्रम केला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या संदेशाद्वारे त्यांना निरोगी आणि आनंदी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. केंद्रिय गृहमंत्री
अमित शहा यांनी काल संध्याकाळी प्रसिद्ध छायाचित्रकार गौतम राजाध्यक्ष
यांनी काढलेल्या लता मंगेशकर यांच्या छायाचित्रांच्या संकलनाचं लोकार्पण केलं. लता दीदींनी आपल्या मधुर आवाजानं आणि सौम्यतेनं सर्व देशवासीयांना केवळ मंत्रमुग्ध केलं नाही तर संपूर्ण जगामध्ये देशाचा अभिमानही वाढविला
असल्याचं शाह यांनी त्यांना शुभेच्छा देताना म्हटलं आहे.
****
शिवसेना भाजप युतीतल्या जागा वाटपाला विलंब होत असल्याच्या
पार्श्वभूमीवर शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे मुंबईत कार्यकर्त्यांची एक बैठक घेऊन संबोधित
करत आहेत. या बैठकीत शिवसेनेचे प्रमुख नेते, पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवार उपस्थित
आहेत. जिल्हा आणि तालुका स्तरावरचे पदाधिकारी आणि उमेदवारी देण्यासाठी मुलाखत दिलेल्या
कार्यकर्त्यांचाही या बैठकीत सहभाग आहे.
****
काँग्रेस पक्ष पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक-पीएमसी
बँकेवर रिझर्व बँक ऑफ इंडियानं ग्राहकांच्या बँकेतील रक्कम काढण्यावर लावलेल्या निर्बंधांविरूद्ध
न्यायालयात दाद मागणार आहे. काँग्रेस पक्षाचे मुंबई अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी ही
माहिती दिली आहे. काँग्रेसच्या शिष्टमंडळानं पीएमसी बँकेच्या सोळा लाख खातेधारकांच्या अडचणी दूर करण्याच्या दृष्टीनं रिझर्व बँकेच्या
गवर्नरना भेटण्यासाठी वेळ मागितली होती परंतु त्याना परवानगी मिळाली नाही, असंही गायकवाड यांनी म्हटलं
आहे.
****
नांदेड जिल्ह्यात परतीचा पाऊस चांगला होत असून, जिल्ह्यातली
बारुळ आणि मनार ही दोन धरणं पूर्ण भरली आहेत. या पावसाचा सोयाबीन कापणीवर विपरीत परिणाम
होत आहे.
दरम्यान, औरंगाबाद शहरात
काल मध्यरात्रीच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला.
****
पुणे परिसरात पुरामुळे किंवा पावसामुळे झालेल्या
दुर्घटनांमधे मरण पावलेल्यांची संख्या आता एकवीस झाली आहे, आणखी पाच जण अद्याप बेपत्ता
आहेत. पोलीसांनी काल संध्याकाळी ही माहिती दिली. पुणे शहरात पंधरा जण तर ग्रामीण भागात
सहा जण पुरामुळे किंवा पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमधे मृत्युमुखी पडले.
*****
***
No comments:
Post a Comment