Monday, 23 September 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 23.09.2019 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date –23 September 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २३ सप्टेंबर २०१ सायंकाळी ६.००
****
यंदाच्या खरीप हंगामात देशभरात अन्नधान्य उत्पादनात घट होण्याची शक्यता केंद्र सरकारनं वर्तवली आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयानं जारी केलेल्या माहितीनुसार गेल्यावर्षी अन्नधान्याचं उत्पादन एकशे एक्केचाळीस पूर्णांक एक्काहत्तर शतांश टक्के एवढं झालं होतं, यंदा मात्र हे प्रमाण एकशे चाळीस पूर्णांक सत्तावन्न मेट्रिक टनांपर्यंत राहण्याचा अंदाज कृषी मंत्रालयानं वर्तवला आहे. यंदा तांदळाचं उत्पादन शंभर दशलक्ष टन, कडधान्य आठ पूर्णांक तेवीस शतांश दशलक्ष टन, भरड धान्य बत्तीस दशलक्ष टन, तर कपाशीचं बत्तीस पूर्णांक सत्तावीस दशलक्ष गाठी एवढं उत्पादन होण्याची शक्यता आहे.
****
आयुषमान योजनेला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं देशभरात आज आयुषमान दिवस साजरा केला जात आहे. आयुषमान भारत ही योजना जगभरात सर्वात मोठी सरकारी आरोग्य योजना असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे. या योजनेच्या माध्यमातून आरोग्य सेवांची गुणवत्ता वाढवण्यासाठी पावलं उचलली जात असल्याचं योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रभूषण यांनी आकाशवाणीला सांगितलं.
****
काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचा संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितलं आहे. ते मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा आज प्रसिद्ध होणार होता, मात्र घटक पक्षांनी आग्रह केल्यामुळे एकत्रितपणेच जाहिरनामा प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचं मलिक यांनी स्पष्ट केलं. आर्थिक मंदी, बेरोजगारी, काश्मीर आणि कलम ३७० आदी मुद्यांवरून मलिक यांनी सरकारच्या धोरणांवर टीका केली.
****
अहमदनगर जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत अकोले इथल्या बाजारतळावर हा पक्षप्रवेश कार्यक्रम झाला. जिल्हा परिषद सदस्य डॉ. किरण लहामटे, सुनीता भांगरे, आदिवासी नेते अशोक भांगरे यांच्यासह अनेकांनी भाजपसोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी केलेल्या मार्गदर्शनपर भाषणात पवार यांनी, आमिषाला बळी पडू नका. कार्यकर्त्यांना दमबाजी करु नका, असं आवाहन केलं.
****
विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेसोबत युतीचा निर्णय योग्य वेळेवर जाहीर केला जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. उद्योग करात कपात केल्याबद्दल फडणवीस यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे आभार मानले. या धाडसी निर्णयामुळे उद्योगांना दिलासा मिळालाच, शिवाय उद्योग क्षेत्रात नवीन गुंतवणूक येण्यासही या निर्णयामुळे चालना मिळेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
****
जालना जिल्ह्यातल्या पाच विधानसभा मतदार संघात मिळून एकूण १५ लाख ५४ हजार ११० मतदार असून, एक हजार ६५३ मतदान केंद्रांवर तीन हजार ५७ मतदान यंत्र उपलब्ध आहेत. जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी आज वार्ताहरांना ही माहिती दिली. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी विविध कक्षांची स्थापना करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
परभणी मतदार संघाच्या विकासासाठी आणि सर्वसामान्यांना न्याय मिळावा या उद्देशाने अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचं, गोविंद देशमुख पेडगांवकर यांनी सांगितलं आहे. ते आज परभणीत पत्रकार परिषदेत बोलत होते. परभणी मतदार संघात आजपर्यंत जाती-धर्मावर निवडणूक झाली. त्यामुळे विकास होऊ शकला नसल्याचं, पेडगावकर यांनी सांगितलं.
****
बुलडाणा जिल्हयात एका महिलेसह तिच्या चार मुलींचे मृतदेह आढळले आहेत. मेहकर तालुक्यात माळेगाव शिवारात एका विहिरीत हे मृतदेह आढळले. माळेगावच्या ढोके कुटुंबातल्या या पाचजणी असून त्यांच्या मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
लातूर शहर महानगरपालिकेनं केलेल्या करवाढी विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असल्याची माहिती, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष व्यंकट बेद्रे यांनी दिली आहे. पालिका आकारत असलेला कर अवास्तव आणि नियमबाह्य आहे, यासंदर्भात उच्च न्यायालयात एक अवमान याचिका दाखल केली होती, मात्र, न्यायालयानं ती नामंजूर केल्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून न्यायालयानं ती स्वीकारली असल्याचं बेद्रे यांनी सांगितलं.
****
राज्य शासनाचा वसंतराव नाईक कृषिमित्र पुरस्कार वाशिम इथले सामाजिक कार्यकर्ते निलेश सोमाणी यांना जाहीर झाला आहे. कृषी तसंच कृषी संलग्न क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना या पुरस्कारानं सन्मानित केलं जातं.
****

No comments: