Sunday, 29 September 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 29.09.2019 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date –29 September 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९ सप्टेंबर २०१ सायंकाळी ६.००
****
महाराष्ट्र आणि हरियाणात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतल्या उमेदवारांच्या नावांवर चर्चा करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या मध्यवर्ती निवडणूक समितीची बैठक नवी दिल्ली इथं पक्षाच्या मुख्यालयात सुरू झाली आहे. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा आणि पक्षाचे अन्य ज्येष्ठ आणि राज्य स्तरावरचे नेते उपस्थित असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
मतदारांच्या सोयीसाठी केंद्रीय निवडणूक आयोग आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरावर भर देत असून, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी ‘सी व्हिजिल’ या ॲप्लिकेशनसह दिव्यांगासाठी ‘पी डब्ल्यू डी’ आणि ‘व्होटर्स हेल्पलाईन’ ही ॲप्लिकेशन्स उपलब्ध करून देण्यात आली आहेत. हे तीनही ॲप्स गुगल प्ले-स्टोअरवर उपलब्ध आहेत.
आदर्श आचारसंहितेच्या भंग झाल्याची तक्रार करण्यासाठी ‘सी व्हिजिल’ या प्रभावी ॲपचा वापर करता येऊ शकतो. या निवडणुकीत दिव्यांग नागरिकांना मतदान करणं सोयीचं व्हावं, यासाठी ‘पी डब्ल्यू डी’ हे ॲप विकसित केलेलं आहे. तसंच ‘व्होटर्स हेल्पलाईन’ या ॲपद्वारे मतदार यादीतील नाव शोधणं, नवीन अर्ज अथवा यादीतल्या नावाचं हस्तांतरण सहज शक्य असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
मतदारांना मतदान केंद्र आणि मतदार यादीतील त्यांचा क्रमांक मिळण्याची सुविधा निवडणूक आयोगाच्या इलेक्टोरल सर्च डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
राज्यातल्या विधानसभा निवडणुकीचं औचित्य साधून त्यावर मतदानाची तारीखही छापण्यात आली आहे. ही माहिती फक्त मतदारांच्या सोयीसाठी असून, ती ओळखपत्र म्हणून वापरता येणार नाही, असंही याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
देवीच्या महाराष्ट्रातल्या साडे तीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरात आज शारदीय नवरात्र महोत्सवाची सुरुवात झाली. संबळ-तुतारीच्या निनादात आणि आई राजा उदे उदे च्या जयघोषात उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली.
नांदेड जिल्ह्यातल्या माहूरगडावरील रेणुका मातेच्या, तसंच बीड जिल्ह्यातल्या अंबेजोगाई इथल्या योगेश्वरी देवीच्या उत्सवालाही आज मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. कोल्हापूर इथं महालक्ष्मीच्या मंदिरात सकाळी साडेआठ वाजता तोफेची सलामी देत देवीच्या मंदिरात घटस्थापना करण्यात आली.
उत्सवाचा पहिलाच दिवस आणि रविवारची सुटी असल्यामुळे पर्यटक आणि भाविकांनी देवीच्या सर्वच ठिकाणच्या मंदिरांमध्ये दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे.
****
औरंगाबाद इथल्या ऐतिहासिक कर्णपुरा देवीच्या यात्रेला आजपासून सुरवात झाली आहे. नवरात्रातील नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवात आज पहाटे महापूजा, आरती आणि घटस्थापना करण्यात आली. दर्शनाला येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षा आणि व्यवस्थेची चोख तयारी करण्यात आली असून, लहान मुलांसाठी खेळणी, गृहोपयोगी वस्तूंची दुकानेही येथे थाटलेली आहेत.
****
काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी आज नांदेड जिल्ह्यातल्या भोकर इथं प्रचारफेरी काढून शक्ती प्रदर्शन केलं. या फेरीत आमदार अमिता चव्हाण, आमदार अमर राजूरकर सहभागी झाले होते. नवरात्र महोत्सवाच्या पहिल्या दिवशी त्यांनी सहकुटुंब माहूर इथं जाऊन रेणुकामातेचं दर्शन घेतलं. त्यानंतर भोकर इथं येऊन आजपासून प्रचाराला प्रारंभ केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला विधानसभा मतदारसंघासाठी शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून भाऊसाहेब रूपनर यांच्या नावाची घोषणा आज आमदार गणपतराव देशमुख आणि पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.
गेल्या ५० वर्षापासून हा मतदारसंघ शेतकरी कामगार पक्षाच्या ताब्यात आहे. सलग ११ वेळा आमदार गणपतराव देशमुख यांनी या मतदारसंघाचं विधानसभेत प्रतिनिधित्व केलं आहे. वयोमानामुळे पुढील निवडणूक लढविणं शक्य नसल्यानं पक्षानं दुसरा उमेदवार द्यावा, अशी मागणी त्यांनी केली होती. त्यावर आज पत्रकार परिषद घेऊन पुढील उमेदवार म्हणून भाऊसाहेब रुपनर यांच्या नावाची घोषणा करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****

No comments:

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 15 اگست 2025‘ وقت: صبح 06:50 تا 07:00

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 15 August-2025 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبری...