Regional Marathi
Text Bulletin, Aurangabad
Date – 27
September 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २७ सप्टेंबर २०१९ दुपारी १.०० वा.
****
राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज दुपारी मुंबईत सक्तवसुली संचालनालयाच्या
कार्यालयात जाणार आहेत. मात्र ईडीनं
आतापर्यंत पवार किंवा अन्य
कुणालाही या प्रकरणी चौकशीसाठी बोलावलेलं नसल्याचं स्पष्ट केलं आहे. पोलिसांनी ईडी
कार्यालयाच्या परिसरात जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. पक्ष कार्यकर्त्यांनी ईडीच्या
कार्यालय परीसरात जमा होऊ नये, असं आवाहन पवार यांनी केलं आहे. दरम्यान, राज्य सहकारी
बँक घोटाळा प्रकरणात पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्या प्रकरणी ज्येष्ठ सामाजिक
कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी
आश्चर्य व्यक्त केलं आहे. अहमदनगर जिल्ह्यात राळेगण सिद्धी इथं वार्ताहरांशी बोलतांना
त्यांनी शिखर बँक घोटाळ्या संदर्भातल्या जवळपास वीस चौकशी अहवालात पवार यांचं नाव कुठेही
नसल्याचं सांगितलं. जे दोषी नाहीत त्यांना विनाकारण अडकवू नये, असं मत हजारे यांनी
व्यक्त केलं आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकार राष्ट्रवादी
काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरुद्ध सूडभावनेनं कारवाई करत असल्याचा आरोप काँग्रेसचे
अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. हे सरकार संधीसाधू राजकारण करत असून ज्या राज्यांमध्ये
निवडणुका आहेत तिथं विरोधी पक्ष नेत्यांविरुद्ध गुन्हे नोंदवले जात असल्याची टीका त्यांनी
केली आहे.
दरम्यान, हिंगोलीमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज पवार यांच्याविरुद्ध
ईडीनं केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ `रास्ता रोको` आंदोलन केलं. त्यामुळे नांदेड- अकोला राष्ट्रीय महामार्ग बराच काळ ठप्प झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
राज्य विधानसभा निवडणुकीकरता आजपासून चार ऑक्टोरपर्यंत
उमेदवारी
अर्ज सादर करता येणार आहेत. पाच ऑक्टोबरला अर्जांची छाननी होणार असून
सात ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागं घेता येणार आहेत. एकवीस ऑक्टोबरला मतदान तर चोवीस ऑक्टोबरला
मतमोजणी होणार आहे.
****
सत्तेचाळीसाव्या केंद्रीय स्वीकृती आणि
निरीक्षण समितीनं पंतप्रधान आवास योजने अंतर्गत
१ लाख ३३ हजार घरांच्या बांधकामांना मंजुरी दिली आहे. राज्य सरकारांतर्फे आलेल्या ६३०
प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. यासाठी ४ हजार ९८८ कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यापैकी
केंद्र सरकार १ हजार ८०५ कोटींची मदत राज्यांना देणार आहे. एकूण १ कोटी १२ लाख घरांची
मागणी असुन त्यापैकी शहरी भागात आतापर्यंत ९० लाख घरांच्या बांधणीला मंजुरी देण्यात
आली आहे.
****
देशातल्या ऐतिहासिक स्थळांच्या संरक्षणासाठी सर्वांनी योगदान द्यावं असं आवाहन
उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे. प्रसिद्ध पुरातत्व आणि इतिहासतज्ज्ञ
डॉ. जी. बी. देगलूरकर यांना काल पुण्यात उपराष्ट्रपतींच्या हस्ते पुण्यभूषण पुरस्कार
प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. जुन्या कलाकृती आणि वारशांचं जतन करणं
हे फक्त सरकारचं नव्हे तर प्रत्येकाचं कर्तव्य आहे असं ते म्हणाले. एक लाख रुपये आणि
सोन्याच्या फाळानं भूमी नांगरत असलेली बालशिवाजीची प्रतिमा, तसंच पुण्याच्या ग्रामदेवता
अंकित असलेलं सन्मानचिन्ह, असं इतिहासतज्ज्ञ डॉ. देगलुरकर यांना प्रदान करण्यात आलेल्या
पुरस्कारचं स्वरुप आहे
****
काही नागरिकांच्या खात्याचं लेखापरीक्षण झालं नसल्यामुळे आयकर विभागानं आयकर परतावा
भरण्यासाठी निश्चित केलेलीं ३० सप्टेंबर २०१९ ही तारीख वाढवून ३१ ऑक्टोबर केली आहे.
या संबंधातली औपचारिक घोषणा लवकरच केली जाईल, असं आयकर विभागातर्फे काल रात्री सांगण्यात
आलं.
****
कांद्याची उपलब्धता जाणून घेण्याच्या दृष्टीनं शेतकरी, व्यापारी आणि वाहतूकदारांशी
चर्चा करण्याकरता केंद्र सरकारचं पथक महाराष्ट्रात येणार आहे. केंद्रीय अन्न आणि ग्राहकमंत्री
रामविलास पासवान यांनी याची माहिती दिली आहे. नाफेडने हरयाणामधे कांद्याचे दहा ट्रक
पाठवले असून, आणखी पाच ट्रक मागणीनुसार पाठवण्यात येणार आहेत. दिल्ली सरकारकडूनही कांद्यासाठी
मागणी आली असून, येत्या शनिवारपासून तिथंही कांदा पाठवला जाईल. इतर राज्यांपैकी कोणालाही
कांदा खरेदी करायचा असल्यास केंद्रीय ग्राहक व्यवहार सचिवांकडे राज्य सरकारांनी मागणी
नोंदवावी, असं पासवान यांनी म्हटलं आहे.
****
काठमांडूमध्ये सुरू अठरा वर्षांखालील फुटबॉल अजिंक्यपद
स्पर्धेत भारतीय संघ आज उपांत्य फेरीत मालदीवविरुद्ध सामना खेळेल. सामना दुपारी पावणे
तीन वाजता सुरू होणार आहे. भारतानं उपउपांत्य फेरीच्या लढतीत श्रीलंकेचा तीन-शून्य
असा धुव्वा उडवला आहे. यजमान नेपाळ आणि श्रीलंकेचं स्पर्धेतील आव्हान यापुर्वीच संपुष्टात
आलं आहे.
****
No comments:
Post a Comment