Tuesday, 24 September 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 24.09.2019 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date –24 September 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २४ सप्टेंबर २०१ सायंकाळी ६.००
****
विधानसभेच्या जागावाटपाबाबत शिवसेनेसोबतची चर्चा अंतिम टप्प्यात असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लवकरच युतीबाबत घोषणा करतील, असं भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. शिवसेना भाजप युती या निवडणुकीत दोनशे वीस जागा जिंकेल, असा विश्वासही भाजप प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केला. माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि त्यांच्या दोन पुत्रांच्या भाजप प्रवेशाबाबत, युतीच्या जागावाटपानंतर निर्णय घेतला जाईल, असं पाटील यांनी स्पष्ट केलं.
****
दरम्यान, भारतीय जनता पक्ष जर दिलेला शब्द पाळणार नसेल, तर त्यांनी आत्मपरीक्षण करायला हवं, असं शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. लोकसभा निवडणुकीच्या वेळीच विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाचं समीकरण ठरलं असल्याचा पुनरुच्चार राऊत यांनी यावेळी केला. दोन्ही पक्षांना समसमान जागा वाटप आणि अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाची मागणी शिवसेनेकडून केली जात असल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
भाजपचा कार्यकर्ता प्रत्येक मतदान केंद्रावर निवडणूक लढेल आणि जिंकेल, असा विश्वास भाजपाचे राज्य निवडणूक प्रभारी भुपेंद्र यादव यांनी व्यक्त केला आहे. ते आज धुळे इथं पक्षाच्या विजय संकल्प मेळाव्यात बोलत होते. कलम ३७० हटवण्यास काँग्रेसचा विरोध हा गरीबांच्या विकासाला विरोध असल्याची टीका त्यांनी केली. भाजपाचे नेते गिरीश महाजन यावेळी उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रातल्या ४७ पैकी किमान ४२ जागा आपण जिंकू असा विश्वास महाजन यांनी व्यक्त केला. पक्षात नव्याने येणाऱ्या लोकांपैकी १५ ते २० पेक्षा अधिक लोकांना उमेदवारी दिली जाणार नाही, पक्षाच्या जुन्या कार्यकर्त्यांनाच उमेदवारी मिळेल असंही महाजन यांनी यावेळी सांगितलं.
****
पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक-पीएमसी बँकेवर रिझर्व बँक ऑफ इंडियानं निर्बंध लादले असून, बँकेचे सर्व व्यवहार बंद करण्यात आले आहेत. पीएमसी बँक डबघाईला आल्यानं रिझर्व बँकेनं ही कारवाई केली आहे. रिझर्व बँकेच्या निर्बंधांमुळे खातेदारांना केवळ एक हजार रुपये काढता येत आहेत. हे निर्बंध सहा महिन्यांसाठी असल्याचं तसंच बँकेचा आढावा घेउन पुढचा निर्णय घेतला जाईल असं रिझर्व बँकेनं सांगितलं आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या पांढरी पिंपळगावच्या तालाठी दिपाली गुलाने यांना दिड हजार रूपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकानं आज रंगेहात अटक केली. पीक पेरणी नोंद घेण्यासाठी आणि तसा सातबारा उतारा देण्यासाठी गुलाने यांनी तीन हजार रूपंयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडी नंतर दीडहजार रूपये लाचेची रक्कम स्वीकारतांना त्यांना अटक करण्यात आली.
****
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, औरंगाबाद शहरातल्या चिकलठाणा परिसरातल्या वसाहतीतल्या नागरिकांनी मुलभूत सुविधांसंदर्भात मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. आपल्या विविध मागण्यांचं निवेदन रहिवाश्यांनी आज प्रशासनाला सादर केलं.
हिंगोली शहरात अण्णा भाऊ साठे नगर इथं उभारण्यात येत असलेल्या कत्तलखान्याचे काम तात्काळ थांबवावे या मागणीसाठी संतप्त नागरीकांनी नगर पालिकेतील मुख्याधिका-यांच्या कक्षासमोर आज ठिय्या आंदोलन केले. यावेळी संतप्त महिलांनी प्रशासनाच्या विरोधात घोषणा दिल्या. कत्तलखान्याचे काम तात्काळ थांबविण्यात आले नाही तर उपोषणाचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
****
नांदेड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी प्रकल्पात १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे आज पासून नांदेड शहराला दर तीन दिवसांऐवजी दर दोन दिवसाड पाणीपुरवठा होईल.
****
नाशिक जिल्ह्याच्या कळवण तालुक्यात राहुल बाजीराव पवार या शेतकऱ्याच्या शिवारातुन सुमारे एक लाख रूपयांचा कांदा चोरीला गेल्याची घटना घडली. पवार यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात कळवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पवार यांनी आपल्या गोदामात २५ टन कांदा साठवून ठेवला होता, गेल्या काही दिवसांत कांद्याच्या दरात वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर ही कांदा चोरीची घटना घडली आहे. पोलिस जवळपासच्या तसंच गुजरात इथल्या बाजारपेठेत कांदा चोरांचा शोध घेत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला क्रिकेट संघादरम्यान टी ट्वेंटी मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. पाच सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज सुरत इथं खेळवला जाणार आहे. सायंकाळी सात वाजता सुरू होणाऱ्या या सामन्याचं, आकाशवाणीवरून धावतं वर्णन प्रसारित केलं जाणार आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वातल्या भारतीय महिला क्रिकेट संघात फिरकीपटू पूनम यादवचा समावेश आहे, पूनमला नुकतंच अर्जुन पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे.
****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 15.08.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 15 August 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्...