Regional Marathi
Text Bulletin, Aurangabad
Date –27
September 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २७ सप्टेंबर २०१९ सायंकाळी
६.००
****
कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये अशी मुंबई पोलिसांनी विनंती केल्यामुळे
सक्तवसुली संचालनालयाच्या कार्यालयात जाण्याचा आजचा निर्णय रद्द केल्याचं राष्ट्रवादी
काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. गृह खातं सांभाळलं असल्यानं जनतेला
कोणताही त्रास होऊ नये म्हणून ईडीच्या कार्यालयात जाण्याचा निर्णय रद्द केल्याचं त्यांनी
सांगितलं. कार्यालयात येण्याची गरज नाही, असं पत्रही ईडीनं पाठवलं असल्याची माहिती
त्यांनी दिली. या मुद्यावरील पाठिंब्याबद्दल पवार यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी,
शिवसेना यांचं मुंबईत बातमीदारांशी बोलताना आभार मानलं.
****
नाशिक जिल्ह्यातील लासलगाव इथल्या बाजार समितीत आज कांद्याचे भाव साडे सहाशे रुपयांनी
कोसळले आणि तीन हजार ५०० रुपये क्विंटल इतका सर्वाधिक भाव मिळाला. आठवडाभरात एक हजार
६०० रुपयांची घसरण झाल्यानं शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण आहे. दक्षिणेतल्या राज्यात
स्थानिक कांद्याची आवक वाढली तसंच इजिप्त इथल्या कांद्याची आयात झाल्यानं नाशिक जिल्ह्यातल्या
कांद्याची मागणी घटली. त्यामुळे दर घसरल्याचं सूत्रांनी सांगितलं.
****
विधानसभा निवडणुकीचा अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी आज हिंगोली इथं १६ अर्जांची
विक्री झाली आहे. कळमनुरी इथं २३, अमरावती इथं २४२ तर वर्धा इथं ८० उमेदवारी अर्जांची
खरेदी झाल्याची माहिती आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांनी दिली आहे.
****
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध बँकांतील दहा लाख रुपयांवरील आर्थिक
आणि संशयास्पद व्यवहारावर आयकर विभागाची करडी नजर राहणार आहे. कोल्हापूर विभागाचे अप्पर
आयकर संचालक पूर्णश गुरुराणी यांनी आज कोल्हापूर इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
****
हिंगोली विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या खर्चावर काटेकोर लक्ष ठेवा, अशा सूचना
हिंगोली जिल्ह्यातील तीनही मतदारसंघासाठीचे खर्च निरीक्षक नानगोथुंग जुंगीओ यांनी आज
हिंगोली येथे दिल्या. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात हिंगोली मतदारसंघातील समन्वय
अधिकारी यांची आढावा बैठक घेतली, त्यावेळी या सूचना केल्या.
****
येत्या विधानसभा निवडणुकीत दिव्यांग मतदारांचा १०० टक्के सहभाग नोंदवणं हे प्रथम
प्राधान्य असून त्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणेनं दिव्यांग मतदार जागृती बाबत दक्षता
घ्यावी, अशा सूचना बुलढाणा जिल्हा निवडणूक अधिकारी तसंच जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे
यांनी आज दिल्या. सोबतच जेष्ठ नागरिक, महिला आणि सर्व साधारण मतदारांची टक्केवारीसुद्धा
वाढवण्यासाठी मतदार जाणीव जागृती कार्यक्रमाची प्रभावीरित्या अंमलबजावणी करण्यात यावी,
असंही त्यांनी आढावा बैठकित सांगितलं.
****
कॉंग्रेस आणि भाजप या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याची टीका वंचित बहुजन विकास
आघाडीचे लातूर शहराचे उमेदवार राजा मणियार यांनी केली आहे. वंचित बहुजन विकास आघाडीच्या
वतीनं जिल्हाध्यक्ष संतोष सुर्यवंशी तसंच डॉ. अरविंद भातांब्रे यांनी आज लातूर इथं
पत्रकार परिषद घेऊन आघाडीच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. यावेळी औसा मतदारसंघाचे
उमेदवार सुधीर शंकरराव पोतदार उपस्थित होते.
****
औरंगाबाद पदवीधर मतदार संघासाठी १ ऑक्टोबरपासून मतदार नोंदणी करण्यात येणार आहे.
पूर्वी नोंदणी केली असली तरी ती यादी न्यायालयाच्या आदेशान्वये रद्द करण्यात आल्यामुळे
सर्व पदवीधरांनी पुन्हा नोंदणी करणे आवश्यक असल्याचं परभणीचे निवडणूक उपजिल्हाधिकारी
डॉ.अरविंद लोखंडे यांनी आज परभणी इथं पत्रकार परिषदेत सांगितलं.
****
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील वाघाडी येथे दि. ३१ ऑगस्ट रोजी झालेल्या रासायनिक
कारखान्यातील भीषण स्फोट प्रकरणी आज पोलिसांनी कारखाना मालकासह तिघांना अटक केली. या
भिषण स्फोटात १४ जण ठार तर ६५ जण जखमी झाले होते.
****
आंतरराष्ट्रीय शरीर सौष्ठव महासंघाची `डायमंड चषक` शरीर सौष्ठव स्पर्धा येत्या
सोळा आणि सतरा नोव्हेंबर रोजी औरंगाबादच्या विभागीय क्रीडा संकुलात होणार आहे. स्पर्धा
संयोजक, आशियाई संघटनेचे सरचिटणीस डॉ.संजय मोरे यांनी आज औरंगाबादमध्ये पत्रकार परिषदेत
या स्पर्धेची माहिती दिली. या स्पर्धेत सत्तर देशांचे शरीर सौष्ठवपटू सहभाग घेणार असून
शरीरसौष्ठवपटू हॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते अरनॉल्ड श्वार्जनेगर प्रमुख उपस्थित रहाणार
असल्याचं डॉ.मोरे यांनी यावेळी सांगितलं.
****
भारताच्या परुपल्ली कश्यपनं कोरिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत
धडक मारली आहे. त्यानं आज उपउपांत्य फेरीच्या सामन्यात डेन्मार्कच्या जेन ओ जॉरगेनसनवर
२४-२२, २१-८ अशी सहज मात केली. कश्यपचा उपांत्य फेरीतील सामना प्रथम मानांकित जपानच्या
केंतो मोमोताविरुद्ध होणार आहे.
****
No comments:
Post a Comment