Sunday, 22 September 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 22.09.2019 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 22 September 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक सप्टेंबर २०१ सकाळी ७.१० मि.
****

Ø  राज्यात विधानसभेसाठी एकाच टप्प्यात २१ ऑक्टोबरला मतदान तर, २४ ऑक्टोबरला मतमोजणी; आदर्श आचारसंहिता लागू
Ø  मुंबई, पुणे आणि नाशिक जिल्ह्यात विधानसभा निवडणूक लढवण्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा निर्णय
Ø  ज्येष्ठ सतारवादक अरविंद पारीख यांना भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी जीवनगौरव पुरस्कार जाहीर
आणि
Ø  जागतिक मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताच्या अमित पांघलला रौप्य पदक; मल्ल दीपक पुनिया ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र  
****

 राज्य विधानसभेसाठी एकाच टप्प्यात २१ ऑक्टोबरला मतदान घेण्याची तर, २४ ऑक्टोबरला मतमोजणी करण्याची घोषणा काल केंद्रीय निवडणूक आयोगाने केली. येत्या शुक्रवारी २७ सप्टेंबरला निवडणुकीची अधिसूचना जारी होणार असून, चार ऑक्टोबरपर्यंत नामनिर्देशन पत्र भरता येणार आहेत. पाच ऑक्टोबर रोजी अर्जांची छाननी होणार असून, सात ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागे घेता येतील, असं मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी काल नवी दिल्लीत सांगितलं. हरियाणा विधानसभा निवडणूक कार्यक्रमही यावेळी जाहीर करण्यात आला. या दोन्ही राज्यांसाठी आदर्श आचारसंहिता कालपासून लागू झाली आहे.

 राज्यात विधानसभेच्या २८८ जागा असून, यापैकी २९ जागा अनुसूचित जातींसाठी तर अनुसूचित जमातींसाठी २५ जागा आरक्षित आहेत. राज्यात आठ कोटी ९४ लाख मतदार असून, एक लाख ८० हजार इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या सहाय्यानं हे मतदान घेण्यात येणार आहे.

 दरम्यान, निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे, सुलभरित्या शांततेत पूर्ण करण्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी काल मुंबईत वार्ताहरांशी बोलताना दिली. मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदानात सहभाग घ्यावा, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.
****

 औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड, कन्नड, फुलंब्री, औरंगाबाद मध्य, औरंगाबाद पश्चिम, औरंगाबाद पूर्व, पैठण, गंगापूर, वैजापूर या सर्व नऊ मतदार संघासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. औरंगाबादचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी उदय चौधरी यांनी काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलताना ही माहिती दिली. या निवडणूकीत जिल्ह्यातले २८ लाख ४९ हजार ७५५ मतदार तीन हजार २४ केंद्रावर मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदारांच्या सोयीसाठी वोटर हेल्प लाईन अॅप आणि १-९-५-० हा मदत क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आला आहे. मतदार चिठ्ठ्या मतदानाच्या आठवडाभर पूर्वीच देण्याचा प्रयत्न असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितलं.

 विधानसभा निवडणुका निर्भय वातावरणात व्हाव्यात, यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय राखून काम करावं, असे निर्देश जालन्याचे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिले आहेत. ते काल जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक आढावा बैठकीत ते बोलत होते.

 हिंगोली जिल्ह्यांमध्ये तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येईल, आचारसंहिता भंग केल्यास दीड तासात कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिला आहे.

 परभणी जिल्ह्यात परभणी, गंगाखेड, पाथरी आणि जिंतूर-सेलू हे चार विधानसभा मतदार संघ असून, १३ लाख ९९ हजार ३६१ मतदार आहेत. आचारसंहितेच्या काळात संभाव्या आर्थिक व्यवहाराला पायबंद घालण्यासाठी पथकं नियुक्त करण्यात आली असून, नागरिकांनी रोखीचे व्यवहार टाळावेत असं आवाहन जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी केलं आहे.

 बीड जिल्ह्यात सहा विधानसभा मतदार संघ असून, २० लाख ५५ हजार १६८ सर्वसामान्य मतदार, चार हजार ४७१  सैनिक मतदार आणि चार हजार ५८३ दिव्यांग मतदार आहेत. या मतदारांसाठी दोन हजार ३२१ मतदार केंद्रं असून, निवडणूक नि:पक्ष, पारदर्शक आणि भयमुक्त वातावरणात पार पा़डण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याचं, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सांगितलं.
****   
 
 विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर २४ तासाच्या आतच दक्षिण मुंबईतून सदुसष्ठ लाख रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली. पोपळवाडी भागात पोलिसांनी काल संध्याकाळी एका दुकानावर छापा टाकून ही कारवाई केल्याचं पीटीआयचं वृत्त आहे.
****
 विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेती, रोजगार, आर्थिक मंदी, ढासळलेली अर्थव्यवस्था अशा जनतेशी निगडित प्रश्नांवर चर्चा व्हायला हवी असं राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. या सर्व मुद्यांवर राज्यातलं भाजपा शिवसेना युतीचं सरकार अपयशी ठरलं असल्याची टीका त्यांनी केली. हे सरकार आपलं अपयश लपवण्यासाठी भावनिक मुद्दे उपस्थित करून जनतेचं लक्ष इतरत्र वळवण्याचा प्रयत्न करेल अशी शक्यताही चव्हाण यांनी वर्तवली.
****

 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं मुंबई, पुणे आणि नाशिक या तीन ठिकाणी विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिक जिल्ह्यात सर्वच्या सर्व म्हणजे पंधरा मतदार संघांत उमेदवार दिले जातील अशी माहिती मनसेचे नेते अभिजित पानसे आणि सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी काल नाशिक इथं झालेल्या मेळाव्यात दिली.
****

 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****

 राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे देण्यात येणारा भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ सतारवादक अरविंद पारीख यांना जाहीर झाला आहे. पाच लाख रुपये, मानपत्र आणि स्मृतीचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. शास्त्रीय गायन आणि वादन क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कलावंतांना हा पुरस्कार दिला जातो.
****

 जागतिक मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताच्या अमित पांघलला रौप्य पदक मिळालं आहे. रशियात इटकॅरिनबर्ग इथं झालेल्या अंतिम फेरीत अमितचा ५२ किलो वजनी गटात उजबेकिस्‍तानच्या शाकोबिदिन जोइरोफकडून पराभव झाला. मात्र, जागतिक मुष्टियुद्ध स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचून पदक पटकावणारा अमित हा पहिलाच भारतीय पुरुष मुष्टियुद्धपटू ठरला आहे.
****

 जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा दीपक पुनिया ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. ८६ किलो वजनी गटात खेळतांना दीपकनं कोलंबियाच्या मल्लावर  ७-६ अशा फरकानं मात केली. ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरलेला दीपक हा चौथा भारतीय खेळाडू आहे. येत्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी विनेश फोगट, बजरंग पुनिया, रविकुमार दहिया हे यापूर्वीच पात्र ठरले आहेत. तर राहुल आवारेची कांस्य पदकासाठीची लढत आज होणार आहे.
****

 नांदेड इथले प्रतिष्ठित नागरिक आणि महाराष्ट्र ग्रामीण बँकेतील वरीष्ठ अधिकारी प्रकाश सेनगावकर यांचं काल सकाळी निधन झालं. ते ७० वर्षांचे होते. साहित्य, संगीत, नाट्य, धार्मिक, राजकीय, तसंच शासकीय कार्यक्रमांचे खुमासदार सूत्रसंचालक अशी त्यांची ओळख होती. नांदेडच्या सांस्कृतिक क्षेत्रात सेनगावकर यांची सदैव उणीव भासेल, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी सेनगावकर यांना श्रध्दांजली वाहिली आहे.
****

 नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या विलास युवक महोत्सव २०१९ला  काल लातूर जिल्ह्यातल्या बाभळगाव इथं प्रारंभ झाला. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. उद्धव भोसले, अभिनेते राहुल सोलापूरकर, आमदार अमित देशमुख, विद्यापीठाचे प्र -कुलगुरु जोगेंद्रसिंह बिसेन उपस्थित होते. विद्यापीठानं विद्यार्थ्यांमधला कलागुण ओळखून त्याला योग्य दिशा दिली पाहिजे, असं मत आमदार देशमुख यांनी यावेळी व्यक्त केलं. या युवक महोत्सवामध्ये विद्यापीठ परीक्षेत्रातल्या ८१ महाविद्यालयांच्या अकराशे विद्यार्थी कलावंतांनी सहभाग घेतला आहे. 
*****
***

No comments: