Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 29 September 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक –२९ सप्टेंबर २०१९ सकाळी ७.१० मि.
****
v विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसच्या
उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता
v महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे
अध्यक्ष शरद पवार यांचं नाव गोवल्यामुळे उद्विग्नतेून राजीनामा दिल्याचं, अजित पवार
यांचं स्पष्टीकरण
v शिवसेनाप्रमुखांना
दिलेल्या वचनानुसार, राज्याच्या मुख्यमंत्रिपदी शिवसैनिकाला बसवण्याचा निर्धार, शिवसेना
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून व्यक्त
v समाज माध्यमांवर
खोट्या बातम्यांचं प्रमाण वाढलं- ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई
आणि
v शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून प्रारंभ
****
विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसच्या
उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे. अमेरिका दौऱ्यावरून काल परतलेले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजपच्या संसदीय समितीची आज बैठक होईल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत
पाटील यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीनंतर उमेदवारांची
पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता, पक्षाच्या सूत्रांकडून व्यक्त करण्यात आली आहे.
त्याचबरोबर काँग्रेसच्या जवळपास १०० उमेदवारांच यादीही आज जाहीर होण्याची शक्यता आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं प्रत्येकी १२५ जागा लढवण्याचा आणि ३८ जागा मित्र
पक्षांना देण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. काल या दोन्ही पक्षांनी मित्र पक्षांना
द्यावयाच्या ३८ जागांबाबत चर्चा केली. आज याबाबत निर्णय होईल, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितलं.
****
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्यात राष्ट्रवादी
काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं नाव गोवल्यामुळे आलेल्या उद्विग्नतेून राजीनामा
दिल्याचं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. ते
काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. अजित पवार यांनी परवा सायंकाळी आमदारकीचा राजीनामा
दिल्यानंतर ते काल दुपारपर्यंत कोणाच्याही संपर्कात नव्हते. काल दुपारी पक्षाध्यक्ष
शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट
केली. शरद पवार हे राज्य सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर नव्हते, बँकेचे सभासद नव्हते,
त्यांचा दुरान्वयानेही संबंध नव्हता, तरीही त्यांचं नाव या प्रकरणात आणलं गेलं, हा
सगळा निव्वळ बदनामीचा डाव असल्याचंही अजित पवार म्हणाले. जवळपास अकरा हजार कोटी रुपयांच्या
ठेवी असलेल्या, राज्य सहकारी बँकेत पंचवीस हजार कोटी रुपयांचा घोटाळा कसा होणार, असा
प्रश्नही अजित पवार यांनी उपस्थित केला.
****
सरकार सूडबुद्धीचं राजकारण करत असल्याचं शरद पवार
यांचं म्हणणं चुकीचं आणि न्याय व्यवस्थेवर संशय घेणारं आहे, अशी टीका भाजपचे प्रवक्ते
माधव भंडारी यांनी केली आहे. ते काल नाशिक इथं एका कार्यक्रमात बोलत होते. शिखर बॅँक
घोटाळ्यासंदर्भात उच्च न्यायालयात २०१५ मध्ये जनहित याचिका दाखल झाली होती, आणि त्यात
शरद पवार यांचं नाव असून, उच्च न्यायालयाच्या आदेशान्वयेच गुन्हा दाखल झाल्याची माहितीही
भंडारी यांनी दिली.
****
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिलेल्या वचनानुसार,
राज्याच्या मुख्यमंत्रिपदी शिवसैनिकाला बसवण्याचा निर्धार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव
ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. ते काल मुंबईत, पक्षाच्या जिल्हाप्रमुखांच्या मेळाव्यात
बोलत होते. राज्यात पुन्हा देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रिपदी विराजमान होतील, असा
दावा भाजप नेत्यांकडून केला जात आहे, त्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांचं हे विधान महत्त्वाचं
असून, शिवसेनेकडे अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद मागितलं जाणार असल्याचे, हे संकेत मानले
जात आहेत. भाजप- शिवसेना युतीबद्दल भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याशी बोलणं
झालं असून, लवकरच याबाबत निर्णय घेण्यात येईल, असंही ठाकरे यांनी सांगितलं.
****
स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रहार, लोकभारती, समाजवादी
पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, आणि बहुजन विकास पार्टी या सर्व पक्षांनी मिळून
काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीकडे ५० जागा मागितल्या आहेत. माजी खासदार राजू शेट्टी
यांनी काल सांगली इथं ही माहिती दिली. आघाडीनं मात्र ३८ जागा देण्याचं मान्य केलं असून,
उर्वरित १२ जागांसाठी चर्चा सुरू असल्याचं शेट्टी यांनी सांगितलं.
****
कायम खाते क्रमांक - पॅन आणि आधार क्रमांक लिंक करण्यासाठी
केंद्रीय अर्थमंत्रालयाने येत्या ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. ही मुदत उद्या
३० सप्टेंबर रोजी संपणार होती, मात्र ही मुदत आता ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली असल्याचं,
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या परिपत्रकात म्हटलं आहे.
****
‘मन की बात' या आकाशवाणीवरुन प्रसारित होणाऱ्या कार्यक्रम
श्रृंखलेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी ११ वाजता देशविदेशातल्या नागरिकांशी संवाद
साधणार आहेत. मन की बात या कार्यक्रम मालिकेचा हा सत्तावन्नावा भाग असेल. आकाशवाणी
आणि दूरदर्शनच्या सर्व केंद्रावरुन या कार्यक्रमाचं प्रसारण होईल.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित
केलं जात आहे.
****
पत्रकारिता हा सध्या व्यवसाय झाला असून, समाज माध्यमांवर
खोट्या बातम्यांचं प्रमाण वाढल्याची खंत, ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी व्यक्त
केली आहे. काल औरंगाबाद इथं, महात्मा गांधी मिशनच्या वतीनं घेण्यात आलेल्या अरूण साधू
स्मृती व्याख्यानमालेत ‘आजची माध्यमं आणि राजकारण’ या विषयावर ते बोलत होते. समाज जोडण्याचं
आणि समाजाच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम पत्रकारितेच्या माध्यमातून होणं
गरजेचं असल्याचंही ते म्हणाले. खासदार कुमार केतकर यांनी भारतीय जनता पक्षाच्या धोरणांवर
तीव्र टीका केली. चुकीचा इतिहास लिहिला जात असल्याचा आरोपही केतकर यांनी यावेळी केला.
****
शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून प्रारंभ होत आहे.
मराठवाड्यात माहूर इथली रेणुका देवी, तुळजापूर इथली तुळजाभवानी तसंच अंबाजोगाई इथं
योगेश्वरी देवीच्या मंदिरात घटस्थापनेनं विविध धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ होईल.
तुळजापूर इथं तुळजाभवानी देवीची मंचकी निद्रा पूर्ण होऊन, देवी आज पहाटे सिंहासनारूढ
झाली. दुपारी बारा वाजेच्या सुमारास घटस्थापना होणार आहे. राज्यात कोल्हापूर इथं अंबाबाई
देवी तसंच नाशिक जिल्ह्यातल्या सप्तश्रृंगी देवीच्या मंदिरातही नवरात्रोत्सवानिमित्त
विविध धार्मिक उपक्रम होणार असल्याचं, आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे.
****
शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी विद्यापीठाला बळ मिळावं,
यासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा, असं आवाहन भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या मुंबई
शाखेचे संचालक प्राध्यापक शुभाशिष चौधुरी यांनी केलं आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा
विद्यापीठाचा बावीसावा दीक्षान्त समारंभ काल झाला, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते
बोलत होते. कुलगुरू डॉ.उद्धव भोसले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. पदवी मिळवणं
हे सहजसाध्य असेलही, पण ज्ञान मिळवणं अवघड आहे. ज्ञान हे गतीमान असल्यामुळे, आपला संशोधन
लेख प्रकाशित होईपर्यंत, त्यातली अर्धी मूल्यं कमी होतात, याचं भान ठेवून वाटचाल करावी,
असा सल्लाही प्राध्यापक चौधुरी यांनी यावेळी दिला.
****
परभणी जिल्ह्यात आचारसंहितेच्या भंगाचा गुन्हा काल
नोंदवण्यात आला. जिंतूर तालुक्यातल्या मौजे कोरवाडी इथं आमदार विजय भांबळे यांच्या
स्थानिक विकास निधीतून सांस्कृतिक सभागृह सभामंडप बांधकाम उद्घाटनाचा फलक कायम राहिला
होता. ग्रामसेवक संदीप बारवे यांनी यात दोषी आढळल्यानं त्यांच्याविरुद्ध लोकप्रतिनिधी
अधिनियमनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
परभणी महानगर पालिकेच्यावतीनं शहरात स्वच्छता मोहीम
राबवण्यात येत आहे. नागरिकांना कुठलाही त्रास होऊ नये, म्हणून ही मोहीम रात्रीच्यावेळी
राबवण्यात येत आहे. या अभियानासाठी महापालिकेनं आधिकारी आणि कर्मचार्यांच्या पथकांची
नियुक्ती केली असून, त्याद्वारे जनजागृती करण्याचं काम सुरु आहे.
****
जालना इथं झालेल्या १४ वर्षांखालील मुलामुलींच्या
राज्यस्तरीय बेसबॉल स्पर्धेत काल झालेल्या अंतिम सामन्यात मुलांच्या गटात कोल्हापूरच्या
संघानं पुणे संघाचा पराभव करत विजय मिळवला. तर मुलींच्या गटात पुण्याच्या संघानं, लातूर
संघाचा पराभव करत पहिलं स्थान पटकावलं. या स्पर्धेतून १४ वर्षांखालील राष्ट्रीय बेसबॉल
स्पर्धेसाठी मुला, मुलींच्या महाराष्ट्र संघाची निवड करण्यात आली.
****
नाशिक पुणे महामार्गावर काल संध्याकाळी ट्रक आणि
कारची धडक होऊन झालेल्या अपघातात पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. सिन्नर शिवारात
गायींचा कळप आल्यानं कार चालकानं अचानक ब्रेक दाबला, त्यामुळे मागून येणारा ट्रक कारवर
आदळल्याचं सिन्नर पोलिसांनी सांगितलं.
****
कृष्णा खोऱ्यातलं पुराचं पाणी नदीजोड प्रकल्पाद्वारे
मराठवाड्यासह दुष्काळी भागात नेण्याची योजना, प्राधान्यक्रमाने राबवली पाहिजे, असं
मत, हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांनी व्यक्त केलं आहे. ते काल कोल्हापूर जिल्ह्यात
कवठेमहांकाळ इथं, शिवसेना मेळाव्यात बोलत होते. सांगली कोल्हापूर जिल्ह्यात महापुराची
पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी वेळीच मार्ग काढणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. या
भागातली शेती आणि शेतकरी उध्वस्त झाला आहे, त्यांना सर्वतोपरी मदत केली पाहिजे, असंही
खासदार माने म्हणाले.
*****
***
No comments:
Post a Comment