Thursday, 26 September 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 26.09.2019 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२६  सप्टेंबर  २०१९ सकाळी ११.०० वाजता
****

 औरंगाबाद जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणाचे सोळा दरवाजे दोन फुटाने उघडण्यात आले असून ३५ हजार १०० घनफूट प्रतिसेकंद वेगाने नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे. पाणी सोडण्याचं प्रमाण दुपारपर्यंत प्रतिसेकंद ५५ हजार घनफुटांपर्यंत वाढू शकतं, त्यामुळे गोदावरी नदीकाठच्या लोकांनी तसंच प्रशासनानं सतर्क राहण्याचं आवाहन जायकवाडी पाटबंधारे विभागाकडून करण्यात आलं आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात सर्वत्र पावसाचा जोर वाढल्यानं, अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या भीमा नदी परिसरात पुरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे, उजनी धरणातून सुमारे एक लाख आणि वीर धरणातून ३२ हजार घनफूट प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे भीमा नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
 अमरावती जिल्ह्यात यावर्षी पावसानं दमदार हजेरी लावली असल्यानं जिल्ह्यातला सर्वात मोठा अप्पर वर्धा प्रकल्प शंभर टक्के भरला, तर इतर लहान मोठ्या ८५ प्रकल्पात सुमारे ९५ टक्के पाणीसाठा झाला आहे.
****

 पुण्यात काल रात्री पावसाशी निगडित घटनांमध्ये सात जणांचा मृत्यू झाला. अरण्येश्वर भागात भिंत पडून पाच जण ठार झाले तर त्याशिवाय एक मृतदेह सहकार नगर भागात सापडला तर सिंहगड रस्त्यावर एक चारचाकी गाडी वाहून गेल्यानं, चालकाचा मृत्यू झाला. शहरात अनेक सखल भागात पाणी साचल्यानं, सुमारे पाचशेहून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं.
****

 सांगली जिल्ह्यातल्या कडकनाथ कोंबडी घोटाळा प्रकरणी संशयित गणेश शेवाळे यास न्यायालयानं सात दिवस पोलीस कोठडी दिली आहे. या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार सुधीर मोहिते हा अद्याप फरार आहे. या गुन्ह्यातील संदीप मोहिते, हनुमंत जगदाळे हे अटकेत आहेत. या प्रकरणी आत्तापर्यंत अकराशे तक्रारी दाखल झाल्या आहेत.

दरम्यान या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गिल यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
****

 औरंगाबाद इथल्या प्रगतिशील ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संस्थेचा संस्थाभूषण पुरस्कार पांडूरंग पाथ्रीकर यांना प्रदान करण्यात आला. काल संस्थेच्या गीता भवन कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात पाथ्रीकर यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.
*****
***

No comments: