Regional Marathi
Text Bulletin, Aurangabad
Date – 22
September 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २२ सप्टेंबर २०१९ दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी
आपल्या सात दिवसांच्या अमेरिका दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात आज सायंकाळी ह्युस्टन
इथं आयोजित कार्यक्रमात जवळपास ५० हजार भारतीयांना संबोधित करणार आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष
डोनाल्ड ट्रम्प हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित रहाणार आहेत. अमेरिकेच्या भारतीय
समुदायानं आयोजित केलेल्या या हौडी मोदी या कार्यक्रमानंतर मोदी न्यूयॉर्क इथं जाणार
असून, उद्या संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयात जलवायु परिवर्तनाशी संबधित शिखर संमेलनाला
ते संबोधित करतील. संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधित करून २८ तारखेला ते भारतात परत
येणार आहेत.
****
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण
तयार करण्याकरता केंद्रसरकारनं व्यापक उपक्रम हाती घेतला असून, देशातल्या शिक्षणाचा
दर्जा वाढवण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरीयाल
यांनी काल नवी दिल्लीमधे केंद्रीय शैक्षणिक मंडळ सल्लागार समितीच्या बैठकीत ही माहिती
दिली.
****
फसवणुकीला रोखण्यासाठी
वाहन परवाना -ड्राइविंग लाइसेंसला आधार क्रमांकाशी जोडण्यात येईल, असं माहिती आणि तंत्रज्ञान
मंत्री रविशंकर प्रसाद यांनी काल पाटणा इथं एका कार्यक्रमात बोलतांना सांगितलं. यामुळं
बनावट वाहन परवाने तयार केले जाऊ शकणार नाहीत, असंही ते म्हणाले. भ्रष्टाचाराला आळा
घालण्यासाठी आधार महत्वाची भूमिका बजावत असल्याचं सांगून आधारमुळं सरकारी खजिन्यात
एक लाख ४७ हजार ६७७ कोटी रूपये वाचवण्यात आल्याची माहितीही प्रसाद यांनी दिली.
****
अकरावी प्रवेशासाठीच्या
अंतिम फेरीला उद्या सोमवारपासून सुरवात होणार आहे. प्रथम येणारास प्रथम प्राधान्य या
तत्त्वावर ३० सप्टेंबरपर्यंत ही फेरी चालणार असून, आतापर्यंत कोणत्याही कनिष्ठ महाविद्यालयात
प्रवेश न घेतलेले, प्रवेश रद्द केलेले, आतापर्यंत कोणत्याही फेरीत प्रवेश न मिळालेले,
प्रवेश नाकारलेले, तसंच दहावीच्या फेरपरीक्षेत एटीकेटी सवलत घेऊन उत्तीर्ण झालेले आणि
नव्याने अर्ज भरलेले विद्यार्थीही या फेरीत सहभागी होऊ शकतील, असं प्रभारी शिक्षण उपसंचालक
प्रवीण अहिरे यांनी सांगितलं आहे.
****
सदाशिव गोरक्षकर यांनी
भारतीय संग्रहालय क्षेत्रात केलेल्या अतुलनीय कामगिरीस अभिवादन म्हणून ‘पद्मश्री सदाशिव
गोरक्षकर जीवनगौरव पुरस्कार’ आणि ताम्रपाषाणयुगीन संस्कृतींच्या अभ्यासाबरोबर ऐतिहासिक
पुरातत्वीय स्थळांच्या उत्खननांचं मूल्यमापन या क्षेत्रात मधुकर केशव ढवळीकर यांनी
दिलेल्या भरीव योगदानाबद्दल ‘पद्मश्री मधुकर ढवळीकर शिष्यवृत्ती योजना’ जाहीर करण्यात
आल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी काल दिली.
याच क्षेत्रात काम करणाऱ्या
व्यक्तींना दिल्या जाणाऱ्या या जीवनगौरव पुरस्काराचं स्वरूप मानपत्र, स्मृतीचिन्ह व
पाच लाख रुपये रोख, तर दोन गुणवंत विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीची
रक्कम प्रत्येकी अडीच लाख रुपये इतकी असेल, असंही तावडे यांनी सांगितलं.
****
आदिवासींच्या आरोग्यासाठी डॉक्टर्स, संशोधक, अभ्यासक
आणि वैद्यक क्षेत्रातील व्यावसायिकांनी पुढाकार घ्यावा, असं आवाहन केंद्रीय आदिवासी
विकास मंत्रालयाचे सचिव दीपक खांडेकर यांनी केलं आहे. प्रवरा मेडिकल ट्रस्ट, आदिवासी
संशोधन आणि प्रशिक्षण विभाग आणि जागतिक आरोग्य संघटनेतर्फे अहमदनगर जिल्ह्यातल्या भंडारदरा
इथं काल ‘राष्ट्रीय आदिवासी आरोग्य संशोधन परिषदे'चा समारोप झाला. त्यावेळी ते बोलत
होते.
****
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू
डॉ. प्रमोद येवले यांची प्रकट मुलाखत उद्या 'ज्ञानवाणी' १०५ दशांश ६ मेगा हर्टझ् या
विद्यापीठाच्या विद्याधन रेडिओ चॅनलवर प्रसारित केली जाणार आहे. सकाळी ८ आणि रात्री
८ वाजता प्रसारित होणारी ही मुलाखत व्हिडिओ स्वरूपात विद्याधन या यूट्यूब चॅनलवरही
पाहता येईल, असं ज्ञानवाणी विद्यापीठ केंद्राच्या कार्यक्रम अधिकारी डॉ. संध्या मोहिते
यांनी कळवलं आहे.
****
औरंगाबादच्या तरुण उर्दू
कवींना व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशानं आज "अदब की कहकशां' या मुशायऱ्याचं
आयोजन करण्यात आलं आहे. मौलाना आझाद संशोधन केंद्रात सायंकाळी साडे आठ वाजता होणाऱ्या
कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं आवाहन संयोजक मुकीम खान यांनी केलं आहे.
****
औरंगाबादच्या ध्यास गझल साहित्य समूहातर्फे आज सायंकाळी
मराठी गझल संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. गोविंदभाई श्रॉफ सभागृहात होणाऱ्या या
संमेलनात राज्यभरातून आलेल्या आघाडीच्या मराठी गझलकारांचा मुशायरा होईल. त्यानंतर गझल
गायन मैफल रंगणार असल्याचं संयोजक गिरीश जोशी यांनी कळवलं आहे.
****
भविष्य निर्वाह निधीच्या संदर्भातल्या समस्या, प्रश्न
आणि तक्रारी निवारण्यासाठी औरंगाबाद क्षेत्रीय कार्यालयातर्फे निधी तुमच्या दारी हा
उपक्रम राबवण्यात येतो. त्याच धर्तीवर आता दर सोमवारी बैठक घेण्यात येणार असून, यात
पीएफसंबंधीच्या तक्रारी सोडविल्या जाणार असल्याची माहिती सहायक आयुक्त तुषार जाधव यांनी
दिली. कर्मचारी भविष्य निधी विभागाच्या सिडकोतल्या कार्यालयात उद्या क्षेत्रीय आयुक्त
एम. एच. वारसी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार असल्याचं कळवण्यात आलं आहे.
*****
***
No comments:
Post a Comment