Saturday, 28 September 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 28.2019 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२८  सप्टेंबर  २०१९ सकाळी ११.०० वाजता
****

 मानवतेच्या रक्षणासाठी जागतिक समुदायानं दहशतवादाविरुद्ध एकवटण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत काल न्यूयॉर्क इथं केलं. देशाचा विकास, हवामान बदलाचा सामना आणि दहशतवादाला विरोध या मुद्यांवर त्यांनी यावेळी भर दिला. दहशतवादासंदर्भात संयुक्त राष्ट्रांच्या सदस्यांमधले मतभेद या संघटनेच्या उद्दिष्टांनाच हरताळ फासतात असं ते म्हणाले. भगवान गौतम बुद्ध, स्वामी विवेकानंद आणि महात्मा गांधी यांची शांतीची शिकवण ही भारताची जगाला भेट आहे त्यामुळेच दहशतवादा विरोधात भारताच्या पुढाकाराला विशेष महत्त्व आहे असं पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितलं.
****

 राज्यभरात जवळपास सगळ्याच मतदार संघात इच्छुकांनी उमेदवारी अर्ज घ्यायला सुरुवात केली. अनेक मतदार संघातून इच्छुकांनी काल अर्ज दाखलही केले. उस्मानाबाद जिल्ह्यात परंडा इथं आर्यन राजे शिंदे यांनी अपक्ष तर औरंगाबाद पूर्व मतदारसंघात विशाल नांदरकर यांनी भारतीय जनता पक्षाच्यावतीनं आणि कन्नड मतदारसंघातून एकानं उमेदवारी अर्ज भरला. नांदेड उत्तर आणि नांदेड दक्षिण या दोन विधानसभा मतदार संघातून प्रत्येक एक असे एकूण दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. पंढरपूर विधानसभा मतदारसंघात अक्कलकोट इथं काल एक उमेदवारी अर्ज दाखल झाला. ठाणे विधानसभा मतदार संघात भारतीय रिपब्लिकन पक्ष आठवले गटाकडून भगवान भालेराव यांनी, अमरावती जिल्ह्यातल्या बडनेरा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून संजय भोंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. गडचिरोली जिल्ह्यातल्या आरमोरी, अहेरी, आणि नाशिक पूर्वमधे प्रत्येकी एका उमेदवाराचा अर्ज दाखल झाला आहे.
****

नांदेड जिल्ह्यात परतीचा पाऊस चांगला होत असून, जिल्ह्यातली बारुळ आणि मनार ही दोन धरणं पूर्ण भरली आहेत. या पावसाचा सोयाबीन कापणीवर विपरीत परिणाम होत आहे.

दरम्यान औरंगाबाद शहरात काल मध्यरात्रीच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला.
*****
***

No comments: