Saturday, 21 September 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 21.09.2019 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२१  सप्टेंबर  २०१९ सकाळी ११.०० वाजता
****

 भारत आणि मंगोलियानं अंतराळ, आपत्ती व्यवस्थापन, सांस्कृतिक क्षेत्रांसह विविध क्षेत्रात काल सामंजस्य करार केले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि भारत दौऱ्यावर आलेले मंगोलियाचे राष्ट्रपती खाल्तमागीन बट्टुल्गा यांच्या उपस्थितीत या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. मंगोलियाच्या नागरिकांसाठी भारतानं सुरू केलेल्या ई व्हिसा योजनेच्या धर्तीवर मंगोलियानंही भारतातल्या पर्यटकांसाठी अल्पावधीसाठी व्हिसा ऑन अराइवल योजना जाहीर केली. मंगोलियातल्या पेट्रो केमिकल, रिफायनरी प्रकल्पासाठी भारतानं २३ कोटी ६० लाख डॉलर्स अतिरिक्त कर्जाची घोषणा केली. 
****

 पंजाब मधल्या सुलतानपूर लोधी इथं श्री गुरुनानक देवजी यांच्या पाचशे पन्नासाव्या जन्मदिननिमित्त साजऱ्या होणाऱ्या प्रकाशपर्व या कार्यक्रमासाठी नांदेड- फिरोजपूर - नांदेड ही विशेष रेल्वे गाडी सुरू करण्यात येणार आहे. ५, १२, १९, २६ ऑक्टोबर आणि २, ९, १६ नोव्हेंबरला ही गाडी सकाळी नऊ वाजता नांदेड इथून सुटेल आणि फिरोझपूर इथं दुसऱ्या दिवशी रात्री १० वाजून ५० मिनिटांनी पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी फिरोझपूरहून रात्री दीड वाजता सुटेल आणि नांदेडला दुसऱ्या दिवशी दुपारी एक वाजता पोहोचेल. पूर्णा, वसमत, हिंगोली, वाशिम, अकोलामार्गे ही गाडी धावणार आहे.
****

 सांगली जिल्ह्यातील  शिराळा इथं एका औद्योगिक कारखान्यावर दहशतवाद विरोधी पथकानं छापा टाकला. मँफेडँन या घातक अंमलीपदार्थ निर्मितीचा हा कारखाना यावेळी सील करण्यात आला. याप्रकरणी सरदार पाटील या संशयितास अटक करण्यात आली. या कारवाईत १३३  किलो अंमली पदार्थ आणि एक कोटी रुपये रोकड जप्त करण्यात आली.
****

 हिंगोली जिल्ह्याच्या सेनगाव तालुक्यातल्या गुगुळ पिंपरी इथल्या ग्रामसेवकास दीड हजार रुपयांची लाच स्वीकारताना काल रंगेहात अटक करण्यात आली.
*****
***

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 15.08.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 15 August 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्...