Wednesday, 25 September 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 25.09.2019 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 25 September 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक  सप्टेंबर २०१ सकाळी ७.१० मि.
**** 

Ø  महाराष्ट्र राज्य सहकारी बँक कर्जवाटप प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह ७० जणांविरुद्ध सक्तवसुली संचालनालयानं केला गुन्हा दाखल
Ø  ुबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकात उभारणीच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा आरोप
Ø  विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या २२ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; एमआयएमचेही पाच उमेदवार घोषित 
Ø  सातारा लोकसभेची पोटनिवडणूकही विधानसभा निवडणुकीबरोबरच घेण्याचा केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय
आणि
Ø  महानायक अमिताभ बच्चन यांना यावर्षीचा भारतीय चित्रपट सृष्टीतला सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर
****


महाराष्ट्र राज्य सहकारी बँक कर्जवाटप अनियमितता प्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांचे पुतणे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ७० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवला असल्याचं संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलतांना सांगितलं. मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या प्रथम माहिती अहवालाच्या आधारे हा गुन्हा नोंदवण्यात आला असून, यात बँकेच्या काही माजी संचालकांचाही समावेश आहे. २००५ ते २०१० या कालावधीत बॅकेनं केलेल्या कर्जवाटपात अनियमितता आढळल्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेनं या बँकेवर प्रशासकाची नियुक्ती केली होती.
****

 विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीची २२ उमेदवारांची पहिली यादी काल जाहीर झाली. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काल मुंबईत वार्ताहरांशी बोलताना ही माहिती दिली. लातूर जिल्ह्यातल्या लातूर शहर मतदारसंघातून मणियार राजासाब, तर औसा मतदारसंघातून सुधीर शंकरराव पोतदार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्याचबरोबर या यादीत पश्चिम महाराष्ट्रातल्या १३, विदर्भातल्या सहा, आणि उत्तर महाराष्ट्रातल्या एका उमेदवाराचा समावेश आहे. एमआयएम पक्षानंही काल मुंबईतल्या पाच मतदासंघांसाठी आपले उमेदवार जाहीर केले. यात विद्यमान आमदार वारिस पठाण यांचा समावेश आहे. 
****

 सातारा लोकसभेची पोटनिवडणूकही विधानसभा निवडणुकीबरोबरच येत्या २१ ऑक्टोबरला घेण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगानं घेतला. मुंबई उच्च न्यायालयात या संदर्भात एक याचिका प्रलंबित असल्यानं, आयोगानं या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर करण्याचा निर्णय स्थगित केला होता. न्यायालयानं या संदर्भात आदेश दिल्यानंतर काल ही घोषणा करण्यात आली. 
****

 मुंबईत अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकातच भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं केला आहे. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी काल मुंबईत वार्ताहरांशी बोलताना, मुख्यमंत्र्यांनी या आरोपाचा खुलासा करावा, अशी मागणी केली.
****

 केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा उद्याचा मुंबई दौरा रद्द झाल्याची माहिती पक्ष सूत्रानं दिली. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत युतीबाबत अद्याप निर्णय होत नसल्यामुळे शहा यांचा दौरा रद्द झाल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. शहा मुंबईत येऊन भाजप - शिवसेना युतीची औपचारिक घोषणा करणार होते.
****

 विधानसभेच्या जागावाटपाबाबत शिवसेनेसोबतची चर्चा अंतिम टप्प्यात असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लवकरच युतीबाबत घोषणा करतील, असं भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. शिवसेना भाजप युती या निवडणुकीत दोनशे वीस जागा जिंकेल, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला.
****

 दरम्यान, भारतीय जनता पक्ष जर दिलेला शब्द पाळणार नसेल, तर त्यांनी आत्मपरीक्षण करायला हवं, असं शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. लोकसभा निवडणुकीच्या वेळीच विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाचं समीकरण ठरलं असल्याचा पुनरुच्चार राऊत यांनी यावेळी केला. दोन्ही पक्षांना समसमान जागा वाटप आणि अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाची मागणी शिवसेनेकडून केली जात असल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
.
 पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक-पीएमसी बँकेवर भारतीय रिजर्व्ह बँकेनं निर्बंध घातले असून, बँकेचे सर्व व्यवहार बंद करण्यात आले आहेत. पीएमसी बँक डबघाईला आल्यानं रिजर्व्ह बँकेनं ही कारवाई केली. हे निर्बंध सहा महिन्यांसाठी असून, या निर्बंधांमुळे खातेदारांना फक्त एक हजार रुपये काढता येणार आहेत. बँकेचा कामकाजाचा आढावा घेऊन पुढचा निर्णय घेतला जाईल असं रिजर्व्ह बँकेनं म्हटलं आहे.
****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****

 महानायक अमिताभ बच्चन यांना यावर्षीचा भारतीय चित्रपट सृष्टीतला सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कारासाठी त्यांची एकमतानं निवड झाली. माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल ट्विटरद्वारे ही घोषणा केली. आपल्या बहारदार अभिनयानं दोन पिढ्यांचं मनोरंजन करणाऱ्या अमिताभ बच्चन यांना हा पुरस्कार मिळाल्यानं संपूर्ण देश आनंदी असल्याचं जावडेकर यांनी म्हटलं आहे. पाच दशकांच्या कारकिर्दीत बच्चन यांच्या आठवणीत राहणाऱ्या अनेक भूमिका आहेत. त्यांना चार वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलं आहे.
****

 राज्यात भारतीय जनता पक्षाचे वारे असून, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी विधानसभा निवडणूक लढवू नये, असा सल्ला शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिला आहे. ते काल नांदेड इथं वार्ताहरांशी बोलत होते. तावडे यांच्या हस्ते काल नांदेड इथं भाजपच्या मिडिया सेंटर वॉर रुमचं उद्घाटन करण्यात आलं. 

 दरम्यान, तावडेंच्या टिकेला उत्तर देताना चव्हाण यांनी, भाजपला माझ्या विरोधात लढण्यासाठी स्वत:च्या पक्षात उमेदवार मिळाला नाही, ईतर पक्षातून आयात केलेला उमेदवार उभा करावा लागत असल्याची टिका केली.
****

 केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता असताना ग्रामीण भागातला शेवटचा माणूस तर विकासापासून दूरच आहे, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. परळीत ते काल बोलत होते. आमदार, मंत्री पंकजा मुंडे या परळीचा विकास करण्यात अपयशी ठरल्याची टिका त्यांनी यावेळी केली.
****

 नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या विलास युवक महोत्सवाचा काल लातूर जिल्ह्यातल्या बाभळगाव इथं समारोप झाला. यावेळी प्र-कुलगुरु जोगेंद्रसिंह बिसेन, विलास सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षा वैशाली देशमुख, सुप्रसिद्ध मराठी पार्श्वगायक मंगेश बोरगावकर, नकलाकार बालाजी सूळ, युवक महोत्सवाचे स्वागताध्यक्ष धीरज देशमुख उपस्थित होते.  या युवक महोत्सवामध्ये विद्यापीठ परिक्षेत्रातल्या ८१ महाविद्यालयाच्या अकराशे विद्यार्थी कलावंतांनी सहभाग घेतला होता.
****

 राज्यात कालही अनेक भागात पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यातल्या अनेक भागात, तसंच उस्मानाबाद शहरात काल रात्री जोरदार पाऊस झाला. सांगली आणि सातारा जिल्ह्यातही मुसळधार पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे.
****
 जालना जिल्ह्यातल्या परतूर इथं पोलिसांनी काल रेल्वेस्थानक परिसरात एका ट्रकमधून १५ लाख ६० हजार रुपये किमतीचा अवैध गुटखा जप्त केला. या प्रकरणी उस्मानाबाद जिल्ह्यातल्या दोन संशयितांविरुध्द अन्न सुरक्षा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****

 हिंगोली शहरात अण्णा भाऊ साठे नगर इथं उभारण्यात येत असलेल्या कत्तलखान्याचे काम तत्काळ थांबवावं, या मागणीसाठी संतप्त नागरिकांनी नगर पालिकेत मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षासमोर काल ठिय्या आंदोलन केलं. यावेळी संतप्त महिलांनी प्रशासनाच्या विरोधात घोषणा दिल्या.
*****
***

No comments: