Regional Marathi
Text Bulletin, Aurangabad
Date – 29
September 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९ सप्टेंबर २०१९ दुपारी १.०० वा.
****
युवा पिढी हे देशाचं
भवितव्य आहे. नशेच्या व्यसनांमुळे युवकांची पिढी उध्वस्त होऊ नये, यासाठीच सरकारनं
ई-सिगारेटवर निर्बंध लावले आहेत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं. आकाशवाणीवरच्या
मन की बात या कार्यक्रमात ते बोलत होते. तंबाखूचं व्यसन सोडून द्या आणि ई-सिगारेटबाबत
कोणतेही गैरसमज बाळगू नका, असं सांगत त्यांनी आरोग्यपूर्ण भारताच्या निर्मितीसाठी संकल्प
करण्याचं आवाहन केलं. पर्यटनाविषयीच्या स्पर्धात्मक निर्देशांकात भारताच्या स्थानात
सुधारणा झाल्याचंही त्यांनी सांगितलं.
सध्या देशभरात सुरू झालेल्या
नवरात्र, गरबा, दुर्गा पूजा आणि येणाऱ्या दसरा, दिवाळी, भाऊबीज, छठपूजा अशा सर्व सणांनिमित्त
पंतप्रधानांनी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या. आपल्या संस्कृतीमध्ये मुलींना लक्ष्मी
मानलं गेलं आहे. त्यामुळे येत्या दिवाळीत गावांमध्ये, शहरांमध्ये मुलींच्या सन्मानार्थ
कार्यक्रमांचं आयोजन करून नव्या पद्धतीनं लक्ष्मीचं स्वागत करावं. आपल्या मुलींच्या
यशाबद्दल सोशल मीडियाच्या माध्यमातून अधिकाधिक माहिती शेअर करावी आणि ‘भारत की लक्ष्मी’
या हॅशटॅगचा वापर करावा, असंही नरेंद्र मोदी यांनी सुचवलं.
दिवाळीत कुठेही फटाक्यांमुळे
आगीच्या दुर्घटना होऊ नयेत, कोणाचं नुकसान होऊ नये, यासाठी खबरदारी घेण्याची सूचनाही
त्यांनी केली. तसंच २ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या सिंगल युज प्लास्टिक मुक्ती मोहिमेत
सहभागी होण्याचं आवाहनही त्यांनी केलं. येत्या १३ ऑक्टोबरला पोप फ्रान्सिस यांच्याकडून
मरियम थ्रेसिया यांना संत पद घोषित केलं जाईल. यानिमित्त पंतप्रधानांनी सिस्टर मरियम
थ्रेसिया यांना श्रद्धांजली अर्पण करत, देशातल्या ख्रिस्ती नागरिकांचं अभिनंदन केलं.
****
महाराष्ट्र आणि हरियाणात
होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतल्या उमेदवारांच्या नावांवर चर्चा करण्यासाठी भारतीय जनता
पक्षाची मध्यवर्ती निवडणूक समिती आज संध्याकाळी बैठक घेणार आहे. नवी दिल्ली इथं पक्षाच्या
मुख्यालयात होणाऱ्या या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा आणि
पक्षाचे अन्य ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
दोन्ही केंद्रीय मतदारसंघांतील
उमेदवारांची नावे निश्चित करण्यासाठी कॉंग्रेस मध्यवर्ती निवडणूक समितीची बैठक उद्या
होणार आहे.
****
राज्यात मतदारांची संख्या वाढल्यानं आगामी
विधानसभा निवडणुकीसाठी एक हजार १८८ सहायक मतदान केंद्रं सुरू करण्यात येणार
आहेत. त्यामुळे राज्यात मतदान केंद्राची एकूण संख्या ९६ हजार
६६१ एवढी असणार आहे. साधारणपणे चौदाशे
मतदारांमागे एक मतदान केंद्र, असं
प्रमाण आहे. गेल्या काही दिवसांत मतदारांना नाव नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली होती, यामध्ये मतदारांची वाढ झाल्याचं
दिसून आल्यानं मतदान केंद्रंही वाढवण्यात
आल्याचं निवडणूक आयोगानं जाहीर केलं आहे.
****
विधानसभा निवडणुकीत प्रशासनानं विविध पथकांची नियुक्ती
केली आहे. स्थायी पथक, व्हिडीओ सर्वेक्षण पथक आणि तपासणी नाका पथकांमधील कर्मचाऱ्यांनी
निवडणूक प्रक्रियेत प्रामाणिकपणे काम करावं. उमेदवारांच्या खर्चावर बारकाईनं लक्ष ठेवून
प्रत्येक खर्चाची नोंद करावी, अशा सूचना बुलढाण्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक
अधिकारी डॉ. निरूपमा डांगे यांनी आज दिल्या. या सर्व पथकांच्या समन्वय बैठकीत त्या
बोलत होत्या.
****
नवरात्र महोत्सवानिमित्त पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी
मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. रुक्मिणी मंदिरात फुलांची,
तर विठ्ठल मंदिरात तुळशीच्या पानांची आरास करण्यात आली आहे. चौथ्या माळेला रुक्मिणीला
फुलांची साडी, तर दसऱ्याच्या दिवशी सोन्याची साडी नेसवण्यात येणार असल्याची माहिती
मंदिर प्रशासनाचे प्रभारी अधिकारी गजानन गुरव आणि व्यवस्थापक बालाजी गुरव यांनी दिली.
****
बेल्जियम इथं सुरू असलेल्या हॉकी
सामन्यांमध्ये भारताच्या पुरूष हॉकी संघानं जागतिक क्रमवारीत ८ व्या क्रमांकावर
असलेल्या स्पेन संघाचा ६-१ नं पराभव केला.
*****
***
No comments:
Post a Comment