Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 02
September 2019
Time 18.00 to
18.05
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०२ सप्टेंबर २०१९ सायंकाळी
६.००
****
राज्य सहकारी बँकेतील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याची चौकशी बंद
करण्याचा आदेश द्यायला सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. पोलिस स्वतंत्र आणि निपक्षपणे
या प्रकरणाची चौकशी करतील, असे आदेश न्यायालयानं दिले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि
राज्याचे माजी उप मुख्यमंत्री
अजित पवार आणि अन्य एकोणसत्तर जणांनी
त्यांच्याविरुद्ध एक हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी प्रथम माहिती अहवाल
नोंदवण्याच्या आदेशाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं अजित पवार आणि इतरांविरुद्ध
भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांतर्गत गेल्या २६ ऑगस्ट
रोजी प्रथम माहिती अहवाल नोंदवला आहे. उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली कोणत्याही
दबावाशिवाय ही चौकशी सुरू राहील, असंही खंडपीठानं म्हटलं आहे. शेतकरी आणि कामगार
पक्षाचे नेते जयंत पाटील तसंच राज्याच्या चौतीस जिल्ह्यांतून
निलंबित करण्यात आलेले बँक कर्मचारी या प्रकरणी आरोपींमध्ये समाविष्ट आहेत.
राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक - नाबार्ड तसंच राज्य सहकारी समिती
अधिनियमाच्या अंतर्गत अर्ध न्यायिक चौकशी आयोगानंही या प्रकरणी अहवाल सादर केला
होता. त्यात अजित पवार आणि इतरांच्या निर्णयांमुळं बँकेचं नुकसान झाल्याचा आरोप
करण्यात आला होता.
****
राज्याच्या अपारंपरिक ऊर्जेला
प्रोत्साहन देत राज्यानं निश्चित केलेल्या चौदा हजार चारशे मेगावॅट वीज निर्मितीपैकी
बारा हजार मेगावॅट अपारंपरिक ऊर्जा निर्मितीत राज्य यशस्वी झाल्याची अशी माहिती उर्जामंत्री
चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. बुलढाणा जिल्ह्यातल्या शेगाव इथल्या संत गजानन
महाराज संस्थानच्या आनंद विहार इथं महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण आणि गजानन महाराज
संस्थान यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित पारेषण संलग्न सौर विद्युत प्रकल्पाच्या
उद्घाटनाप्रसंगी ते आज बोलत होते. अपांरपारिक उर्जेचा वापर वाढविण्यासाठी शासन विविध
निर्णय घेत असून, बुलढाणा जिल्ह्यातल्या सर्व
शाळा, अंगणवाड्या, प्राथमिक आरोग्य केंद्रांना सौर ऊर्जेवर आणण्यात येणार असल्याची
माहितीही उर्जा मंत्री बावनकुळे यांनी यावेळी दिली.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोडचे
काँग्रेसचे माजी आमदार अब्दुल सत्तार यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. सत्तार यांनी
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज मातोश्री या त्यांच्या निवासस्थानी
शिवसेनेत प्रवेश केला. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अब्दुल सत्तार यांनी बंडखोरी करून
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती.
****
आज गणेश चतुर्थी. अनंत चतुर्दशी पर्यंत दहा दिवस चालणारा
गणेशोत्सव देशभरात भक्तिभावानं साजरा होत आहे. राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह
दिसून येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईतल्या वर्षा या शासकीय निवासस्थानी
गणपतीची प्रतिष्ठापना केली. मुख्यमंत्र्यांनी राज्यातल्या जनतेलाही गणेशोत्सवाच्या
शुभेच्छा दिल्या आहेत. गणरायांनं सर्वांना संकंटांचा सामना करण्यासाठी बळ द्यावं तसंच पूरग्रस्त बांधवांना समाधान द्यावं असं साकडं त्यांनी गणरायाला
घातलं. जालना शहरासह जिल्ह्यात विघ्नहर्त्या गणरायाचं ढोल ताशांचा गजरात आगमन झालं.
घरगुती तसंच सार्वजनिक मंडळांमध्ये गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. जिल्ह्याचं
आराध्य दैवत असलेल्या राजूरच्या गणपतीची जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या हस्ते
सपत्निक महापूजा करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. परभणी इथंही गणेशोत्सवाला
मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे.
****
परभणी जिल्ह्यात दोन दिवसापासून होत असलेल्या पावसामुळं
गोदावरी नदीच्या पाण्याची आवक वाढली आहे, त्यामुळे नांदेड शहराला पाणीपुरवठा करणारा
विष्णुपुरी प्रकल्प पुर्णपणे भराला असून वरच्या भागातील पावसाचा आणि येणाऱ्या पाण्याचा
अंदाज घेऊन विष्णूपूरी प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. या पार्श्र्वभूमीवर
नांदेड जिल्हा प्रशासनानं गोदावरी नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.
****
परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यात मुसळधार पावसानं एका
रात्रीत थैमान घातल्यानं पेंडू नदी, पालम जवळील लेंडी नदी आणि केरवाडी जवळील गळाटी
नदीला पूर येऊन आजूबाजूच्या शेकडो हेक्कटर जमिनीवरील खरिपाची पिकं वाहून गेली आहेत.
पशूधन, शेती अवजारंही पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं
आहे. पालम तालुक्यातील अकरा गावांचा संपर्क आज सायंकाळपर्यंतही तुटलेला होता.
****
वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघाट इथं वणा नदी पात्रात गौरी
विसर्जनाला गेलेल्या मायलेकांसह चार जणांचा पाण्यात बुडून मृ्त्यू झाल्याची दुर्दैवी
घटना आज घडली. यापैकी एकाचा मृतदेह सापडला असून आणखी तिघांच्या शोध सुरू आहे.
****
No comments:
Post a Comment