Monday, 2 September 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 02.09.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 02 September 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०२ सप्टेंबर २०१ दुपारी .०० वा.
****

 पाकिस्तानच्या अटकेतील भारतीय नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांची आज भारतीय दुतावासातील वरिष्ठ राजदूत भेट घेत आहेत. आंतरराष्ट्रीय न्यायालयानं दिलेल्या आदेशानुसार दूतावासाची मदत देण्यास पाकिस्ताननं होकार दिला होता. त्यानुसार ही भेट होत असल्याचं वृत्त पीटीआयनं दिलं आहे. नक्की कोणते अधिकारी भेट घेत आहेत, याचा तपशील स्पष्ट व्हायचा आहे. पाकिस्ताननं काल या संदर्भातील प्रस्ताव दिला होता. आंतरराष्ट्रीय न्यायालयानं दिलेले आदेश लक्षात घेऊन ही भेट मुक्त, अर्थपूर्ण आणि परिणामकारक व्हावी यासाठी पाकिस्तान चांगलं वातावरण ठेवेल अशी आशा भारतानं व्यक्त केली आहे.
****

 राम जन्मभूमी बाबरी मशीद विवादाप्रकरणी मुस्लीम पक्ष मांडत असलेले ज्येष्ठ विधिज्ज्ञ राजीव धवन यांच्या अवमान प्रकरणी उद्या सुनावणी करणार असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. अवमान याचिकेवर विचार केला जाईल, असं सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यांच्या पीठानं राजीव धवन यांच्या वतीनं बाजू मांडत असलेले ज्येष्ठ विधिज्ज्ञ कपिल सिब्बल यांना आज सांगितलं. मुख्य याचिकाकर्ते एम. सिद्दीक आणि ऑल इंडिया मुस्लीम वक्फ बोर्डची बाजू मांडत असलेले विधिज्ज्ञ धवन यांनी त्यांना या प्रकरणाबद्दल धमक्या मिळत असल्याचं म्हटलं आहे.
****

 भारताच्या चांद्रयान दोन यानाच्या ऑर्बिटरपासून लँडर विक्रम वेगळा करण्याच्या महत्वाच्या प्रक्रियेसाठी इस्त्रो सज्ज आहे. आज दुपारी पावणे एक ते पावणे दोन दरम्यान नियोजित असल्याची माहिती इस्त्रोनं दिली आहे. ऑर्बिटरपासून वेगळा झाल्यानंतर लँडर विक्रिम चंद्राभोवती प्रदक्षिणा घालणं सुरुच ठेवत चंद्राच्या पृष्ठभागाच्या दिशेने प्रवास सुरु ठेवेल. चांद्रयान दोनचा चंद्राभोवतीचा आवर्ती मार्ग सुकर करण्यासाठी चांद्रयान दोनला चंद्राच्या कक्षेत अधिक जवळ पोहोचवण्याची पाचवी आणि अखेरची प्रक्रीया, इस्त्रोनं काल संध्याकाळी यशस्वीपणे पार पाडली होती.
****

 वैयक्तित प्राप्तीकर विवरणपत्र भरणाऱ्यांच्या संख्येत चार टक्क्यांची वाढ होऊन ती पाच कोटी पासस्ट लाखांवर पोहोचली आहे. सन २०१९ – २० साठीचं विवरणपत्र भरण्याची मुदत एकतीस ऑगस्ट रोजी संपली, त्यानंतर केंद्रीय प्राप्तीकर विभागानं जाहीर केलेल्या आकडेवारीत ही बाब समोर आली आहे. यासह एकाच दिवशी प्राप्तीकर विवरणपत्राची इ-फायलिंग करण्याचाही विक्रम यावेळी प्रस्थापित झाला असून, एकतीस ऑगस्ट या दिवशी सुमारे पन्नास लाख लोकांनी त्यांची विवरणपत्रं ऑनलाईन दाखल केल्याचंही विभागानं सांगितलं आहे.
****

 आज गणेशचतुर्थी. महाराष्ट्रसह देश-परदेशात उत्साहात साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाला आज गणपती बाप्पाच्या आगमनासह प्रारंभ होत आहे. बाप्पाच्या आगमनाची आतुरता, त्याच्या स्वागताची लगबग आणि त्याच्या सेवेचा आंनद लहानथोंरामधे ओसाडून वाहत आहे. पावसाचं वातावरण असतानाही गणपतीच्या स्वागतासाठी विविध वस्तूंची खरेदी करण्यासाठी बाजारपेठा गर्दीनं फुलून गेल्या आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियाना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
****

 नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेघा पाटकर याचं नवव्या दिवशीही उपोषण सुरूच असून त्यांची प्रकृती खालावल्याची माहीती त्यांच्या सहकाऱ्यांनी दिली आहे. नर्मदा धरणामुळं विस्थापित झालेल्या लोकांच्या मागण्यांसाठी त्या गेल्या नऊ दिवसांपासून मध्यप्रदेशातल्या बडवानी जिल्ह्यात उपोषणाला बसलेल्या आहेत.
****

 औरंगाबाद इथल्या देवगिरी महानंद जिल्हा दूध उत्पादक संघानं, दुधाच्या दरात लीटरमागे दोन रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे दुधाचा किरकोळ विक्री दर ४२ रुपये प्रतिलीटर असा राहील. दुधाच्या खरेदी दरातही महानंदनं प्रतिलीटर एक रुपयानं वाढ केली आहे. त्यानुसार दूध उत्पादकांना लीटरमागे २८ रुपये दर दिला जाणार आहे.
****

 नांदेड जिल्ह्यात मुदखेड, अर्धापूर तालुक्यात काल रात्री पासून जोरदार पाऊस होत आहे. नांदेड शहरात मात्र आज पावसानं विश्रांती घेतल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. परभणी जिल्ह्यातही काल संध्याकाळनंतर चांगला पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. 
****

 सांगली जिल्ह्यातल्या कडकनाथ कोंबडी पालन घोटाळा प्रकरणी महारयत ॲग्रोचा संचालक हनुमंत जगदाळे याला पोलिसांनी अटक केलं आहे.

दरम्यान, आडीचशे जणांच्या तक्रारी असलेल्या या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या संदिप मोहीते याला न्यायालयानं चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. कंपनीचा अध्यक्ष  सुधीर मोहिते हा अद्याप फरारी आहे.
*****
***

No comments: