Tuesday, 3 September 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 03.09.2019 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 03 September 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक -०३ सप्टेंबर २०१ सकाळी ७.१० मि.
****

Ø  राज्य सहकारी बँकेतल्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याची चौकशी बंद करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
Ø  दहा दिवसाच्या गणेशोत्सवाला उत्साहात प्रारंभ; ढोल ताशाच्या गजरात, गणरायाचं आगमन  
Ø  औरंगाबाद जिल्ह्यातले सिल्लोडचे काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांचा शिवसेनेत प्रवेश
आणि
Ø  वेस्ट इंडिज विरूद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतााचा २५७ धावांनी विजय; दोन सामन्याची मालिकाही जिंकली
****

 राज्य सहकारी बँकेतल्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याची चौकशी बंद करण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार आणि अन्य सत्तर जणांविरोधात प्राथमिक माहिती अहवाल- एफ आय आर दाखल करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यासही सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. आरोपी असलेल्या अकरा संचालकांनी या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात वेगवेगळ्या सहा याचिका दाखल करून चौकशीला स्थगिती देण्याची मागणी केली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या देखरेखीत या प्रकरणाची चौकशी सुरू ठेवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत.

 २००७ ते २०११ या काळात बँकेच्या संपत्तीची विक्री, स्वस्त व्याजदराने कर्जवाटप, आणि कर्जाची परतफेड न होणं, या कारणांमुळे बँकेचं सुमारे एक हजार कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे.

 मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांतर्गत गेल्या २६ ऑगस्ट रोजी प्राथमिक माहिती अहवाल नोंदवला आहे.
****

 आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या आदेशानंतर पाकिस्ताननं भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांना काल भारतीय वकिलातीशी संपर्क करण्यास अनुमती दिली. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये एका तुरुंगात, भारतीय उपउच्चायुक्त गौरव अहलुवालिया यांनी काल जाधव यांची भेट घेतली. सुमारे दोन तास या दोघांमध्ये चर्चा झाल्याचं वृत्त आहे. यावेळी दोघांच्या संभाषणात भाषेचं कोणतंही बंधन पाकिस्ताननं ठेवलं नव्हतं, मात्र पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या संभाषणाच्या नोंदी पाकिस्ताननं ठेवल्या आहेत.
****

 भारताच्या चांद्रयान-२चं विक्रम लँडर काल दुपारी ऑर्बिटरपासून यशस्वीरित्या वेगळं करण्यात आलं. चंद्राच्या पृष्ठभागापर्यंतच्या प्रवासातला हा मुख्य टप्पा यशस्वीरित्या पार करण्यात भारतीय अवकाश संशोधन संस्था - इस्रोचे वैज्ञानिक काल दुपारी यशस्वी झाले. आजपासून पाचव्या दिवशी, येत्या शनिवारी, सात सप्टेंबरला विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल.
****

 बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यात बहुतांश ठिकाणी पुढचे पाच दिवस पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केला आहे. कोकणसह मुंबई, ठाण्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता असून, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

दरम्यान, मुंबईसह उपनगरात पाऊस सुरु झाला असून, सखल भागात पाणी साचलं आहे. ठाणे, नवी मुंबई परिसरातही हा पाऊस पडत असल्याचं वृत्त आहे.  
****

 दहा दिवसाच्या गणेशोत्सवाला कालपासून देशभरात उत्साहात प्रारंभ झाला. देशभरात ढोल ताशाच्या गजरात, वाजत गाजत गणरायाचं आगमन झालं. मुख्यमंत्र्यांनी राज्यातल्या जनतेलाही गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. दिल्लीत महाराष्ट्र सदनातही गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली.

 मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये गणरायाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. औरंगाबाद इथं ग्रामदैवत असलेल्या संस्थान गणपतीची विधीवत पूजा करून गणरायाची स्थापना करण्यात आली. जालना जिल्ह्याचं आराध्य दैवत असलेल्या राजूरच्या गणपतीची जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या हस्ते सपत्निक महापूजा करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन पर्यावरणवादी संघटनांच्यावतीनं करण्यात येत होतं, या पार्श्वभूमीवर यंदा शाडू मातीच्या गणेशाची मूर्ती खरेदी करण्याकडे भाविकांचा कल दिसून आला. थर्मोकोलऐवजी कागदी तसंच फुलांचे मखर खरेदी करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
****

औरंगाबाद जिल्ह्यातले सिल्लोडचे काँग्रेसचे माजी आमदार अब्दुल सत्तार यांनी काल मुंबईत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. ठाकरे यांनी शिवबंधन बांधून सत्तार यांचं शिवसेनेत स्वागत केलं. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अब्दुल सत्तार यांनी बंडखोरी करून काँग्रेसचा राजीनामा दिला होता. त्यानंतर काल त्यांनी आमदारकीचाही राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्याकडे सादर केला. सत्तार यांच्या शिवसेना प्रवेशानंतर सिल्लोड, सोयगाव तालुक्यात त्यांच्या समर्थकांनी जल्लोष करत, त्यांच्या या निर्णयाला पाठिंबा दर्शवला.
****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****

 परभणी जिल्ह्याच्या पालम तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पेंडू नदी, पालम जवळची लेंडी नदी आणि केरवाडी जवळील गळाटी नदीला पूर येऊन आजूबाजूच्या शेकडो हेक्टर्स जमिनीवरची पीकं वाहून गेली आहेत. पशूधन, शेती अवजारंही पुराच्या पाण्यात वाहून गेल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. या पुरामुळे पालम तालुक्यातल्या अकरा गावांचा संपर्क काल सायंकाळपर्यंतही तुटलेला होता.

 दरम्यान, परभणी जिल्ह्यात दोन दिवसापासून होत असलेल्या या पावसामुळे गोदावरी नदीच्या पाण्याची आवक वाढली आहे, त्यामुळे नांदेड शहराला पाणीपुरवठा करणारा विष्णुपुरी प्रकल्प पूर्ण भरला असून पावसाचा आणि नदीला येणाऱ्या पाण्याचा अंदाज घेऊन विष्णुपूरी प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. या पार्श्र्वभूमीवर नांदेड जिल्हा प्रशासनानं गोदावरी नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.
****

 यजमान वेस्ट इंडिज विरूद्धचा दुसरा कसोटी क्रिकेट सामना भारतानं २५७ धावांनी जिंकला आहे. या विजयाबरोबरच भारतानं दोन सामन्यांची मालिकाही दोन - शून्यनं जिंकली आहे. दुसऱ्या डावात भारतानं दिलेल्या ४६८ धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ २१० धावांवर सर्वबाद झाला. रविंद्र जडेजा आणि मोहम्मद शमीनं प्रत्येकी तीन गडी बाद केले. भारताच्या हनुमा विहारीला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. या विजयामुळे भारत आंतरराष्ट्रीय क्रिकेट महासंघ - आयसीसीच्या जागतिक कसोटी सामन्याच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी आला आहे.
****

 रिओ दी जेनेरियो इथं झालेल्या आय एस एस एफ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या मनू भाकेर आणि सौरभ चौधरी या जोडीनं १० मीटर एअर पिस्टलच्या मिश्र दुहेरी गटात सुवर्णपदक पटकावलं आहे, त्यांनी भारताच्याच यशस्विनी देसवाल आणि अभिषेक वर्मा या जोडीचा पराभव केला. त्यांना रौप्य पदक मिळालं आहे. काल अपूर्वी चंदेला आणि दिपक कुमार यांनी सुवर्ण पदक पटकावलं होतं. त्यांनी चीनच्या जोडीचा पराभव केला. तर अंजुम मौदगिल आणि दिव्यांश सिंह या जोडीनं हंगेरीच्या जोडीचा पराभव करत कांस्य पदक पटकावलं. या स्पर्धेत भारतानं पाच सुवर्ण, दोन रौप्य आणि तीन कांस्य पदकासह एकूण दहा पदकं जिंकली आहेत.
****

 महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डात मुत्तवल्ली या वर्गातून पुरुष गटातून डॉ. मुदस्सीर लांबे आणि महिला गटातून पैठणच्या रिजवाना शेख विजयी झाल्या आहेत. मुंबईत काल ही मतमोजणी पार पडली. महाराष्ट्र वक्फ मंडळाचे दोन सदस्य मुतवल्ली गटातून निवडण्यात येतात. यासाठी २९ ऑगस्टला मतदान झालं होतं.
****

 नांदेड जिल्ह्यातल्या बिलोलीचे उपविभागीय अधिकारी अमोलसिंह भोसले यांच्यासह तिघांजणांविरुद्ध दोन लाख रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवैध वाळू वाहतूक करणारे जप्त करण्यात आलेले दोन ट्रक सोडण्यासाठी त्यांनी ही लाच मागितली होती. याप्रकरणात एकाला अटक केली असून, उपविभागीय अधिकारी आणि अन्य एक जण फरार आहे.
****

 लातूर जिल्हा परिषदेनं जिल्हास्तरीय शिक्षक पुरस्कार काल जाहीर केले. प्रत्येक तालुक्यातून एक याप्रमाणे १० प्राथमिक शिक्षक, ५ माध्यमिक शिक्षक, क्रीडा- कला यातून एक शिक्षक आणि ५ शिक्षकांना विशेष पुरस्कार अशा एकूण २१ शिक्षकांना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत, परवा पाच सप्टेंबरला शिक्षकदिनी या पुरस्कारांचं वितरण केलं जाणार आहे.
****

 दक्षिण मध्य रेल्वेची नांदेड -औरंगाबाद-नांदेड ही नवीन विशेष गाडी आजपासून सुरू होत आहे. येत्या तीस सप्टेंबरपर्यंत ही गाडी चालवली जाणार आहे. आठ डब्यांची ही गाडी रविवार वगळता दररोज धावणार आहे.

*****
***

No comments: