Tuesday, 3 September 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 03.09.2019 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 03 September 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०३ सप्टेंबर २०१ सायंकाळी ६.००
****
आयएनएक्स मीडिया आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या अटकेत असलेले माजी केंद्रीय अर्थमंत्री पी.चिदंबरम यांची सीबीआय कोठडी सर्वोच्च न्यायालयानं, परवा गुरुवारपर्यंत कायम ठेवली आहे. चिदंबरम यांच्या वकीलांनी गुरुवारपर्यंत अंतरिम जामीनाची मागणी लावून धरू नये, असं न्यायालयानं म्हटलं आहे. चिदंबरम यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावणं आणि सीबीआयनं अटक करण्यासंदर्भात कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर परवा गुरुवारी सुनावणी होणार आहे.
****
भारतीय औद्योगिक विकास बँक - आयडीबीआय बँकेत नऊ हजार तीनशे कोटी रुपये एकरकमी भांडवली पुरवठ्याला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली. आयुर्विमा महामंडळ - एलआयसी आणि केंद्र सरकार मिळून हा आर्थिक पुरवठा करणार आहेत. यापैकी ५१ टक्के रक्कम एलआयसी तर उर्वरित एकोणपन्नास टक्के रक्कम केंद्र सरकार उभी करणार आहे.
****
अनुसूचित जमातीची जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी सात अतिरिक्त जात प्रमाणपत्र पडताळणी समित्या निर्माण करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. आज झालेल्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.
आदिवासी उच्च माध्यमिक आश्रमशाळांसाठी दोनशे चोपन्न अतिरिक्त विज्ञान शिक्षक नियुक्त करणं, तसंच महाबळेश्वरनजिक भिलार इथं राबवला जात असलेला ‘पुस्तकांचं गाव’ हा उपक्रम स्वतंत्र योजना म्हणून सुरू ठेवणं, आदी निर्णय आजच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले. गुरु-ता-गद्दी त्रिशताब्दी सोहळ्यासाठी परताव्याच्या अधीन राहून देण्यात आलेली ६१ कोटी रुपये ही रक्कम अनुदानात रुपांतरित करण्यासही राज्य मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली.
****
धरण व्यवस्थापनासाठी कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्य सरकार एक उच्चस्तरीय समिती नियुक्त करणार आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, नुकत्याच उद्भवलेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला. कर्नाटकातल्या अलमाटी धरणातून पुरेसा विसर्ग न झाल्यानं, कोल्हापूर तसंच सांगली जिल्ह्यात पूर आल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून केला जात आहे. कृष्णा पाणी वाटप लवादाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या, आंध्रप्रदेशच्या पाणी पुनर्वाटपाच्या मागणीचा दोन्ही नेत्यांनी एकमुखानं विरोध केला.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या सोयगाव नगर पंचायतीच्या शिवसेनेच्या नगराध्यक्षा प्रतिभा बोडखे यांच्या विरोधातला अविश्वास ठराव मंजूर झाला आहे. भारतीय जनता पक्षाच्या नऊ नगरसेवकांनी हा अविश्वास प्रस्ताव आणला होता. त्यावर आज चर्चा होऊन १३ विरूध्द शून्य मतांनी हा प्रस्ताव मंजूर झाला. शिवसेना आणि काँग्रेसचे प्रत्येकी दोन सदस्य मतदानाला गैरहजर राहिले.
****
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनेच्या वतीनं आज औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबीलमाफी देण्यात यावी, शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य देण्यात यावं, पिकांच्या जीएम बियाणांना परवानगी देण्यात यावी, यासह अन्य मागण्यांचं निवेदन यावेळी प्रशासनाला सादर करण्यात आलं.
अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेच्या वतीनंही आज खुलताबाद तहसील कार्यालयावर शेतकरी बचाव बैलगाडी मोर्चा काढण्यात आला.
****
नांदेड औरंगाबाद नांदेड या रेल्वेगाडीला पहिल्या दिवशी मिळालेला प्रतिसाद पाहता, या गाडीला आणखी सात डबे वाढवून देण्याची मागणी करण्यात येत आहे. यापैकी एक डबा वातानुकुलीत असावा, तसंच चार आरक्षित डबे असावेत, अशी मागणी प्रवासी संघटनेकडून करण्यात येत असल्याचं, आमच्या परभणीच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात ३१० गावांमध्ये एक गाव एक गणपती संकल्पना प्रत्यक्षात राबवली जात आहे. जिल्ह्यात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन हिंगोलीचे जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी केलं आहे.
दरम्यान, राज्यभरात दीड दिवसांच्या गणपतींचं आज विसर्जन करण्यात आलं. काल स्थापन झालेल्या या गणपतींना भाविकांनी श्रद्धेनं निरोप दिला.
****
महिला क्रिकेटपटू मिताली राजने टी ट्वेंटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. एकदिवसीय क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं, मितालीने सांगितलं.
****

No comments: