Tuesday, 3 September 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 03.09.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 03 September 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०३ सप्टेंबर २०१ दुपारी .०० वा.
****

 देशाची आर्थिक स्थिती खालावत असल्याचं, सरकारनं आता तरी कबूल करावं, असं काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी एका ट्वीटमध्ये म्हटलं आहे. जून महिन्यात संपलेल्या तिमाहीत राष्ट्रीय सकल उत्पन्नाचा दर पाच टक्क्यांवर खाली आल्याच्या बातमीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे ट्वीट केलं आहे. आर्थिक परिस्थितीवरून केंद्र सरकारवर टीका करताना, शंभर वेळा खोटं बोललं तरी ते सत्य होत नसतं, असं गांधी म्हणाल्या.

 आर्थिक परिस्थिती खालावत असल्याचं, सर्वांच्या समोर असताना, भाजप सरकार किती दिवस ती लपवण्याचा प्रयत्न करेल, असंही गांधी यांनी म्हटलं आहे.
****

 पंतप्रधान नरेंद्र मोदी इ इ एफ - पाश्चिमात्य आर्थिक मंचाच्या पाचव्या परिषदेसाठी आज रशियाला रवाना होणार आहेत. तीन दिवसांच्या या दौऱ्यात भारत आणि रशिया यांच्यातल्या २० व्या वार्षिक परिषदेलाही मोदी उपस्थित राहणार आहेत.  तेल आणि वायू क्षेत्रांचा शोध आणि उत्खननाबाबत दोन्ही देशांमधले द्वीपक्षीय संबंध बळकट करण्यासाठी आणि या संदर्भात पाच वर्षांचा आराखडा बनवण्या संदर्भात या दोन्ही देशात चर्चा होणार आहे. पंतप्रधानांच्या या भेटीत अनेक स्वारस्य पत्रं आणि सामंजस्य करार निश्चित होण्याची शक्यता, या वृत्तात वर्तवण्यात आली आहे.
****

 अपाचे हेलिकॉप्टर्सच्या सहभागामुळे वायुसेना अधिक सशक्त झाल्याचा विश्वास वायूसेना प्रमुख एअरचीफ मार्शल बी.एस.धनोआ यांनी व्यक्त केला आहे. अमेरिका निर्मित अपाचे ए एच ६४ श्रेणीतले आठ हेलिकॉप्टर आज पंजाबात पठाणकोट इथं, धनोआ यांच्या उपस्थितीत वायूसेनेत समाविष्ट करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. वायुसेनेनं २०१५ मध्ये अमेरिका सरकार आणि बोइंग कंपनी सोबत २२ हेलिकॉप्टर खरेदी करण्या संदर्भात बोलणी केली होती. या करारातली उर्वरित हेलिकॉप्टर्स मार्च २०२० अखेरपपर्यंत वायुसेनेच्या ताफ्यात दाखल होणार आहे.
****

 छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचे पुत्र अमित जोगी यांना अटक करण्यात आली आहे. निवडणुकीच्या नामनिर्देशन अर्जात चुकीची माहिती दिल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. अमित जोगी यांनी २०१३ च्या विधानसभा निवडणूक अर्जात दिलेली माहिती खोटी असल्याची तक्रार भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारानं केली होती, त्यावर ही कारवाई करण्यात आल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.
****

 सांगली जिल्ह्यातल्या कडकनाथ कोंबडी पालन घोटाळा प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. महारयत ॲग्रोचा संचालक हनुमंत जगदाळे याला न्यायालयानं ८ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार सुधीर मोहिते अद्याप फरार आहे. महारयत ॲग्रो बँक खात्यातील ९५ लाखाची रक्कम गोठवण्यात आली आहे.

दरम्यान, या प्रकरणी आतापर्यंत सहाशे तक्रारी दाखल झाल्या आहे.
****

 सांगली जिल्ह्यात पावसाची रिमझिम सुरु आहे. वारणा धरण क्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळं हे धरण १०० टक्के भरलं आहे. दुष्काळी भागात पावसानं अद्यापही दडी मारली असून चारा छावण्यांना ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
****

 नांदेड जिल्ह्यात काल दोन घटनेत तीन जण नदीच्या पुरात वाहून गेले. लोहा तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्यानं धानोरा मक्ता नदीला पूर आला होता, या नदीवरचा पुल ओलांडतांना जयराम भुजबळ आणि बंडू बोंडारे हे दोघे पुराच्या पाण्यात वाहून गेले.

 किनवट शहरातील शेख सोहेल शेख बाबा हा तरुण पैनगंगा नदीत आंघोळीसाठी गेला असता वाहून गेला. या तिघांचाही शोध सुरू असून ते अद्यापही सापडले नसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****

 रोजगार हमी विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या 'मागेल त्याला शेततळं' या योजनेअंतर्गत गेल्या ५ वर्षात राज्यात एक लाख ६७ हजार ३११ शेततळ्यांचं निर्माण झालं आहे. या माध्यमातून ३९ लाख ४५० एकर क्षेत्रासाठी संरक्षित सिंचन व्यवस्था झाली आहे.
****


 कसोटी क्रिकेटमध्ये विराट कोहली हा आतापर्यंतचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे. भारतीय कसोटी संघानं काल वेस्ट इंडीजवर मिळवलेला विजय हा कोहलीच्या नेतृत्वातला अठ्ठावीसावा विजय होता. कोहलीच्या नेतृत्चात भारतीय संघानं आतापर्यंत ४८ सामने खेळले, त्यापैकी २८ सामने जिंकले आहेत. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघानं साठ कसोटी सामने खेळले, त्यापैकी २७ सामने जिंकले होते. सौरव गांगुलीच्या नेतृत्वात २१, तर मोहम्मद अजहरउद्दीनच्या नेतृत्वात भारतीय कसोटी संघाने १४ सामने जिंकले होते.
*****
***

No comments: