Wednesday, 4 September 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 04.09.2019 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 04 September 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०४ सप्टेंबर २०१ सायंकाळी ६.००
****

 संसदेनं नुकत्याच संमत केलेल्या बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्यानुसार दाऊद इब्राहीम, हाफीज सईद आणि जकी उर्र रहमान लख्वी या तिघांना दहशतवादी घोषीत करण्यात आलं आहे. केंद्रीय गृहमंत्रालयानं आज ही घोषणा केली. हे सर्वजण दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्यानं, त्यांना दहशतवादी घोषीत करत असल्याचं, गृह मंत्रालयानं म्हटलं आहे. या कायद्यानुसार वैयक्तिक दहशतवादी घोषीत होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
****

 फळांपासून तयार होणाऱ्या वाईन वर प्रति बल्क लीटर एक रुपया एवढं नाममात्र उत्पादन शुल्क घेण्याचा निर्णय उत्पादन शुल्क विभागाने घेतला आहे. सध्या या प्रकारच्या वाईनवर शंभर टक्के उत्पादन शुल्क आकारण्यात येत, त्यामुळे फळांपासून तयार होणाऱ्या वाईनची किंमत मद्याच्या तुलनेत अधिक आहे. आता या निर्णयानुसार जांभूळ, चिकू, केळी, बोरं, करवंद इत्यादी फळांसह काजूच्या बोंडापासून तयार होणाऱ्या वाईन निर्मितीला चालना मिळणार आहे.
****

 अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक शिष्यवृत्तीसाठी सहाशे पन्नास कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. सामाजिक न्याय मंत्री डॉ सुरेश खाडे यांनी ही माहिती दिली. आज नवी दिल्ली इथं केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आंतरजातीय विवाह आणि अत्याचार प्रतिबंधासाठी केंद्र शासनानं द्यावयाचा उर्वरित 30 कोटी रुपये निधी येत्या आठवडाभरात राज्याला हस्तांतरीत होणार असल्याचं डॉ. खाडे यांनी सांगितलं.
****

 राष्ट्रवादी काँग्रेसने आजपर्यंत आपल्या प्रामाणिकपणाचा गैरफायदा घेऊन आपल्यावर अन्याय केल्याचा आरोप काँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केला आहे. ते आज इंदापूर इथं कार्यकर्त्यांच्या जनसंकल्प मेळाव्यात बोलत होते. इंदापूर विधानसभेची जागा आमच्यासाठी सोडलेली असताना, राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा इंदापूरला आलीच कशी, असा सवाल पाटील यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसने आजवर केलेल्या अन्यायाबाबत काँग्रेसमधले नेतेही हतबलता व्यक्त करतात, त्यामुळे आपल्याला विधानसभा निवडणुकीसंदर्भात गांभीर्यानं निर्णय घ्यावा लागणार असल्याचं हर्षवर्धन पाटील यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र पक्षभेद बाजूला ठेऊन, नेहमीच सहकार्याची भावना ठेवली, असं पाटील यांन नमूद केलं. येत्या दहा तारखेपर्यंत पुढचा निर्णय जाहीर करणार असल्याचं, पाटील यांनी सांगितलं.
****

 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी आपण आहोत त्या पक्षात खुश आहे, असं सांगितल्यावर त्यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चांना अर्थ उरत नाही असं, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ते आज नाशिक इथं पत्रकारांशी बोलत होते. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी नाशिक इथल्या सर्वच मतदार संघातील इच्छुकांच्या भावना यावेळी जाणून घेतल्या.
****

 कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी पक्षाचा आणि जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. आगामी विधानसभा निवडणूक अपक्ष अथवा अन्य पक्षातून लढवणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. गेली पन्नास वर्ष काँग्रेसचे निष्ठावंत म्हणून आवाडे कुटुंबांची ओळख आहे.
****

 गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने जनजीवन ठप्प झाले असून, अनेक मार्ग बंद झाले आहेत. भामरागड तालुक्यातल्या अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

 दरम्यान, गोसीखुर्द धरणाचे ३३ दरवाजे उघडण्यात आले असून, तीन हजार ६८२ दशलक्ष घनफुट प्रतिसेकंद वेगानं धरणातून पाणी सोडण्यात येत आहे.

 रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. मुंबईसह रायगड, पालघर, ठाणे जिल्ह्यातही आज सकाळपासून जोरदार पाऊस सुरू असल्यानं, जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबईत अनेक सखल भागात पाणी साचलं असल्यानं, आज दुपारनंतर शैक्षणिक संस्थांना सुटी देण्यात आली.

 जालना जिल्ह्यातही आज दुपारी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. औरंगाबाद शहर परिसरातही पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या.
****

 बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथल्या खोलेश्वर शैक्षणिक संकुलाच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळा तसंच महाविद्यालयानं पूरग्रस्तांसाठी तीन लाख अठ्ठयाऐंशी हजार नऊशे सदोतीस रूपये मदत निधी संकलित केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीचे प्रांत सहकार्यवाह अरूण डंके यांच्याकडे आज या रकमेचर धनादेश सुपूर्द करण्यात आला
****

 परभणी इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात डिजिटल शेतीवर आधारित प्रशिक्षण प्रकल्प पुढच्या तीन वर्षांसाठी मंजूर झाला आहे. कृषी संशोधन परिषद प्रकल्पाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ.पी.के घोष यांच्या हस्ते आज या प्रकल्पाचं उद्घाटन झालं.
*****
***

No comments: