Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 05 September 2019
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक -०५
सप्टेंबर २०१९ सकाळी ७.१० मि.
****
Ø राज्यात अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस; जनजीवन विस्कळीत
Ø आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत जागा वाटपाच्या सूत्रावर चर्चा
Ø काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी मंत्री हर्षवर्धन
पाटील यांचे पक्ष सोडण्याचे संकेत; कोल्हापूरचे
प्रकाश आवाडे यांचा काँग्रेस पक्षाचा राजीनामा
आणि
Ø
आदर्श शिक्षक पुरस्कारांचं आज वितरण
****
राज्यात अनेक जिल्ह्यात
काल मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे मुंबईसह रत्नागिरी, सिंधुदूर्ग, रायगड, पालघर,
सातारा, सांगली, कोल्हापूर, नागपूर आणि गडचिरोलीसह अनेक जिल्ह्यांत जनजीवन विस्कळीत
झालं.
मुंबईत काल पावणे
चारशे मिलीमीटर पावसाची नोंद झाली. अतिवृष्टी आणि समुद्राला आलेली भरती, यामुळे मुंबई
आणि उपनगरातल्या सखल भागात पाणी साचलं. मिठी नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे, या
परिसरातल्या नागरी वसाहतींमध्ये पाणी शिरलं. रेल्वेमार्गांवर पाणी साचल्यामुळे मध्य,
पश्चिम आणि हार्बर मार्गावरची उपनगरी रेल्वे सेवा ठप्प झाली होती. लांब पल्ल्याच्या
अनेक गाड्यांवरही पावसाचा परिणाम झाला आहे. अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या असून, काही
गाड्यांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. मुंबईत पुरात मदत कार्य करणाऱ्या महापालिकेच्या
दोन कर्मचाऱ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
पालघर जिल्ह्यातही
बहुतांश भागात काल जोरदार पाऊस झाला. नालासोपारा इथं एक सहा वर्षांचा मुलगा उघड्या
गटारात वाहून गेला, वसई - विरार महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे या बालकाचा शोध घेत
आहेत.
कोकणात सिंधुदुर्ग,
रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातही गेले तीन दिवस कोसळत असलेल्या पावसानं जनजीवन विस्कळीत
झालं आहे. रायगड जिल्ह्यात सावित्री, अंबा, कुंडलिका या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली
असून, महाड, नागोठाणे, रोहा शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. रोहा-नागोठाणे रस्त्यावर
भिसे खिंड इथं तसंच ताम्हाणी-कोलाड रस्त्यावर नीवे गावाजवळ दरड कोसळल्यानं पुणे ते
कोलाड हे मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.
सातारा जिल्ह्यात झालेल्या
पावसामुळे कोयना धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली असून सध्या धरणातून सुमारे पंचाहत्तर
हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग
सुरू आहे. यामुळे सांगली इथं कृष्णा नदीला पुन्हा पूर येण्याची शक्यता आहे.
सांगली शहरासह कृष्णा तसंच वारणा नदीकाठच्या अनेक गावांना सावधानतेचा इशारा दिला आहे.
कर्नाटकातल्या अलमट्टी धरणातून एक लाख घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग करण्याबाबत
सूचना दिल्याची माहिती पाटबंधारे विभागानं दिली.
कोल्हापूर जिल्ह्यातही
धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पुन्हा
एकदा संततधार सुरू आहे. त्यामुळं राधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत.
नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे
जनजीवन ठप्प झालं असून, भामरागड तालुक्यातल्या अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. गोसीखुर्द
धरणाचे ३३ दरवाजे उघडण्यात आले आहेत.
दरम्यान, जालना - दादर
जनशताब्दी एक्सप्रेस आणि मुंबई - नांदेड तपोवन एक्सप्रेस आज रद्द करण्यात आल्या आहेत.
तर मुंबईहून आज रात्री नऊ वाजून दहा मिनिटांनी सुटणारी मुंबई ते सिकंदराबाद देवगिरी
एक्सप्रेस रात्री १२ वाजून ४५ मिनिटांनी सुटणार आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड
जनसंपर्क कार्यालयानं ही माहिती दिली.
****
ऑनलाईन पध्दतीनं शिक्षक सेवक भरती करण्याचा
राज्याचा उपक्रम अन्य राज्यांसाठीही पथदर्शी ठरेल, असं शाले शिक्षण आणि क्रीडा मंत्री आशिष शेलार यांनी म्हटलं
आहे. मुंबईत काल शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागामार्फत पवित्र पोर्टलद्वारे निवड
झालेल्या राज्यातल्या शिक्षकांना नियुक्तीपत्र देण्यात आलं. त्यावेळी ते बोलत
होते. शिक्षक सेवक भरती प्रक्रियेतला गैरव्यवहार टाळण्यासाठी आणि निवड प्रक्रिया
पारदर्शक होण्यासाठी राज्य शासनामार्फत पवित्र प्रणाली आणण्यात आल्याचं शेलार
यांनी नमूद केलं.
****
आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपावर काल भारतीय
जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यात चर्चेची पहिली फेरी झाली. भारतीय जनता पक्षाकडून प्रदेशाध्यक्ष
चंद्रकांत पाटील आणि वरिष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार तर शिवसेनेकडून वरिष्ठ नेते सुभाष देसाई सहभागी झाले होते. कोणता पक्ष किती
जागा लढवणार हे अद्याप निश्चित झालं नसून जागा वाटपाच्या सूत्रावर काल चर्चा झाल्याचं
भाजपच्या एका नेत्यानं सांगितलं. विशेषतः काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून
युतीमध्ये आलेल्या विद्यमान आमदारांना संबंधित पक्षाचा विद्यमान आमदार समजून ती जागा
त्या पक्षाला सोडण्यात येणार असल्याचं या नेत्यानं सांगितलं. बहुतांशी विद्यमान आमदारांना
त्यांच्या मतदार संघातून तिकिट दिलं जाईल, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. मित्र
पक्षांना सोडण्यात येणाऱ्या जागांवर कालच्या बैठकीत चर्चा झाली.
दरम्यान, काँग्रेस पक्षाच्या
छाननी समितीची आज नवी दिल्लीत बैठक होणार आहे. या बैठकीत राज्यातल्या महत्त्वाच्या
राजकीय घडामोडी, उमेदवार निश्चिती आणि प्रचाराचं धोरण यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
****
काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील
यांनी काँग्रेस पक्ष सोडून अन्य पक्षात जाण्याचे संकेत दिले आहेत. याबाबत येत्या दहा
तारखेला पुढचा निर्णय जाहीर करणार असल्याचं, पाटील यांनी काल झालेल्या कार्यकर्त्यांच्या
जनसंकल्प मेळाव्यात सांगितलं. लोकसभा निवडणुकीदरम्यान, इंदापूर विधानसभेची जागा काँग्रेस
पक्षाला सोडण्याचं आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी दिलं होतं. मात्र
आता ते हे आश्वासन पाळण्यास राजी नाहीत, त्यामुळे आपल्याला अन्य पर्यायांचा विचार करावा
लागत असल्याचं पाटील म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसनं आजपर्यंत आपल्या प्रामाणिकपणाचा
गैरफायदा घेऊन अन्याय केल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
****
कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश आवाडे
यांनी पक्ष सदस्यत्वाचा आणि जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. आगामी विधानसभा निवडणूक
अपक्ष अथवा अन्य पक्षातून लढवणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. आवाडे कुटुंबांची गेली पन्नास वर्ष काँग्रेसचे निष्ठावंत
म्हणून ओळख आहे.
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष
काँग्रेसचे नेते मनोहर पाऊनकर यांनीही काल मुंबईत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत
शिवसेनेत प्रवेश केला.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या
औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा
जन्मदिवस- शिक्षक दिन आज साजरा होत आहे. आज
नवी दिल्लीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान
करण्यात येणार आहेत. राज्यातून अहमदनगर इथल्या श्री समर्थ
विद्या मंदिर प्रशालेचे शिक्षक डॉ. अमोल बागुल यांना वैविध्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबवण्यासह उल्लेखनीय कार्यासाठी
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. रौप्य पदक, मानपत्र आणि ५० हजार रूपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. राज्य शासनाचे आदर्श शिक्षक पुरस्कार आज मुंबईत वांद्रे
इथल्या रंगशारदा सभागृहात प्रदान करण्यात येणार आहेत.
औरंगाबाद जिल्हा परीषदेनं
आपल्या १६ शिक्षकांना आदर्श पुरस्कार जाहीर केला आहे. त्याचंही आज वितरण केलं जाणार
आहे.
****
बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथल्या खोलेश्वर शिक्षण
संस्थेनं पूरग्रस्तांसाठी तीन लाख अठ्ठयाऐंशी हजार नऊशे सदोतीस रूपये मदत निधी संकलित
केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीचे प्रांत सहकार्यवाह अरूण डंके
यांच्याकडे काल या रकमेचा धनादेश सुपूर्द करण्यात आला
****
परभणी इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात
डिजिटल शेतीवर आधारित प्रशिक्षण प्रकल्प पुढच्या तीन वर्षांसाठी मंजूर झाला आहे. कृषी
संशोधन परिषद प्रकल्पाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ.पी.के घोष यांच्या हस्ते काल या प्रकल्पाचं
उद्घाटन झालं. कृत्रिम बुध्दीमत्ता, यंत्रमानव, ड्रोन आणि स्वयंचलित यंत्राचा वाढता
वापर लक्षात घेता, या प्रशिक्षण प्रकल्पाला मंजुरी दिल्याचं घोष यांनी सांगितलं.
****
नांदेड जिल्ह्यातले
लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती, माजी जिल्हा परीषद सदस्य तसंच माळेगावचे
रूस्तुमराव धुळगंडे यांचं काल दुपारी निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी ११
वाजता माळेगाव यात्रा या त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
****
अहमदनगर जिल्ह्यात कुरणपूर इथं काल बिबट्याच्या हल्ल्यात
दहा वर्षांचा मुलगा ठार झाला. काल सायंकाळी हा मुलगा आपल्या नातलगासह घरी परतत असताना,
बिबट्याने झडप मारून त्याला उचलून नेलं. नागरिकांनी बिबट्याला पळवून लावत मुलाला उपचारासाठी
दवाखान्यात नेत असताना, त्याचा मृत्यू झाला.
*****
***
No comments:
Post a Comment