Thursday, 5 September 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 05.09.2019 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 05 September 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०५ सप्टेंबर २०१ सायंकाळी ६.००
****
एकदाच वापरता येणाऱ्या प्लास्टिकचा वापर थांबवण्यासाठी शिक्षकांनी सक्रीय व्हावं, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. या प्लास्टिकमुळे पर्यावरणाला निर्माण होणार धोका समजावून सांगून, तो बंद करण्याचा सल्ला शिक्षकांनी दिला तर, विद्यार्थी त्यासाठी प्रेरित होतील, महात्मा गांधीजींच्या दिडशेव्या जयंती निमित्त त्यांना हीच खरी आंदराजली असेल, असं त्यांनी शिक्षक दिनानिमित्त आपल्या संदेशात म्हटलं आहे. शिक्षकांनी पद्धती पेक्षा परिणामाकडे लक्ष द्यावं असा सल्ला त्यांनी दिला आहे. आज भारतात शैक्षणिक क्षेत्रात परिवर्तन घडून येत आहे, असंही पंतप्रधान मोदी यांनी या संदेशात म्हटलं आहे.
****
राज्य शासनामार्फत देण्यात येणाऱ्या राज्य शिक्षक आणि सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते यांना एकत्र करून एक शिक्षक परिषद येणाऱ्या काळात निर्माण करणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केलं आहे. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून साजरी केली जात असताना प्राथमिक, माध्यमिक आणि विशेष शिक्षक, आदिवासी विभागातील प्राथमिक शिक्षक तसंच सावित्रीबाई फुले आदर्श स्त्री शिक्षिकांना राज्य शासनाच्या वतीनं देण्यात येणारा सन २०१८-१९ चा  आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते मुंबईत बोलत होते. राज्य शिक्षक पुरस्कारार्थींना एक लाख रुपये, मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन यावेळी गौरविण्यात आलं. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर शिक्षकांनी भर द्यावा, असं आवाहन शालेय शिक्षण आणि क्रीडा मंत्री विधिज्ज्ञ आशिष शेलार यांनी यावेळी केलं.
****
सांगलीतल्या आयुर्विन पुलाजवळ कृष्णा नदीची पाणी पातळी तेवीस फूटांपर्यंत पोहचली आहे. कोयना धरणातून पाणी सोडण्यात आल्यानं कृष्णा नदीची पाणी पातळी वाढली असून ही पातळी आणखीन वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागानं या भागात अतिवृष्टीचा इशारा दिला असून, येत्या दोन दिवसात, सांगली परिसरात पाऊस झाला तर या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे.
****
चंद्रपूर जिल्ह्यातल्या इरई धरणाचा पाणीसाठा वाढल्यानं काल धरणाचे पाच दरवाजे तर आज सकाळी अतिरिक्त दोन दरवाजे उघडण्यात आले. सिंदेवाही तालुक्यात झालेल्या मोठ्या पावसामुळे या ठिकाणची पिकं पाण्याखाली गेली आहेत. कळमगाव, देलवाडी, सरांडी या मार्गावरची वाहतूक काल संध्याकाळपासून बंद झाल्यानं काही गावांचा संपर्क ही तुटला आहे.
****
गडचिरोली जिल्ह्यात आज दुपारी तीन वाजेपासून पावसाला पुन्हा सुरुवात झाली. त्यामुळे या ठिकाणची पूरपरिस्थिती कायम आहे. गडचिरोली इथल्या शाळा आणि महाविद्यालयांना जिल्हाधिकाऱ्यांनी परवा - सात तारखेपर्यंत सुट्टी दिली आहे.
****
तहसीलदारांना राजपत्रित अधिकाऱ्यांचा दर्जा मिळावा, त्यांची वेतनश्रेणी देण्यात यावी, शिपाई हे नाव बदलून सहायक हे पदनाम देण्यात यावं, शिपायांना तलाठी म्हणून पदोन्नती देण्यात यावी, या मागण्यांसाठी औरंगाबाद जिल्ह्यात महसूल कमर्चाऱ्यांनी आज काम बंद आंदोलन केलं. सोलापूर इथंही महसूल कर्मचारी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या मागण्यांसाठी मोर्चा काढला. धुळे इथं राज्य शासनानं महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्या तत्वत: मंजूर केल्या मात्र, शासन निर्णय काढलेला ऩसल्यानं महसूल कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत संप पुकारला. जिल्हाभरात महसुल विभागाचं काम त्यामुळे ठप्प झालं होतं. आंदोलक महसूल कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी धुळ्यात निदर्शनही केली.
****
देशभर शिक्षक दिन साजरा केला जात असताना धुळ्यात मात्र शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद करीत शिक्षक भारती संघटनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्या शिक्षकांनी आज धरणे आंदोलन केलं. विना अनुदानित शाळांना शंभर टक्के अनुदान देण्यात यावं या आणि अन्य मागण्यांसाठी यावेळी धुळे शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आलं.
****
गेल्या चोवीस जुलै रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं लाच घेताना अटक केलेल्या लातूरच्या जिल्हा परिषदेतले समाज कल्याण अधिकारी शिवानंद मिनगिरे यांना आज निलंबित करण्यात आलं. या लाच  प्रकरणात त्यांना पोलीसांनी अटक करुन न्यायालयीन कोठडी मिळवली होती. अठ्ठेचाळीस तासांपेक्षा अधिक कालवधी न्यायायलीन कोठडी मिळाली असल्यामुळे नियमानुसार मिनगिरेना निलंबित करण्यात आलं आहे.
****

No comments: