Friday, 6 September 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 06.09.2019 07.10 AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 06 September 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक -०६ सप्टेंबर २०१सकाळी ७.१० मि.
****
** राज्यातल्या वीज कर्मचाऱ्यांच्या मूळवेतनात साडे बत्तीस टक्के वाढ करण्यास मान्यता
** गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर शिक्षकांनी भर देण्याचं शालेय शिक्षण मंत्र्यांचं आवाहन
** भगतसिंह कोश्यारी यांनी मराठीतून घेतली राज्यपाल पदाची शपथ
आणि
** वीज देयकाची एक लाख रूपयांपेक्षा जास्त थकबाकी अदा करण्यासाठी १८ सप्टेंबरपर्यंत मुदत ; त्यानंतर वीज पुरवठा खंडीत करण्याचा महावितरणचा निर्णय
****
राज्यातल्या वीज कर्मचाऱ्यांच्या मूळवेतनात साडे बत्तीस टक्के वाढ करण्यास ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंजुरी दिली आहे. महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या तिन्ही वीज कंपन्यांचे अधिकारी आणि विविध कामगार संघटनेच्या प्रतिनिधीसोबत काल मुंबईत झालेल्या बैठकीत मंत्री बावनकुळे यांनी ही वेतनवाढ जाहीर केली. या साडेबत्तीस टक्के वेतनवाढीसह १२५ टक्के महागाई भत्ता मूळ वेतनात समाविष्ट करण्यात आला आहे. याशिवाय विविध भत्त्यांमध्ये दुप्पट वाढ करण्यात आली आहे. तांत्रिक तसंच अतांत्रिक सहाय्यक प्रवर्गातल्या कर्मचाऱ्यांच्या मानधनातही वाढ करण्यात आली असून आता त्यांना पहिल्या वर्षी १५ हजार, दुसऱ्या वर्षी १६ हजार तर तिसऱ्या वर्षी १७ हजार रुपये मानधन दिलं जाईल. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनातही २० टक्के वाढ करण्यात आली आहे. तिन्ही कंपन्यांच्या कर्मचारी संघटनांनी या वेतनवाढीचं स्वागत केलं आहे.
****
गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर शिक्षकांनी भर द्यावा, असं आवाहन शालेय शिक्षण आणि क्रीडा मंत्री आशिष शेलार यांनी केलं आहे. काल शिक्षक दिनी, मुंबईत राज्य शासनाचे आदर्श शिक्षक पुरस्कार तसंच सावित्रीबाई आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान करण्यात आले, त्यावेळी शिक्षणमंत्री बोलत होते. राज्यातल्या एकशे सात शिक्षकांना यावेळी पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. एक लाख रुपये, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराच स्वरुप आहे.
केंद्र शासनाचे राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारही काल दिल्लीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. पुरस्कार प्राप्त शिक्षकांमध्ये अहमदनगर इथले डॉ. अमोल बागुल, मुंबईचे डॉ. ए. जेबीन जोएल आणि पुण्याच्या राधिका दळवी यांचा समावेश आहे. रजतपदक, मानपत्र आणि ५० हजार रूपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.
मराठवाड्यातही विविध ठिकाणी जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले. परभणी इथं, मुख्य कार्यकारी अधिकारी बी.पी.पृथ्वीराज यांनी आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान केले. जिल्हा परिषद शाळेतल्या विद्यार्थ्यांनी इंग्रजी विषयावर प्रभुत्व मिळवावं, यासाठी शिक्षकांनी प्रामाणिक प्रयत्न करावे, असं आवाहन पृथ्वीराज यांनी केलं.
औरंगाबाद जिल्हा परिषदेनंही १६ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवलं. अध्यक्ष देवयानी डोणगावकर यांच्या हस्ते या शिक्षकांना पुरस्कार देण्यात आले. लातूर जिल्हा परिषदेनं काल २१ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान केले. जिल्हा परिषदेचा देविसिंह चौहान स्मृती साहित्य पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सूर्यनारायण रणसुभे यांना काल प्रदान करण्यात आला.
****
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून, उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगतसिंह कोश्यारी यांनी काल मराठीतून शपथ घेतली. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंद्रजोग यांनी त्यांना शपथ दिली. काल सायंकाळी मुंबईत राजभवनात झालेल्या या समारंभाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, लोकायुक्त न्यायमूर्ती एम.एल.तहिलियानी, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कोश्यारी हे महाराष्ट्राचे १९वे राज्यपाल आहेत.
****
आगामी विधानसभा निवडणुक यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज होऊन समन्वयाने काम करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाचे वरिष्ठ उप निवडणूक आयुक्त उमेश सिन्हा यांनी दिले आहेत. काल मुंबईत राज्य विधानसभा निवडणूक तयारीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी पैशाच्या आणि मद्याच्या वापरावर आळा घालण्यासाठी, मद्य आणि रोकड यांच्या अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी सक्षम यंत्रणा निर्माण करावी, असे निर्देश यावेळी देण्यात आले. सी-व्हिजिल ॲपवर येणाऱ्या तक्रारी सर्व संबंधित यंत्रणाकडे तत्काळ पाठवण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
****
रायगड जिल्ह्यातले श्रीवर्धनचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अवधूत तटकरे यांनी काल विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. ते शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता त्यांच्या निकटवर्तीयांकडून व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर यांनी काल शिवसेनेत प्रवेश केला
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
एक लाख रूपयांपेक्षा जास्त वीज बिलाची थकबाकी असलेल्या मराठवाड्यातल्या ग्राहकांनी १८ सप्टेंबरपर्यंत वीज बील न भरल्यास वीज पुरवठा खंडीत करण्याचा निर्णय महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयानं घेतला आहे. विभागातल्या सात हजार ५७४ ग्राहकांकडे एक लाख रूपयांपेक्षा जास्त रकमेची थकबाकी असून ही रक्कम २३१ कोटी ९४ लाख रूपये एवढी आहे. याशिवाय २४ लाख ४३ हजार ५९७ ग्राहकांकडे ८४८ कोटी रूपयांची थकबाकी आहे. या सर्व ग्राहकांना महावितरणनं एसएमएसच्या माध्यमातून यापूर्वीच वीज बिल भरण्याची नोटीस दिली आहे.
****
तहसीलदारांना राजपत्रित अधिकाऱ्यांचा दर्जा मिळावा, त्यानुसार वेतनश्रेणी देण्यात यावी, शिपाई हे नाव बदलून सहायक हे पदनाम देण्यात यावं, शिपायांना तलाठी म्हणून पदोन्नती देण्यात यावी, या मागण्यांसाठी औरंगाबाद जिल्ह्यात महसूल कमर्चाऱ्यांनी काल काम बंद आंदोलन केलं. सोलापूर इथंही महसूल कर्मचारी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या मागण्यांसाठी मोर्चा काढला. धुळे इथं राज्य शासनानं महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्या तत्वत: मंजूर केल्या मात्र, शासन निर्णय काढलेला नसल्यानं धुळे इथं महसूल कर्मचाऱ्यांनी कालपासून बेमुदत संप पुकारला. जिल्हाभरात महसूल विभागाचं काम त्यामुळे ठप्प झालं होतं. आंदोलक महसूल कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी धुळ्यात निदर्शनही केली.
****
बीड जिल्ह्यातले शिवसंग्राम पक्षाचे एकमेव जिल्हा परीषद सदस्य भारत काळे यांनी काल ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत काल मुंबईत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. जिल्हा परीषद निवडणुकीत या पक्षाचे चार सदस्य निवडून आले होते, त्यापैकी तीन सदस्यांनी यापूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला होता.
****
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या क्षेत्रीय लोकसंपर्क कार्यालयाच्यावतीनं औरंगाबाद इथं आजपासून स्वच्छता या विषयावर चित्र प्रदर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आजपासून आयोजन करण्यात आलं आहे.  मराठवाडा साहित्य परिषदेच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित या कार्यक्रमाच्या निमित्तानं जनजागरण फेरी, विद्यार्थ्यांसाठी चित्रकला तसंच निबंध स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. आज आणि उद्या सकाळी दहा वाजेपासून रात्री नऊ वाजेपर्यंत सर्वांसाठी हे प्रदर्शन खुलं राहणार असल्याचं क्षेत्रीय लोकसंपर्क कार्यालयानं कळवलं आहे.
****
प्रसिद्ध साहित्यिक किरण नगरकर यांचं काल मुंबईत निधन झालं, ते ७७ वर्षांचे होते. मेंदूत रक्तस्राव झाल्यानं, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. नगरकर यांची सात सक्कं त्रेचाळीस, ककल्ड, रावण ॲण्ड एडी, द एक्स्ट्रॉज, या पुस्तकांसह कबीराचं काय करायचं, स्ट्रेंजर अमंग अस, द ब्रोकन सर्कल, द विडो ॲण्ड हर फ्रेंडस, द एलिफंट ऑन द माऊस, आदी नाटकं तसंच पटकथा प्रसिद्ध आहेत. ककल्ड या कादंबरीसाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं.
****
नांदेड जिल्ह्यातल्या उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाचा उपविभागीय अधिकारी नारायण राऊत याला पन्नास हजार रुपये लाच घेताना काल रंगेहाथ अटक करण्यात आली. मुदखेड तालुक्यात कालव्याच्या कामासाठी केलेल्या भूसंपादनाचा मोबदला देण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती.
****
गेल्या चोवीस जुलै रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं लाच घेताना अटक केलेल्या लातूरच्या जिल्हा परिषदेतले समाज कल्याण अधिकारी शिवानंद मिनगिरे यांना काल निलंबित करण्यात आलं. या लाच प्रकरणात त्यांना पोलीसांनी अटक करुन न्यायालयीन कोठडी मिळवली होती. अठ्ठेचाळीस तासांपेक्षा अधिक काळ न्यायायलीन कोठडीत राहिल्यामुळे नियमानुसार मिनगिरेना निलंबित करण्यात आलं आहे.
****
लातूर इथल्या महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेच्या वतीनं उद्योगिनी योजनेच्या माध्यमातून  शहरातल्या ३० महिलांना प्रत्येकी २० हजार रूपयांचं कर्ज वितरण बँकेचे संचालक  अजितसिंह कव्हेकर यांच्या हस्ते काल करण्यात आलं. लातूर आणि रेणापूर तालुक्यात  १० हजार महिलांना लघु उद्योग, कुटीर उद्योग उभा करण्यासाठी शून्य टक्के व्याज दरावर बँकेनं कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे, या योजनेअंतर्गत आतापर्यंत दोन वर्षात तीन कोटींचं कर्ज वाटप करण्यात आलं आहे.
****
औरंगाबाद महानगरपालिकेच्या हद्दीत आलेल्या सातारा-देवळाई परिसराच्या पायाभूत सुविधांसाठी १० कोटी रुपये निधी राज्य शासनानं मंजूर केला आहे.
****


No comments: