Friday, 6 September 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 06.09.2019 11.00 AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
०६ सप्टेंबर २०१९ सकाळी ११.०० वाजता
****
विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजप युतीचा निश्चित विजय होईल, असा विश्र्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. रिपाई आठवले गटातर्फे काल मुंबईत आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. रिपाई उमेदवार विजयी व्हावेत याकरता सर्व प्रयत्न करण्यात येतील, असं आश्र्वासनही त्यांनी यावेळी दिलं. भाजपला घटना बदलायची आहे आणि नोकरी आणि शिक्षणातील आरक्षण बंद करायचं आहे हा विरोधकांचा दावा खोटा, असल्याचंही मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.         
****
ज्येष्ठ पुरोगामी नेते गोविंद पानसरे खून खटल्यातील आणखी तीन मारेकऱ्यांना आज पहाटे मुंबई, पुणे येथून अटक करण्यात आली. यात डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला सचिन अंदुरे या `शार्प शूटर`चा समावेश आहे. अंदुरे याला पुणे इथल्या तुरुंगातून तर अमित बद्दी आणि गणेश मिस्किन याला मुंबई येथील आर्थर रोड तुरुंगातून ताब्यात घेण्यात आलं. तिन्ही मारेकऱ्यांना कोल्हापूर इथल्या न्यायालयात हजर करण्यात येत आहे. अंदुरे, बद्दी आणि मिस्कीन यांना ताब्यात घेतल्यामुळे आतापर्यंत अटक झालेल्या आरोपींची संख्या बारा झाली आहे.
****
आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी शिक्षकांकडून प्रस्ताव न मागवता, जिल्हा परिषदेने उत्तम शिक्षकांची निवड करावी, असं औरंगाबाद जिल्हा परिषदेचे सदस्य मधुकर वालतुरे यांनी म्हटलं आहे. ते काल औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर यांच्या हस्ते शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.
****
औरंगाबाद महापालिकेच्या हद्दीत आलेल्या सातारा-देवळाई परिसराच्या पायाभूत सुविधांसाठी दहा कोटी रुपये निधी राज्य शासनानं मंजूर केला आहे. आमदार संजय शिरसाट यांनी यासंदर्भात शासनाकडे वारंवार पाठपुरावा करून, महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती सक्षम नसल्यामुळे, विशेष निधी मिळावा अशी मागणी केली होती.
****
लातूर जिल्ह्यातल्या विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याला  महाराष्ट्र शासनाचा २०१७-१८ या वर्षासाठीचा ‘सहकार भूषण’ पुरस्कार जाहीर झाला आहे. आतापर्यंत बत्तीस गाळप हंगाम यशस्वी केलेल्या या कारखान्याला राज्य तसंच देशपातळीवरचे विविध छपन्न पुरस्कार मिळाले आहेत.
****

No comments: