Regional Marathi
Text Bulletin, Aurangabad
Date – 06 September 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०६ सप्टेंबर २०१९ दुपारी १.०० वा.
****
रशियाचा
दोन दिवसांचा दौरा आटपून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पहाटे मायदेशी परतले. रशियातील
व्लादीव्होस्तोक इथल्या पाचव्या पौर्वात्य आर्थिक मंच परिषद आणि भारत - रशिया विसाव्या
वार्षिक परिषदेत पंतप्रधान सहभागी झाले. यावेळी जगभरातून आलेल्या नेत्यांशीही त्यांनी
द्विपक्षीय चर्चा केली. आर्थिक मंचाच्या खुल्या आधिवेशनात, पंतप्रधानांनी रशियाच्या
अतिपूर्वेला असलेल्या भागाच्या विकासाकरता एक अब्ज अमेरिकी डॉलरचं कर्ज देण्याची महत्वपूर्ण
घोषणाही केली. यामुळे आर्थिक रणनीतीला नवं परिमाण मिळेल तसंच भारताच्या ‘अॅक्ट फार
इस्ट’ धोरणाला चालना मिळेल, असं मोदी यांनी म्हटलं आहे. व्लादीव्होस्तोक - चेनै या
प्रस्तावित समुद्रमार्गीकेमुळे दोन्ही देशांमधले संबंध अधिक दृढ होतील, असंही पंतप्रधान
म्हणाले. व्यापारविषयक सुमारे पन्नास करार झाल्यानं पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला
आहे.
****
भारताचं
चांद्रयान-दोन उद्या सकाळी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. बंगळुरु इथल्या इस्रो,
अर्थात भारतीय अवकाश संशोधान संघटनेच्या उपग्रह नियंत्रण कक्षातले शास्त्रज्ञ त्यासाठीच्या
तयारीत व्यस्त आहेत. सध्या या चांद्रयानाचा लँडर विक्रम चंद्रापासून अगदी जवळच्या कक्षेत
फिरत आहे. उद्या दुपारी एक ते दोन वाजेच्या दरम्यान, चंद्रावर उतरण्यासाठी योग्य दिशा
आणि जागा शोधून, विक्रम दुपारी दीड ते अडीचच्या दरम्यान चंद्रावर उतरेल. त्यानंतर सुमारे
चार तासांनी रोव्हर प्रज्ञान त्यांच्यापासून वेगळा होईल. आणि चंद्रावरच्या मांतीचं
संशोधन सुरु करेल.
चांद्रयानाचं
चंद्रावर होणाऱ्या अवतारणाचे साक्षीदार होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री
बेंगळुरूला पोहोचतील. राष्ट्रीय प्रश्नमंजुषेतून निवड झालेले देशभरातले सुमारे सत्तर
शालेय विद्यार्थीही त्यांच्या सोबत या क्षणाचे साक्षीदार होणार आहेत.
****
उपराष्ट्रपती
व्यंकया नायडू यांच्या हस्ते आज दिल्ली इथं `लोकतंत्र के स्वर` खंड दुसरा आणि `द रिपब्लीक
इथीक्स` या पुस्तकांचं लोकार्पण झालं. या पुस्तकांमधे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या
दोन वर्षाच्या कार्यकाळातील ९५ भाषणांचा समावेश आहे. माहीती आणि प्रसारण मंत्रालयाच्या
प्रकाशन विभागानं राष्ट्रपतींच्या निवडक भाषणांची यासाठी निवड केली आहे. या वेळी माहिती
आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर उपस्थीत होते.
****
महाराष्ट्राचे
नवे राज्यपाल म्हणून, उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगतसिंह कोश्यारी यांनी काल मराठीतून
शपथ घेतली. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंद्रजोग यांनी त्यांना
शपथ दिली. काल सायंकाळी मुंबईत राजभवनात झालेल्या या समारंभाला मुख्यमंत्री देवेंद्र
फडनवीस, लोकायुक्त न्यायमूर्ती एम. एल. तहिलियानी, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित
होते.
****
आगामी
विधानसभा निवडणूक यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज होऊन समन्वयानं काम करण्याचे
निर्देश निवडणूक आयोगाचे वरिष्ठ उप निवडणूक आयुक्त उमेश सिन्हा यांनी दिले आहेत. काल
मुंबईत राज्य विधानसभा निवडणूक तयारीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. मतदारांवर प्रभाव
टाकण्यासाठी पैशांचा वापर आणि मद्य वापरावर आळा घालण्यासाठी, मद्य आणि रोकड यांच्या
अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी सक्षम यंत्रणा निर्माण करावी, असे निर्देश यावेळी देण्यात
आले. सी-व्हिजिल ॲपवर येणाऱ्या तक्रारी सर्व संबंधित यंत्रणाकडे तत्काळ पाठवण्याच्या
सूचना यावेळी देण्यात आल्या.
****
औरंगाबाद
इथं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या विभागीय कार्यालयातर्फे स्वच्छ भारत मोहीमेअंतर्गत
झालेल्या कार्याची माहिती देणारं आणि स्वच्छतेविषयी जनजागृती करणारं दोन दिवसीय चित्रप्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. महापौर नंदकुमार
घोडेले आणि उप महापौर विजय औताडे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं आज उदघाटन झालं. यानिमित्त
सकाळी स्वच्छता फेरी काढण्यात आली आणि विद्यार्थ्यांसाठी
चित्रकला स्पर्धाही घेण्यात आली. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सुरू असलेलं हे प्रदर्शन
आज आणि उद्या सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.
****
सांगली
जिल्ह्यातल्या वारणा आणि कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला असून धरणातील
अतिरिक्त पाण्याच्या विसर्गामुळं येत्या चोवीस तासात दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत
वाढ होण्याची शक्यता असल्यानं नद्यांना पूर येण्याची शक्यता आहे. कालपासून वारणा धरणातून
प्रती सेकंद चौदा हजार तिनशे चव्वेचाळीस घनफूट तर कोयना धरणातून प्रती सेकंद सत्तर
हजार चारशे चार घनफूट पाणी नदी पात्रात सोडण्यात येत आहे. सांगली शहरालगत कृष्णा नदीची
पाणी पातळी काल रात्री अठ्ठावीस फुटांपर्यंत पोहोचली होती. नदीकाठावरील विविध भागातील
नागरिकांना महापालिका प्रशासनानं स्थलांतराच्या सूचना दिल्या आहेत. सांगली जिल्ह्यातील
शिराळा तालुक्यातील शिराळा, शाहूवाडी आणि पन्हाळा
गावांचा संपर्क तुटला आहे.
****
No comments:
Post a Comment