Saturday, 7 September 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 07.09.2019 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 07 September 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक -०७ सप्टेंबर २०१सकाळी ७.१० मि.
****

v चांद्रयानाच्या विक्रम लँडरचा इस्त्रो नियंत्रण केंद्राशी संपर्क खंडीत; पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी ८ वाजता देशाला संबोधित करणार
v औरंगाबादमध्ये ऑरिक सिटीच्या पहिल्या टप्प्याचं आज पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण; राज्यस्तरीय सक्षम महिला बचत गटाच्या मेळाव्यालाही मार्गदर्शन करणार 
v वंचित बहुजन आघाडी- एआय एमआयएम युती तुटली
  आणि
v उर्दु साहित्यात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या १२२ साहित्यिकांचा उद्या औरंगाबाद इथं गौरव
****

 चंद्राच्या पृष्ठभूमीपासून दोन किलोमीटर अंतरावर असताना विक्रम या लँडरचा भारतीय अंतराळ संशोधन संघटना- इस्त्रोच्या बंगळूरू इथल्या नियंत्रण केंद्राशी असलेला संपर्क खंडीत झाल्याचं इस्त्रोचे अध्यक्ष के सिवन यांनी आज पहाटे सांगितलं. यामुळे विक्रम लँडरची दिशा आणि ठिकाण समजणं अशक्य झालं आहे.
आज पहाटे एक वाजून ३८ मिनिट आणि ३ सेकंदांनी, चांद्रयान चंद्राच्या पृष्ठभागापासून ३५ किलोमीटर अंतरावर पोहोचलं असता, विक्रम लँडरची चंद्रावर उतरण्याची प्रक्रिया सुरू झाली. मात्र अंतिम टप्प्यात पोहाचल्यानंतर त्याचा संपर्क तुटल्याची माहिती सिवन यांनी दिली. उपलब्ध माहितीचं विश्लेषण केलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं.

 दरम्यान, या चांद्रमोहिमेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी ८ वाजता देशाला संबोधित करणार आहेत. मोदी हे कालच बंगळुरू इथं पोहाचले असून शास्त्रज्ञांनी निराश न होता, लँडरशी संपर्क स्थापन करण्याचे प्रयत्न चालू ठेवावेत, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
****

 पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. मुंबई, आणि औरंगाबाद इथल्या कार्यक्रमांना पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत. मुंबईत तीन मेट्रो मार्गांची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. आधुनिक मेट्रो भवनाचं भूमिपूजन, बनडोंगरी-कांदिवली पूर्व ही मेट्रो स्थानकं तसंच आधुनिक मेट्रो कोचचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्धाटन होणार आहे.

 औरंगाबाद इथं दुपारी दोन वाजेच्या सुमारास पंतप्रधानांचं आगमन होईल. औरंगाबाद औद्योगिक नगरी - ऑरिक सिटीच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पणही आणि ऑरिक हॉलचं उदघाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. औरंगाबाद शहरापासून २५ किलोमीटर अंतरावर दहा हजार एकर क्षेत्रावर ऑरिक हे शहर विकसित होत आहे. देशविदेशातल्या ४७हून अधिक कंपन्यांनी या प्रकल्पात गुंतवणूक केली आहे.

 शेंद्रा औद्योगिक वसाहतीत राज्यस्तरीय सक्षम महिला बचत गटाच्या मेळाव्यालाही पंतप्रधान मार्गदर्शन करणार आहेत. महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी ही माहिती दिली. त्या म्हणाल्या...

 पंतप्रधानमंत्री नरेंद्र मोदी याच्या नेतृत्वाखाली या देशातल्या महिला ह्या सक्षम व्हाव्या हा त्यांच्या अजेंन्डा खाली उमेदयोजनाच्या माध्यमातून मी सारिलींमच्या माध्यमातून अत्यंत प्रभावी यंत्रणा उभी करू शकलो. पहिले आमच्याकडे फक्त ५४ हजार १७९ बजत गट होते. आता आमच्याकडे चार लाख आठ हजार ५४४ बचत गट आहे.  पूर्वी  फक्त सात लाख फॅमिली पर्यंत पोहचत होतो. आणि आता आम्ही ४३ लाख ५८ हजार परिवारांना लावली उडमिशेनच्या माध्यमातून त्यांना सक्षम करण्याचे काम  करू शकलो आहोत. आणि त्याच एक प्रतिक म्हणजे स्वतः प्रधानमंत्री आमच्या सक्षम महिलांच्या कार्यशाळेला उपस्थित राहणार आहेत. जवळपास १ ते सव्वा लाख महिला या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
****

 वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का बसला असून अखिल भारतीय मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन -  एआय एमआयएम हा पक्ष या आघाडीतून बाहेर पडलआहे. विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपामध्ये समाधानकारक जागा न मिळाल्यामुळे आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचं एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवल आहे.  दोन्ही पक्षात जागा वाटपाबाबत प्रदीर्घ चर्चा झाली, त्यानंतर आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएम पक्षाला विधानसभेसाठी केवळ आठ जागा सोडण्यात येतील असं कळवलं, विशेष म्हणजे एमआयएमचा विद्यमान आमदार असलेल्या औरंगाबाद मध्य मतदारसंघाचा या आठ जागांमध्ये समावेश नाही, ही बाब अस्वीकारार्ह आणि अन्यायकारक असल्याचं सांगत, आघाडीतून बाहेर पडत असल्याचं इम्तियाज जलील यांनी या पत्रकात म्हटलं आहे. विधानसभा निवडणुकीसाठी आता एमआयएम औरंगाबाद इथं उमेदवारांच्या मुलाखती आणि निवडीचा कार्यक्रम जाहीर करील, असं त्यांनी या पत्रकात म्हटलं आहे. 
****

 राज्यातले गड किल्ले हे कुठल्याही परिस्थितीत ऐतिहासिक अर्थानेच जपले जातील आणि त्याचं पावित्र्य कायम राखलं जाईल, असं स्पष्टीकरण पर्यटन विभागानं दिलं आहे. या किल्ल्यांचा वापर हॉटेलिंग किंवा लग्न समारंभासाठी होणार असल्याच्या बातम्या पूर्णत: निराधार आणि खोट्या असल्याचं, पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी म्हटलं आहे. ऐतिहासिक वारसा लाभलेले आणि छत्रपती शिवरायांच्या शौर्याचे साक्षीदार असलेल्या किल्ल्यांचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं रावल यांनी नमूद केलं. पर्यटन विभागाच्या सचिव विनीता सिंल यांनीही यासंदर्भात खुलासा केला असल्याचं माहिती संचालनालयाकडून सांगण्यात आलं आहे.
****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****

 पुरोगामी चळवळीतले ज्येष्ठ कार्यकर्ते गोविंद पानसरे हत्या प्रकरणी आणखी तीन मारेकऱ्यांना काल मुंबई तसंच पुणे कारागृहातून अटक करण्यात आली. या तीनही आरोपींना कोल्हापूरच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी दहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला सचिन अंदुरे या `शार्प शूटर`चा यात समावेश आहे. अंदुरे याला पुणे इथल्या तुरुंगातून तर अमित बद्दी आणि गणेश मिस्किन या दोघांना मुंबईतल्या ऑर्थर रोड तुरुंगातून ताब्यात घेण्यात आलं. या प्रकरणी आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या बारा झाली आहे.
****
 काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार एकनाथ गायकवाड यांची मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जुलैमध्ये मिलिंद देवरा यांनी राजीनामा दिला होता. त्यांचा राजीनाम स्वीकारण्यात आला असून त्या पदावर आता गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
****

 उर्दू साहित्यात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या राज्यातल्या १२२ साहित्यिकांचा उद्या औरंगाबाद इथं पुरस्कार देवून गौरव केला जाणार आहे. अल्पसंख्याक विकास आणि वक्फ राज्यमंत्री अतुल सावे यांनी  काल औरंगाबाद इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली होते. मिर्जा गालीब जीवन गौरव पुरस्कार तसंच वली दखनी पुरस्कार यावेळी देण्यात येणार आहेत. मराठवाड्यात अल्पसंख्याक समाजाची संख्या अधिक असल्यामुळे पहिल्यांदाच हा कार्यक्रम औरंगाबाद इथं घेण्यात येत असल्याचं, सावे यांनी सांगितलं, ते म्हणाले..

 उर्दु साहित्य आकॅडमीचे जवळ जवळ १२२ पुरस्कार आहेत, कार्यशाळा आहेत  आणि अल्पसंख्याक विभागा तर्फे ज्या सर्व योजना आहेत त्याची सर्व माहिती देणार आहोत आणि ४० वर्षोंपासून हे सगळे पुरस्कार किंवा हा मुशायराचा कार्यक्रम हा नेहमी मुंबईमध्ये होत होता. पण या वर्षी आपण पहिल्यांदा तो मराठवाड्यामध्ये औरंगाबाद शहरामध्ये करतोय.
****

 ज्येष्ठा गौरी पूजनाचा सण काल सर्वत्र भक्तिभावानं पारंपरिक पद्धतीनं साजरा झाला. घरोघरी ज्येष्ठा कनिष्ठा गौरींना सुग्रास भोजनाचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. वाशिम इथं सिंधु सुभाष सोनुने यांनी आपल्या दोन्ही सुनांची ज्येष्ठा कनिष्ठा गौरी रुपात पूजा करून, समाजासमोर आगळावेगळा आदर्श ठेवला. सासू आणि सुना यांच्यातला सलोखा आणि जिव्हाळा कायम राहावा, हा या मागचा उद्देश असल्याचं, सिंधु सोनुने यांनी सांगितलं.
****

 बेटी बचाओ, बेटी पढाओ या अभियानात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल देशातल पाच राज्य आणि २० जिल्ह्यांना केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते काल नवी दिल्लीत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. यात राज्यातल्या जळगाव जिल्ह्याचा समावेश आहे. जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
****

 उस्मानाबाद जिल्ह्यातल्या शिराढोण सेवा सुविधा केंद्र चालकाला तीनशे रुपयाची लाच मागितल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक पथकानं रंगेहाथ अटक केली. राहुल ओमणे असं या आरोपीचं नाव असून, उत्पन्नाचा दाखला तसंच नॉन क्रिमीलेर प्रमाणपत्र देण्यासाठी छपन्न रुपये एवढे शासकीय शुल्क असताना, त्यानं तीनशे रुपये मागितल्याची तक्रार आल्यानं, ही कारवाई करण्यात आली.
****

 प्रवाशांची मागणी आणि सणांनिमित्त होणारी गर्दी लक्षात घेता, नांदेड –पनवेल-नांदेड जलद गाडीला येत्या तीस सप्टेंबर पर्यंत द्वितीय श्रेणीचा एक आरक्षित डब्बा वाढवण्यात आला आहे.
*****
***

No comments: