Regional Marathi
Text Bulletin, Aurangabad
Date – 07 September 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०७ सप्टेंबर २०१९ सायंकाळी ६.००
****
पुढच्या पाच वर्षांत साडे तीन लाख कोटी रुपये जल जीवन अभियानावर
खर्च करून, घरोघरी पेयजल पोहोचवणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.
औरंगाबाद इथं औद्योगिक नगरी - ऑरिक सिटी, तसंच सुसज्ज ऑरिक सभागृहाचं पंतप्रधानांनी
आज उद्घाटन केलं. त्या दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय सक्षम महिला बचत
गटाच्या मेळाव्यासाठी राज्यभरातून उपस्थित महिलांशी संवाद साधताना ते बोलत होते. तसंच
ऑरिक सिटीमुळं औरंगाबाद शहर हे देशभरातल्या औद्योगिक घडामोडींचा केंद्रबिंदू ठरत असल्याचा
विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. ते म्हणाले...
औरंगाबाद
इंडस्ट्रीयल सिटी की सिग्नेचर बिल्डींग अब सेवा के लिए तयार है. औरंगाबाद नया स्मार्ट
सिटी तो बन ही रहा है, देश की औद्योगिक गती-विधीयों का भी बडा सेंटर होने वाला है.
दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर का भी एक अहम हिस्सा है. अनेक बडी कंपनीया यहां काम
करना शुरू कर चुकी है. आनेवाले समये में और कंपनियां भी यहां पे आऐगी यह कंपनीयां यहां
के लाखों युवाओंको रोजगार के नये अवसर देने वाली है.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,
केंद्रीय मंत्री पियुष गोयल, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, विधानसभाध्यक्ष
हरिभाऊ बागडे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे, भाजप
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत आठ कोटी क्रमांकाची गॅसजोडणी पंतप्रधानांच्या
हस्ते लाभार्थी महिलेला प्रातिनिधीक स्वरुपात प्रदान करण्यात आली. निर्धारित मुदत पूर्ण
होण्याच्या सात महिने आधीच हा टप्पा गाठल्याबद्दल, पंतप्रधानांनी लाभार्थी महिलांना
शुभेच्छा दिल्या. देशात एकही कुटुंब स्वयंपाकाच्या गॅसपासून वंचित राहून नये, या साठी
प्रयत्न सुरु असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले.
महिलांच्या नेतृत्वात राष्ट्र कल्याणाचा निर्धार सरकारनं
केला असल्याचं सांगतानाच, महिला बचत गट सदस्यांसाठी पाच हजार रुपये ओव्हरड्राफ्ट आणि
स्वयंसहायता बचत गटाच्या एका सदस्याला मुद्रा योजनेअंतर्गत एक लाख रुपये कर्जाचा विशेष
लाभ देण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली.
मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेचा गौरवपूर्ण उल्लेख करत, यामुळे
मराठवाड्यातला दुष्काळ दूर होईल, असा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला. महिला
बचत गट प्रदर्शनालाही पंतप्रधानांनी भेट देऊन, महिलांनी तयार केलेल्या वस्तू तसंच वस्त्रांचं
कौतुक केलं.
****
२०१९-२० ते २०२४-२५ या
आर्थिक वर्षांदरम्यान टाक़ण्यात येणाऱ्या १०० लाख कोटी रुपये किंमतीच्या राष्ट्रीय
पायाभूत पाईपलाईन कार्यक्रमात सुरू करण्यात येणाऱ्या प्रकल्पांसाठी कृती दलाची स्थापना
करण्यात आली आहे. आर्थिक व्यवहार सचिव या कृती दलाचे प्रमुख असतील. या कार्यक्रमाअंतर्गत
सुरु करायच्या प्रकल्पांची आर्थिक व्यवहार्यता तपासण्यासाठी हा कृती दल काम करणार आहे.
या प्रकल्पांसाठीची किंमत आणि त्यासाठी भांडवल कसं जमा करायचं याबाबत हा दल विविध मंत्रालयांना
सूचनाही करणार आहे. तसंच काही प्रकल्पांसाठी आवश्यक असलेली खासगी भांडवल उभे करण्याबाबतही
हा दल काम करणार आहे. २०२४-२५ पर्यंत देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलीयन करण्यासाठीचं
उद्दिष्ट साध्य करण्यासाठीच्या दृष्टीनं या दलाची स्थापना करण्यात आली आहे.
****
जम्मू आणि काश्मीरमध्ये बारामुल्ला जिल्ह्यातल्या सोपोर भागात
दहशतवाद्यांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्यात एका अल्पवयीन मुलीसह चार कामगार जखमी झाले
आहेत. या भागात दहशतवाद्यांनी नागरिकांच्या घरात शिरून गोळीबार केला. त्यामुळे ही दुर्घटना
घडली असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
****
उर्दु साहित्यातल्या वेगवेगळ्या क्षेत्रात उत्कृष्ट योगदान
देणाऱ्या व्यक्तीना अल्पसंख्याक विकास विभाग, मौलाना आझाद अल्पसंख्यांक विकास महामंडळ
आणि उर्दु अकादमी यांच्या वतीनं उद्या औरंगाबाद इथं पुरस्कार देण्यात येणार आहेत. या
पुरस्कार वितरण सोहळ्यात उर्दु मुशायराचं आयोजनही करण्यात आलं आहे. अल्पसंख्यांक विकास
विभागाचे राज्यमंत्री तसंच उर्दु अकादमीचे उपाध्यक्ष अतुल सावे यांनी काल औरंगाबाद
इथं ही माहिती दिली.
//*************//
No comments:
Post a Comment