Regional Marathi
Text Bulletin, Aurangabad
Date – 08 September 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०८ सप्टेंबर २०१९ सायंकाळी ६.००
****
जागतिक स्तरावरील
उच्च आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आजच्या शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल होत आहेत.
विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान देण्यापेक्षा रोजगाराभिमुख आणि कौशल्यावर आधारित
शिक्षण देणाऱ्या संस्थांना प्रोत्साहन देण्यात येत असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी केलं. आंत्रप्र्युनर्स ऑफ नागपूर या कॉफीटेबल बुकचं प्रकाशन
आज नागपुरात झालं. यावेळी ते बोलत होते. नागपूर आता एज्युकेशन हब बनलं असून, विविध
क्षेत्रातील दर्जेदार शिक्षण संधी नागपुरात उपलब्ध झाल्या आहेत, असं ते यावेळी म्हणाले.
****
विधानसभा निवडणुकीला
सामोरे जाताना, अगोदर महापुरामुळे निर्माण झालेले प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न केले पाहिजेत,
असं मत महसूल आणि बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं. सांगली इथं भारतीय
जनता पक्षातर्फे बुथ समिती कार्यकर्त्यांचा मेळावा आणि रेल्वे उड्डाणपुलाच्या लोकार्पण
कार्यक्रमात ते बोलत होते.
राज्यातील सर्व
रेल्वे फाटक संपुष्टात आणण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी १७० ठिकाणी
रेल्वे उड्डाणपूल उभारले जाणार आहेत, अशी माहितीही त्यांनी आपल्या भाषणात दिली.
****
अल्पसंख्याक
समाजातल्या युवकांना रोजगारक्षम प्रशिक्षण देण्यासाठी कौशल्य विकासाचं वेगळं केंद्र
उभारण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. त्यासाठी सरकारनं ३० कोटी रुपयांच्या निधीची
तरतूद केली असून, निविदाही प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती उर्दु अकादमीचे उपाध्यक्ष
आणि अल्पसंख्याक विकास आणि वक्फ राज्यमंत्री अतुल सावे यांनी आज औरंगाबाद इथं केलं.
अल्पसंख्याक
विकास विभाग, मौलाना आझाद अल्पसंख्यांक विकास महामंडळ आणि उर्दु अकादमी यांच्या वतीनं
औरंगाबाद इथं उर्दू साहित्य क्षेत्रात उत्कृष्ट योगदान देणाऱ्या १२२ व्यक्तींना आज
सावे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी मिर्झा
गालीब जीवन गौरव पुरस्कार नवी दिल्लीचे शमीम हन्फी यांना, तर २०१८ साठी अलिगडचे काझी
अफजल हुसैन यांना देण्यात आला. एक लाख रूपये, मानपत्र, प्रमाणपत्र, शाल असं पुरस्काराचं
स्वरूप आहे. वली दख्नी राज्य पुरस्कार २०१७ साठी यवतमाळचे डॉ. याह्या नशीन यांना, तर
२०१८ साठी अमरावतीचे सय्यद सफदर यांना देण्यात आला. ५१ हजार रूपये, मानपत्र, प्रमाणपत्र,
शाल असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.
****
भारतीय राज्यघटनेत
नागरिकांच्या मुलभूत अधिकारांचा समावेश आहे. समाजातील सर्व घटकातील नागरिकांचं जीवनमान
उंचावण्यासाठी, तसंच नागरिकांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी
होणं आवश्यक आहे, असं मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती रवी
देशपांडे यांनी व्यक्त केलं.
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या
कळंब इथं महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हाधिकारी
कार्यालयातर्फे आयोजित शासकीय सेवा आणि योजनांच्या महामेळाव्याचं उद्घाटन करतांना ते
बोलत होते. या मेळाव्याचा नागरिकांनी लाभ घेण्याचं आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने
यांनी यावेळी केलं.
****
सामाजिक न्याय
विभागाच्या पुढाकारानं उद्या सोमवारी सकाळी मंत्रालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांच्या तैलचित्राचं आणि संविधानाच्या प्रास्ताविकेचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी
दिली. हे तैलचित्र मुंबईचे प्रसिद्ध चित्रकार आर. टी. कांबळे यांनी बनवलं आहे.
****
भोन स्तूप बचाव
कृती समितीच्या वतीनं वाशिम जिल्ह्यधिकारी कार्यालय आणि सर्व तहसील कार्यालयांवर आज
धरणे आंदोलन करण्यात आलं. बुलढाणा जिल्ह्यात भोन इथल्या संग्रामपूर गावात मोठ्या प्रमाणात
मौर्यकालीन पुरातत्त्वीय अवशेष आढळले होते.
सम्राट अशोकाने
बांधलेल्या ८४ हजार स्तूपांपैकी एक असलेला हा स्तूप वाचवून त्याला हेरिटेजचा दर्जा
द्यावा, अशा मागणीचं निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राष्ट्रपतींना पाठवण्यात
आलं.
****
अश्वमेध ग्रामीण
विकास सामाजिक संस्था, तसंच डी एक्स सी तंत्रज्ञान यांच्या वतीने ‘स्वस्थ नारी मिशन’
या सुसज्ज रुग्णवाहिकेचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात
आलं.
****
No comments:
Post a Comment