Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 08 September 2019
Time 1.00 to
1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०८ सप्टेंबर २०१९ दुपारी १.०० वा.
****
नासा या
अमेरिकी अंतराळ संशोधन संस्थेनं, भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोच्या चांद्रयान
-२ अभियानाचं कौतुक केलं आहे. अंतराळ संशोधनाच्या उत्तुंग ध्येयातून प्रेरित झालेल्या
इस्रोबरोबर, भविष्यात सौर यंत्रणेच्या शोधासाठी उत्सुक असल्याचं नासानं प्रसिद्ध केलेल्या
निवेदनात म्हटलं आहे. चंद्रयान -२ अभियानाची ९० ते ९५ टक्के उद्दिष्टं पूर्ण झाली आहेत.
लँडरचा संपर्क तुटला असला, तरी चंद्राच्या संशोधन अभियानात ही यंत्रणा महत्त्वपूर्ण
योगदान देत आहे, असंही नासानं म्हटलं आहे.
दरम्यान,
चांद्रयान-२ मोहिमेत विक्रम लँडर चंद्रावर उतरवण्यात अपयश आलं असलं, तरी इस्रोचे इतर
संशोधन प्रकल्प पूर्वीप्रमाणेच पुढं सुरु राहतील, असं संस्थेचे अध्यक्ष डॉ. के. सिवन
यांनी स्पष्ट केलं आहे. २०२२ मध्ये गगनयान मोहीम आणि येत्या ऑक्टोबरमध्ये कार्टोसॅट-३
या उच्च चित्रण क्षमतेच्या उपग्रहाचं प्रक्षेपण, हे दोन मोठे कार्यक्रम इस्रोनं ठरवले
असल्याचं त्यांनी प्रसारभारतीला दिलेल्या माहितीत सांगितलं.
****
नरेंद्र मोदी सरकार हे राष्ट्रीय सुरक्षा, विकास आणि गरिबांच्या
कल्याणासाठीच काम करत आहे. समाजातील प्रत्येक घटकासाठी हे सरकार आशेचं प्रतीक आहे,
असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान मोदी यांच्या सरकारला
१०० दिवस पूर्ण झाल्यानिमित्त शाह यांनी ट्विटर संदेशाद्वारे सरकारच्या कामांबद्दल
माहिती दिली. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवणे, तसंच तिहेरी तलाकवर आणलेली बंदी, असे
अनेक धाडसी निर्णय या सरकारनं घेतल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
****
माजी केंद्रीय मंत्री आणि प्रसिद्ध विधिज्ञ राम जेठमलानी यांच्या
निधनानं आपण देशातील एक निष्णात कायदेपंडित गमावला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. जेठमलानी यांनी विधी, समाजकारण आणि राजकारण
क्षेत्रात आपल्या कर्तबगारीनं एक मानदंड निर्माण केला होता. विशेषत: आणीबाणीविरुद्ध
त्यांनी दिलेला लढा कायम स्मरणात राहील, असंही मुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकसंदेशात
म्हटलं आहे.
****
मुंबईत आज
आणि उद्या जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. कुलाबा
वेधशाळेनं दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत मुंबई परिसरात ७० मिलिमीटर पावसाची
नोंद झाली आहे.
****
सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्रीपासून पावसाचा जोर कायम आहे.
यामुळे दोडामार्ग तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली असून, अनेक गावांचा संपर्क तुटला
आहे. तिलारी नदीचं पाणी वाढल्यानं धरणाचे चारही दरवाजे उघडण्यात आले आहेत. समुद्र खवळल्यामुळे
मासेमारीवर मोठा परिणाम झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
राज्याचे वनबलप्रमुख यू. के. अग्रवाल आणि सामाजिक वनीकरण
विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक अनुराग चौधरी आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. त्यांनी
वन विभागाच्या विभागीय अधिकाऱ्यांची प्रादेशिक कार्यालयात भेट घेतली. यावेळी झालेल्या
बैठकीत त्यांनी ३३ कोटी वृक्ष लागवड मोहीम आणि इतर कामांचा आढावा घेतला.
****
अल्पसंख्याक विकास विभाग,
मौलाना आझाद अल्पसंख्यांक विकास महामंडळ आणि उर्दु अकादमीच्या वतीनं आज औरंगाबाद इथं
उर्दु साहित्यातल्या वेगवेगळ्या क्षेत्रात उत्कृष्ट योगदान देणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार
देऊन गौरवण्यात आलं. अल्पसंख्यांक विकास विभागाचे राज्यमंत्री, तसंच उर्दु अकादमीचे
उपाध्यक्ष अतुल सावे यांच्या उपस्थितीत, मौलाना आझाद संशोधन केंद्रात सध्या सुरू असलेल्या
या कार्यक्रमात उर्दु मुशायराही सादर केला जाणार आहे.
****
फुले-आंबेडकरी आणि सत्यशोधक चळवळीचे सक्रिय कार्यकर्ते
के. ई. हरिदास यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हरिदास यांच्या स्वलिखित सत्यशोधक
कार्यकर्ता या पुस्तकाचं प्रकाशन नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे
माजी कुलगुरु आणि माजी खासदार डॉ. जनार्दन वाघमारे यांच्या हस्ते आज होणार आहे. मराठवाडा
महसूल प्रबोधिनीच्या सभागृहात सायंकाळी ५ वाजता हा कार्यक्रम होईल.
****
प्रसिद्ध कवी बी. रघुनाथ यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या
कथा आणि कवितांवर आधारित, आज कुणाला गावे, हा कार्यक्रम आज औरंगाबाद इथं सादर केला
जाणार आहे.
****
No comments:
Post a Comment