Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 09 September 2019
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक -०९
सप्टेंबर २०१९ सकाळी ७.१० मि.
****
v पहिल्या शंभर दिवसात केंद्र सरकारनं विविध क्षेत्रात महत्वपूर्ण निर्णय घेतल्याचा,
माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांचा दावा
v ज्येष्ठ विधिज्ञ, माजी कायदा मंत्री राम जेठमलानी
यांचं निधन
v ए.आय.एम.आय.एम. सोबतची
युती, पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांचा निर्णय येईपर्यंत कायम - ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर
v आणि
v उस्मानाबाद इथल्या
नियोजित ९३व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी नितीन तावडे यांची
निवड
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं, आपल्या
दुसऱ्या कार्यकाळाच्या पहिल्या शंभर दिवसात जम्मू- काश्मीर आणि आर्थिक बाबींसह अनेक
क्षेत्रात महत्वपूर्ण निर्णय घेतल्याचं, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश
जावडेकर यांनी म्हटलं आहे. केंद्रातल्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारला शंभर दिवस पूर्ण
झाल्याच्या पार्श्वभूमीवर काल ते वार्ताहरांशी बोलत होते. जी-सेव्हन, संयुक्त राष्ट्र
सुरक्षा परिषद यांसारख्या आंतरराष्ट्रीय संघटना आणि जगभरातल्या नेत्यांनी कलम ३७० रद्द
करण्याच्या निर्णयाचं स्वागत केल्याचं जावडेकर म्हणाले. शेतकरी, गरीब, कामगार, अनुसूचित
जाती जमातीच्या नागरिकांना सशक्त बनवण्यासाठीही सरकारनं अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतल्याचंही
जावडेकर यांनी यावेळी सांगितलं. कामकाजात पारदर्शकतेला महत्त्व देण्यासाठी अनेक भ्रष्ट
अधिकाऱ्यांना सेवेतून मुक्त केल्याचं सांगून त्यांनी, देशात भ्रष्टाचाराला जागा नसल्याचं
स्पष्ट केलं. येत्या २०२५ पर्यंत भारत ५० ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनेल, अशी अपेक्षा
जावडेकर यांनी यावेळी व्यक्त केली.
****
ज्येष्ठ विधिज्ञ, माजी
कायदा मंत्री
राम जेठमलानी यांचं काल नवी दिल्ली इथं प्रदीर्घ आजारानं निधन झालं, ते ९५ वर्षांचे
होते. देशातल्या सर्वोत्कृष्ट विधीज्ञांमध्ये त्यांची गणना होत असे. जेठमलानी यांनी
'बार कौन्सिल ऑफ इंडिया'चे अध्यक्षपदही भूषवलं होतं. २००४ मध्ये त्यांनी लखनौमधून अटलबिहारी
वाजपेयी यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. राम जेठमलानी यांनी राजीव गांधी आणि इंदिरा
गांधी यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी ते चारा घोटाळा प्रकरणातील आरोपी लालूप्रसाद
यादव यांच्या बाजूने खटले लढवले होते. याबरोबरच त्यांनी संसदेवरील हल्ल्याप्रकरणी अफझल
गुरू, तसंच सोहराबुद्दीन चकमक प्रकरणी अमित शहा यांचे खटलेही लढवले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी
आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जेठमलानी यांना श्रद्धांजली अर्पण केली. जेठमलानी
यांच्या निधनानं आपण देशातला एक निष्णात कायदेपंडित गमावला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
****
अखिल भारतीय मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन - ए.आय.एम.आय.एम.
सोबतची युती पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांचा निर्णय येईपर्यंत कायम आहे, असं
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काल नागपूरमध्ये स्पष्ट केलं. येत्या
विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीसोबत युती होणार नसल्याची घोषणा एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष
खासदार इम्तियाज जलील यांनी दोन दिवसांपूर्वी
केली होती. त्या पार्श्वभूमीवर ॲडव्होकेट आंबेडकर यांनी काल हे स्पष्टीकरण दिलं. आमची
एमआयएमसोबतची युती राज्यातल्या नेत्याशी नाही, तर पक्षाचे अध्यक्ष ओवैसी यांच्यासोबत
आहे, असं ते म्हणाले.
****
अल्पसंख्याक समाजातल्या
युवकांना रोजगारक्षम प्रशिक्षण देण्यासाठी कौशल्य विकासाचं वेगळं केंद्र उभारण्या करता
सरकारनं ३० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली असल्याचं उर्दु अकादमीचे उपाध्यक्ष आणि
अल्पसंख्याक विकास आणि वक्फ राज्यमंत्री अतुल सावे यांनी सांगितलं. उर्दू साहित्य क्षेत्रात
उत्कृष्ट योगदान देणाऱ्या १२२ व्यक्तींना काल औरंगाबाद इथं त्यांच्या हस्ते २०१७- १८
या वर्षांचे पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी नवी दिल्लीचे
शमीम हन्फी आणि अलिगडचे काझी अफजल हुसैन यांना मिर्झा गालीब जीवन गौरव पुरस्कार देण्यात
आला. एक लाख रूपये, मानपत्र, प्रमाणपत्र आणि शाल असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. यवतमाळचे
डॉक्टर याह्या नशीन आणि अमरावतीचे सय्यद सफदर यांना वली दख्नी राज्य पुरस्कार देण्यात
आला. ५१ हजार रूपये, मानपत्र, प्रमाणपत्र, शाल असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.
****
राज्यात काल काही भागात पाऊस झाला. मुंबईत दिवसभर
पाऊस सुरू होता. मुंबईत आजही जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला
आहे. सांगली
जिल्ह्यात कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असून खबरदारीचा उपाय म्हणून मिरज आणि
इस्लामपूर इथं राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातल्या धरणांमध्ये पाण्याची होणारी आवक लक्षात घेऊन राधानगरी, कोयना
तसंच अलमट्टीसह अन्य धरणातून नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आलं आहे.
यामुळे नदीकाठच्या सर्व गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून
शिरोळ आणि करवीर तालुक्यातल्या काही गावांमधल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं
असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
औरंगाबाद शहरातही
काल दुपारी जोरदार पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यात तीन वाजल्यापासून रिमझिम पावसानं हजेरी
लावली. जालना जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण होतं. जळगाव जिल्ह्यात सर्वत्र दमदार
पाऊस झाला. गडचिरोली जिल्ह्यात चार दिवसांपासून सतत कोसळणारा मुसळधार पाऊस थांबला असून,
भामरागड वगळता सर्व प्रमुख रस्त्यांवरची वाहतूक सुरु झाली आहे. पैनगंगा नदीवरचे वाशिम
जिल्ह्यातले सर्व ११ बंधारे पूर्ण क्षमतेनं भरले आहेत.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित
केलं जात आहे.
****
उस्मानाबाद इथल्या नियोजित ९३ व्या अखिल भारतीय साहित्य
संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी उस्मानाबादच्या मराठवाडा साहित्य परिषदेचे शाखाध्यक्ष
नितीन तावडे यांची निवड करण्यात आली आहे. प्रमुख कार्यवाहपदी रविंद्र केसकर तर कोषाध्यक्षपदी
माधव इंगळे यांची निवड झाली आहे. काल दुपारी उस्मानाबाद इथं झालेल्या एका बैठकीत या
पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. उस्मानाबाद शहर आणि परिसरातील विविध संस्था, संघटनांच्या
एकत्रित प्रयत्नांतून हे संमेलन यशस्वी करण्यासाठी आपण कटीबध्द आहोत, असं तावडे यांनी
निवडीनंतर सांगितलं. राज्याच्या साहित्य आणि सांस्कृतिक इतिहासात मानदंड ठरेल, असा
मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला.
****
बाजार समितीनं शेतमालाला अधिक भाव देण्याचा प्रयत्न
करावा असं आवाहन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केलं आहे. औरंगाबाद कृषी उत्पन्न
बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते काल बोलत होते. यावेळी बाजार समितीचे आदर्श
शेतकरी, आडतीदार, खरेदीदार, व्यापारी, बाजार समितीच्या आदर्श संचालिका, कर्मचारी
आणि हमाल यांचा गौरव बागडेंच्या हस्ते करण्यात आला.
****
बीड जिल्ह्यातल्या परळी
आणि अंबाजोगाई तालुक्यातल्या महिला बचत गटांना महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्नती
अभियानातर्गंत ८०० दुभत्या गायींचं वाटप महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे तसंच
पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते काल करण्यात आलं. महिलांनी
दुधाचा व्यवसाय करून कुटुंबाचा आर्थिक कणा बनण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
****
देशाच्या संविधानाला
धक्का लागू नये, असं ज्यांना वाटतं, त्यांनी सत्यशोधक विचारांची नव्यानं मांडणी करण्याचं
आवाहन, ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांनी व्यक्त केलं. सत्यशोधक कार्यकर्ते के.ई. हरिदास
यांचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सत्कार करतांना काल ते औरंगाबाद इथं बोलत होते. फुले-
शाहू- आंबेडकरांनी आदर्श विचार दिला आहे. हा
विचार अंमलात आणल्याशिवाय खरा बोध होणार नाही, असंही आढाव यांनी सांगितलं. सामान्य
माणसाला पायावर उभी करणारी सहकार चळवळ मोडीत निघत असल्याबद्दलची खंत माजी कुलगुरू डॉक्टर
जर्नादन वाघमारे यांनी यावेळी बोलतांना व्यक्त
केली.
****
लातूर जिल्ह्यातल्या अचलबेट देवस्थानला पाच कोटी
रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर
यांनी पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे देवस्थानसाठी निधीची मागणी केली होती.
****
राज्याचे वनबल प्रमुख
यू. के. अग्रवाल आणि सामाजिक वनीकरण विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक अनुराग चौधरी
काल औरंगाबाद दौऱ्यावर होते. त्यांनी वन विभागाच्या विभागीय अधिकाऱ्यांची प्रादेशिक
कार्यालयात भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत त्यांनी ३३ कोटी वृक्ष लागवड मोहीम आणि
इतर कामांचा आढावा घेतला.
****
अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरूष एकेरीच्या अंतिम
सामन्यात पुन्हा एकदा स्पेनच्या रफाल नदालनं बाजी मारली. त्यानं रशियाच्या डॅनिल मेदवेदेव
याला पराभूत केलं. त्याचं हे १९वं ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे. महिला एकेरीत कॅनडाच्या
१९ वर्ष वयाच्या बियांका आंद्रिस्कू हिनं अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सला पराभूत करून
विजेतेपद पटकावलं.
****
औरंगाबाद शहराचं ग्रामदैवत
असलेल्या राजाबाजार इथल्या संस्थान गणपती परिसरात काल हेरिटेज वॉक घेण्यात आला. इतिहास
तज्ज्ञ डॉक्टर दुलारी कुरेशी आणि डॉक्टर रफत कुरेशी यांनी स्टेट चित्रपटगृह, संस्थान
गणपती आणि जाधवमंडी परिसराच्या इतिहासाची आणि ऐतिहासिक वास्तूंची माहिती दिली.
*****
***
No comments:
Post a Comment