Wednesday, 4 September 2019

Text - AIR News Bulletin, Aurangabad 04.09.2019....Headline Bulletin


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
०4 सप्टेंबर २०१९ सकाळी ११.०० वाजता
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या रशिया दौऱ्यासाठी आज सकाळी व्लादिवास्तोक इथं पोहचले असून ते सध्या व्लादिवास्तोकजवळील जहाज बांधणी प्रकल्पाला भेट देत आहेत. पाचव्या पौर्वात्य आर्थिक मंचाच्या परिषदेला पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार आहेत. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आपण उत्सुक असल्याचं ट्वीट मोदी यांनी केलं आहे. दोन्ही देशांमधे सांस्कृतिक सहकार्य वाढवण्यासाठी महात्मा गांधीजींच्या १५०व्या जयंती निमित्त एक विशेष टपाल तिकिट प्रकाशित केलं जाईल, असंही त्यांनी ट्विटरवर म्हटलं आहे. योगाची लोकप्रियता वाढवण्यासाठी एकअ‍ॅपही सुरु केलं जाईल, असंही पंतप्रधानांनी सांगितलं.
****
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी शेतीच्या उपसा सिंचन योजनांवरील थकीत कर्ज माफ करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. धुळे जिल्ह्यातल्या शिंदखेडा श्रीकृष्ण उपसा जलसिंचन सहकारी सोसायटीच्या कर्जमाफी संदर्भात काल मंत्रालयात झालेल्या बैठकीत सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी ही माहिती दिली.
****
बऱ्याच दिवसांच्या विश्रांती नंतर गेल्या दोन दिवसांपासून पावसानं पुन्हा हजेरी लावली आहे. अनेक जिल्ह्यांत कालपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. सातारा आणि अमरावती जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. सातारा जिल्ह्यात सतत सुरु असलेल्या पावसामुळं कोयना धरणातील पाणीसाठा वाढत असून आज सकाळपासून धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. पालघर जिल्ह्यातल्या बोईसर, धनानी नगर मधल्या अनेक सखल भागांत पाणी साचलं आहे. तसंच नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. मात्र, अकोला इथं हलका पाऊस सुरु असून, नागरिकांना दमदार पावसाची प्रतिक्षा असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
महिला क्रिकेटपटू मिताली राजनं टी ट्वेंटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. एकदिवसीय क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं, मितालीनं सांगितलं. मिताली सध्या एकदिवसीय क्रिकेट संघाची कर्णधार आहे.
****

No comments: