Regional Marathi
Text Bulletin, Aurangabad
Date – 04 September 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०४ सप्टेंबर २०१९ दुपारी १.०० वा.
****
मुंबई तसंच राज्यात कोकणासह
काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. आज पहाटेपासून मुंबई आणि उपनगरांमध्ये
संततधार पाऊस पडत असून, शहरातील अनेक सखल भागातून पाणी साचल्यानं वाहतुकीवर परिणाम
झाला आहे. मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गासह तिन्ही मार्गावरील लोकल गाड्या दहा ते
वीस मिनिटं उशिरानं धावतं आहे. अनेक ठिकाणी रेल्वे रुळांवर पाणी साचल्यानं उपनगरी रेल्वे
वाहतूक ठप्प झाली आहे.
रायगड जिल्ह्यात गेले तीन दिवस
कोसळत असलेल्या मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झाले आहे. सावित्री, अंबा, कुंडलिका
या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून, महाड, नागोठणे, रोहा शहरात पूरस्थिती निर्माण
झाली आहे. रोहा-नागोठणे रस्त्यावर भिसे खिंड इथं दरड कोसळल्यानं या मार्गावरील वाहतूक
बंद आहे. तसंच ताम्हाणी-कोलाड रस्त्यावर नीवे गावाजवळ दरड कोसळल्यानं पुणे ते कोलाड
हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावर देखील काल
रात्री दरड कोसळून वाहतूक ठप्प झाली होती. भीषण पूरस्थितीची शक्यता असल्यानं, रायगड
जिल्हा प्रशासनानं जनतेला सतर्कतेचा इशारा दिला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्रभर
पावसाची संततधार सुरू असून २४ तासांत जिल्ह्यात एकूण ६७८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
या पावसामुळे गणेशभक्तांच्या उत्साहावर विरजण पडलं आहे.
सातारा जिल्ह्यात सतत सुरु
असलेल्या पावसामुळे कोयना धरणातला पाणीसाठा वाढत असून आज सकाळ पासून धरणातून पाणी सोडण्यात
येत आहे.
पालघर जिल्ह्यातल्या बोईसर,
धनानी नगर मधल्या अनेक सखल भागांत पाणी साचलं. नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. अमरावती
जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार तर अकोला इथं हलका पाऊस सुरु आहे. अकोल्यात नागरिकांना
मोठ्या पावसाची प्रतीक्षा असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
दरम्यान, राज्याच्या अनेक भागात,
अतिवृष्टीचा इशारा भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाच्या
दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. ते सध्या व्लादिवास्तोक जवळच्या जहाजबांधणी प्रकल्पाला भेट
देत आहेत. भारत आणि रशिया यांच्यातील २०वी वार्षिक शिखर परिषद, संरक्षण आणि नागरी अणुऊर्जापासून
नवीन क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय संबंध वाढवण्यासंबधी दोन्ही देश कटीबद्ध आहे. मेक इन
इंडिया योजने अंतर्गत रशियन कंपन्या भारतात गुंतवणुकीसाठी इच्छुक असुन व्लादिवोस्तोकमधल्या
गुंतवणुकीच्या संधी शोधण्यासाठी, भारतीय व्यावसायिक प्रतिनिधी मंडळही व्लादिवोस्तोक
इथं दाखल झाल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
वैद्यकीय व्यावसायिकांविरोधात
होणारी हिंसा थांबवण्यासाठी कायदा करण्याची गरज भारतीय वैद्यक संस्था आयएमए ने व्यक्त
केली आहे. या मागणीचं पत्र आयएमएनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलं आहे. आसाममध्ये
नुकत्याच एका चहाच्या मळ्यात डॉक्टरवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ही मागणी
करण्यात आली आहे. भीती आणि हिंसेच्या वातावरणात नागरिकांना गुणवत्तापूर्ण वैद्यकीय
सेवा देणं शक्य नसल्याचं, संघटनेनं पंतप्रधानांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे. पंतप्रधानांनी
मन की बात या कार्यक्रमातून हा मुद्दा मांडावा, असंही संघटनेनं म्हटलं आहे. आयएमए ही
वैद्यकीय व्यावसायिकांची देशातली सर्वात मोठी संघटना आहे. दरम्यान, केंद्रीय आरोग्य
मंत्रालयानं, वैद्यकीय सेवा सुरक्षा कायद्याचा मसूदा तयार केलेला असून, तो जनतेच्या
प्रतिक्रियांसाठी खुला करण्यात आलेला आहे.
****
कर्तारपूर मार्गिकेसाठी पाकिस्तानसोबत
चर्चेची तिसरी फेरी आज झाली. या चर्चेसाठी २० सदस्यांचं पाकिस्तानी शिष्टमंडळ आज सकाळी
अटारी सीमेमार्गे भारतात दाखल झालं. पंजाबातल्या गुरदासपूर जिल्ह्यात सीमेवर असलेल्या
डेरा बाबा नानक देवस्थानपासून सीमेपार चार किलोमीटर अंतरावर असलेल्या कर्तारपूर गुरुद्वाऱ्यापर्यंत
ही मार्गिका तयार होत आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात उपराष्ट्रपती व्यंकय्या
नायडू यांनी या मार्गिकेची पायाभरणी केली होती. गुरू नानक देव यांच्या पाचशे पन्नासाव्या
जयंतीच्या पार्श्वभूमीवर येत्या नोव्हेंबर महिन्यात ही मार्गिका वाहतुकीसाठी खुली केली
जाईल. त्यानंतर भाविकांना पाकिस्तानातल्या कर्तारपूर इथं जाण्यासाठी व्हिसा घेण्याची
आवश्यकता राहणार नाही.
****
No comments:
Post a Comment