Friday, 1 November 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 01.11.2019 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 01 November 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक -०१ नोव्हेंबर २०१ सकाळी ७.१० मि.
**** 

Ø  शिवसेनेच्या विधीमंडळ पक्ष नेतेपदी आमदार एकनाथ शिंदे यांची एकमतानं फेरनिवड
Ø  ठरलेल्या मुद्यांवर भाजप कायम राहिल्यास स्थिर सरकार देऊ - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
Ø  बाल साहित्यिक गिरिजा कीर यांचं निधन
आणि
Ø  एकता दौड मध्ये नागरिकांचा उत्स्फुर्त सहभाग
****

 शिवसेनेच्या विधीमंडळ पक्ष नेतेपदी आमदार एकनाथ शिंदे यांची एकमतानं फेरनिवड करण्यात आली आहे. प्रथमच आमदार झालेले आदित्य ठाकरे यांनी शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. आमदार प्रताप सरनाईक यांनी त्याला अनुमोदन दिलं. आमदार सुनील प्रभू यांची विधानसभेतले पक्षप्रतोद म्हणून या बैठकीत निवड करण्यात आली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना ठाकरे यांनी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिवसेनेला राज्यात सत्तेत समान वाटा देण्यासंदर्भात भाजपनं आश्र्वासन दिलेलं नसल्याच्या केलेल्या विधानाबद्दल नाराजी व्यक्त केली. २०१४च्या तुलनेत यंदा शिवसेनेला सत्तेत अधिक वाटा मिळावा यावर त्यांनी यावेळी भर दिल्याचं पीटीआय वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे. भाजपनं सत्तेत सहभागाबद्दल अद्याप कोणताही प्रस्ताव दिला नसल्याची माहितीही ठाकरे यांनी यावेळी दिली. भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यासोबत जे ठरले आहे, त्यावर त्यांनी कायम रहावे, आपण स्थिर सरकार देऊ, असंही ठाकरे यांनी म्हटलं आहे.

 या बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलतांना शिवसेनेचे विधीमंडळ नेते एकनाथ शिंदे यांनी राज्यात सत्ता स्थापनेसंदर्भातील निर्णय घेण्यासंदर्भातले सर्व अधिकार पक्षप्रमुख ठाकरे यांना देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याचं सांगितलं.

 विधिमंडळ गट नेतेपदाच्या निवडीनंतर शिवसेनेच्या सर्व ६३ आमदारांच्या शिष्टमंडळानं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. राज्यातल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्यावी, पावसामुळे नुकसान झालेले शेतकरी आणि मच्छिमारांना मदत मिळावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
****

 बहुजन विकास आघाडीसह दोन अपक्ष आमदारांनी काल भाजपला पाठिंबा दिला. हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखालच्या बहुजन विकास आघाडीकडे तीन आमदार आहेत. सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडून आलेले अपक्ष आमदार संजय शिंदे आणि कोल्हापूर जिल्ह्यातले इचलकरंजीचे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला. आवाडे यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना पाठिंब्याचं पत्र दिलं. तर तालुक्यातील सर्व प्रमुख नेतेमंडळीशी चर्चा करुन आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला असल्याचं संजय शिंदे यांनी सांगितलं. याबरोबरच भाजपला पाठिंबा देणाऱ्या आमदारांची संख्या १५ झाली आहे तर शिवसेनेला पाठिंबा देणाऱ्या आमदारांची संख्या सात झाली आहे.
****

 महायुतीतल्या प्रत्येक छोट्या घटक पक्षाला एक - एक मंत्रिपद मिळावं, अशी मागणी भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष-केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. ते काल मुंबईत महायुतीतल्या घटक पक्षांच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलत होते. राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर, रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत आणि शिवसंग्रामचे विनायक मेटे यावेळी उपस्थित होते.
****

 काँग्रेसच्या नवनियुक्त आमदारांची पक्षाचे महासचिव मलिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत काल मुंबईत बैठक झाली. क्षांच्या वरिष्ठांच्या नेतत्वाखाली लवकरच काँग्रेस क्षांच्या विधीमंडळ नेत्याची निवड केली जाईल, असं खरगे यांनी यावेळी सांगितलं. तत्पर्वी, पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केली.  
****

 जम्मू - काश्मीर आणि लडाख हे दोन केंद्रशासित प्रदेश कालपासून नव्यानं अस्तित्वात आले. लडाख या केंद्रशासित प्रदेशाचे नायब राज्यपाल म्हणून राधाकृष्ण माथुर यांचा काल लेह इथं शपथविधी झाला. जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती गीता मित्तल यांनी त्यांना पदाची शपथ दिली. जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा प्रदान करणारं राज्यघटनेतलं कलम ३७० संसदेनं रद्द केल्यानंतर या दोन भागांना केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला आहे. यामुळे आता देशात राज्यांची संख्या २८ झाली असून केंद्रशासित प्रदेशांची संख्या वाढून नऊ झाली आहे.
****

 माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव प्रकरणी, पाकिस्ताननं व्हिएन्ना कराराचं उल्लंघन केलं असल्याचं आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे अध्यक्ष न्यायाधीश अब्दुल कावी युसूफ यांनी संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत सांगितलं. याप्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयानं तयार केलेला अहवाल त्यांनी आमसभेत सादर केला.
****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****

 बाल साहित्यिक, कथाकथनकार आणि सिद्धहस्त लेखिका गिरिजा कीर यांचं काल वृद्धापकाळानं मुंबईत निधन झालं. त्या ८६ वर्षाच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. कथा, कांदबरी, प्रवास वर्णन याचबरोबर बालसाहित्यात मोलाची भर घालणाऱ्या कीर यांच्या गिरिजाघर, देवकुमार, चांदण्याचं झाड, चंद्रलिंपी, चक्रवेध, या कादंबऱ्यांसह १००हून अधिक पुस्तकं प्रसिद्ध आहेत. साहित्य क्षेत्रातल्या योगदानाबद्दल त्यांना मराठी साहित्य परीषदेचा ह. ना. आपटे उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार, पुणे मराठी ग्रंथालयाच्या कमलाबाई टिळक पुरस्कार, अभिरुची पुरस्कार आणि मुंबईचा श्री अक्षरधन स्त्री  साहित्यिका पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. 
****

 भारतीय कम्युनिस्ट पक्ष-भाकपचे ज्येष्ठ नेते माजी खासदार गुरुदास दासगुप्ता यांचं काल कोलकाता इथं प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते ८३ वर्षांचे होते. अखिल भारतीय कामगार संघटना - ‘आयटक’चे सरचिटणीस म्हणूनही त्यांनी काम पाहिलं होतं. 
****

 देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त काल त्यांना देशभरातून आदरांजली वाहण्यात आली. तसंच माजी पंतप्रधान इदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने त्यांना देशभरातून अभिवादन करण्यात आलं. गुजरातमधल्या केवडिया इथं आयोजित एका समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना राष्ट्रीय एकतेची शपथ दिली. नवी दिल्लीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पटेल यांना अभिवादन केलं. सरदार पटेल हे दूरदृष्टी असलेले राजकीय नेते होते, असं ते म्हणाले. उपराष्ट्रपती व्यंकया नायडू यांनी पटेल यांना अभिवादन करतांना, देशाच्या पोलादी चौकट असणाऱ्या सनदी सेवांचे ते निर्माते होते, असं म्हटलं आहे.  
****

 सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त देशभरात एकता दौडचं आयोजन करण्यात आलं होतं. मुंबईत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकता दौडला हिरवा झेंडा दाखवला. भारताला एकसंघ ठेवण्याचं काम सरदार पटेल यांनी केलं, म्हणूनच त्यांना लोहपुरुष म्हटले जातं. आपण 'एक भारत श्रेष्ठ भारत' हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प पुढे नेण्याचे काम करीत आहोत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.

 औरंगाबाद इथं क्रांती चौकात महापौर नंदकुमार घोडेले यांच्या उपस्थितीत सरदार पटेल आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण केल्यानंतर, उपस्थितांना एकतेची शपथ देण्यात आली.त्यानंतर महावीर चौकापर्यंत निघालेल्या एकता दौडमध्ये प्रशासकीय कर्मचाऱ्यांसह शहरवासीय मोठ्या संखेनं सहभागी झाले. दौडमधल्या विजेत्यांना बक्षीस देऊन गौरवण्यात आलं.

 स्मानाबाद इथं मुख्य प्रशासकीय इमारतीपासून पोलिस मुख्यालया दरम्यान एकता दौडचं आयोजन करण्यात आलं. उपस्थितांनी यावेळी राष्ट्रीय एकतेची शपथ घेतली. नांदेड शहरात गांधी पुतळा ते सरदार वल्लभभाई पटेल पुतळा अशी एकता दौड काढण्यात आली. महापालिका आयुक्त लहुराज माळी यावेळी प्रमुख उपस्थित होते. जालना इथं सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यापासून एकता दौडला सुरुवात झाली.
लातूर इथं जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर पोलीस दलाच्या प्रशिक्षणार्थींनी सुरक्षेसाठी योगदानाची शपथ घेत, एकता दौड मध्ये सहभाग नोंदवला. जालना इथं सरदार पटेल यांच्या पुतळ्यापासून शिवाजी चौकापर्यंत एकता दौड निघाली. परभणी इथं राजगोपालाचारी उद्यानातल्या मराठवाडा मुक्ती स्तंभापासून निघालेल्या एकता दौड मध्ये नागरिक उत्स्फुर्तपणे सहभागी झाले. विभागात सर्वच शहरांमधून एकता दौडला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
****

 पैठणच्या जायकवाडी धरणातल्या पाण्याचा अपव्यय होऊ नये याकरता स्वयंचलित पाणी सोडण्याची तसंच कालव्यांची योग्य निगा राखण्याची व्यवस्था आवश्यक असल्याचं जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी म्हटलं आहे. धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यांची अवस्था वाईट झाली असून त्यामुळे तीस ते चाळीस टक्के पाणी वाया जात आहे. कालव्यांच्या दुरुस्तीनं मोठ्या प्रमाणावर पाणी वाचवता येईल आणि शेतकऱ्यांची गरज भागवता येईल, असंही काळे यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.
****

 औरंगाबाद जिल्ह्याच्या वैजापूर तालुक्यात एका महिलेसह तिच्या बालकाचा काल नदीत बुडून मृत्यू झाला. धोंदलगाव शिवारात काल दुपारी ही घटना घडली. नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या या महिलेचा मुलगा पाण्यात पडला, त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात महिलेचाही बुडून मृत्यू झाला.
****

 हिंगोली जिल्ह्यातल्या कलगाव, लिंबी परिसरात वाघानं चार गाईंना ठार मारलं आहे. वनविभागाचे उपविभागीय अधिकारी केशव वाबळे यांनी काल ही माहिती दिली. हिंगोली जिल्ह्यात वाघ येण्याची ही पहिलीच वेळ असून वाघाचा शोध सुरू आहे.
****

 लातूर जिल्ह्यातल्या औस्याचे आमदार अभिमन्यू पवार यांनी काल अतिवृष्टीमुळे बाधित गावांना भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांनी नुकसानीची माहिती, पीक विमा भरल्याची पावती आणि सातबारा उतारा जोडून देण्याचं आवाहन केलं.
*****
***

No comments: