Saturday, 19 October 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 19.10.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date –19 October 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १९ ऑक्टोबर २०१ दुपारी .०० वा.
****

 महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीचा प्रचार आज संध्याकाळी सहा वाजता संपणार आहे. त्यामुळे सर्वच प्रमुख पक्षांचे नेते मतदारांना प्रभावित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असताना दिसत आहे. याचबरोबर सातारा आणि बिहारमधल्या समस्तीपूर या दोन लोकसभा आणि सतरा राज्यांमधील ५१ जागांसाठीचा पोटनिवडणुकीचा प्रचार देखील आज संपणार आहे. पोटनिवडणुकीच्या या ५१ विधानसभेच्या जागांमध्ये उत्तरप्रदेशच्या ११, गुजरात सहा, केरळ आणि बिहार प्रत्येकी पाच, सिक्कीम तीन, पंजाब आणि आसाम प्रत्येकी चार, तामिळनाडू, राजस्थान आणि हिमाचल प्रदेशच्या प्रत्येकी दोन तर ओडिशा, तेलंगाणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, मेघालय, पुडुचेरी आणि अरुणाचल प्रदेशच्या एका जागेचा समावेश आहे. या सर्व मतदारसंघातही सोमवारी मतदान होणार असून, मतमोजणी २४ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

 दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हरियाणातल्या  ऐलनाबाद इथं एका प्रचारसभेला संबोधित केलं, त्यानंतर ते रेवारीमध्ये प्रचारसभेला संबोधित करणार आहेत. गृहमंत्री अमित शाह आज राज्यातल्या नवापूर इथं सभा झाली. त्यानंतर ते अकोले आणि कर्जतमध्ये प्रचारसभांना संबोधित करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मुंबईतल्या प्रचारसभेत विरोधकाचे वाभाडे काढले. काँग्रेसने सात दशके अनुच्छेद ३७० कायम ठेवले आणि काश्मीरमध्ये दहशतवाद पसरत असताना स्वार्थाचे राजकारण केल्याचा आरोप केला. तर हरियाणामधल्या महेंद्रगडमध्ये प्रचारसभेला संबोधित करताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकार सतत लोकांचे मूळ मुद्द्यांवरील लक्ष विचलित करत असून माध्यमं वास्तवदर्शी चित्रण करत नसल्याचा आरोप केला आहे.  
****

 राष्ट्रवादी काँग्रस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांची मुंबईत सक्तवसुली संचालनालय ईडीने जवळपास बारा तास चौकशी केली. कुख्यात गुंड इक्बाल मिर्ची याच्यासोबतच्या कथित गैरव्यवहाराप्रकरणी ही चौकशी सुरू आहे.

दरम्यान, एअर इंडीया ही विमान कंपनी डबघाईला आणल्याप्रकरणी, तसंच पंजाब - महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळ्या प्रकरणीही पटेल यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली आहे. ते काल नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
***

 बुलढाणा विधानसभा मतदारसंघातले अपक्ष उमेदवार योगेन्द्र राजेंद्र गोडे यांच्या बॅनरवर  पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच भाजपा नेते आमदार एकनाथ खडसे यांचे फोटो विनापरवानगी लावल्याचं आढळून आल्यानं गोडे यांच्या पाच प्रकाशकांविरुद्ध बोराखेडी पोलिस स्थानकात आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****

 राज्यात कालपासून अनेक ठिकाणी पावसाला सुरुवात झाली. नांदेड जिल्ह्यातल्या  देगलूर तालुक्याच्या मरखेल महसूल मंडळात काल सायंकाळी ९० मिलीमीटर पाऊस पडल्यानं अतिवृष्टीची नोंद झाली. यामुळं सोयाबीन, कापूस, ज्वारी या पिकांच मोठं नुकसान झालं आहे. जळगाव जिल्ह्यात काल ५७ मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली असून हतनूर धरणाचे दोन दरवाजे एक मीटरनं उघडण्यात आले आहेत. धरणातून ५ हजार ४३९ क्यूसेस वेगानं नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर रायगड जिल्ह्यातही पावसाच्या सरी कोसळत असल्यानं  जिल्ह्यात शेतात सुरू असलेली भात कापणीची कामं थांबवावी लागली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याचं वृत्त आहे.
****

 बुलडाणा जिल्हयातल्या खामगाव पंचायत समितीला केंद्रीय ग्रामविकास विभागाच्या वतीनं २०१९ चा  पंडित दीनदयाल उपाध्याय पंचायत सशक्तिकरण हा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या २३ आक्टोबरला केंद्रीय ग्रामविकासमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते पंचायत समिती सभापती उर्मिला गायकी यांना नवी दिल्ली इथं हा पुरस्कार दिला जाणार आहे.
****

 रांचीमध्ये आज भारत आणि दक्षिण अफ्रिकेदरम्यानच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सुरुवातीला भारताच्या अवघ्या ३९ धावांमध्ये तीन बळी गेल्यानंतर रोहित शर्मानं फलंदाजीची आघाडी सावरली. सध्या रोहित ३८ धावांवर खेळत असून त्याला  संघाचा उपकर्णधार अजिंक्य राहाणे साथ देत असून तो अकरा धावांवार खेळत आहे. दक्षिण अफ्रिकेकडून गोलंदाजी करताना जलदगती गोलंदाज कागीसो रबाडा यानं पंधरा धावांमध्ये दोन बळी टिपले.
****

 दहशतवादाचा समूळ नाश करण्यासाठी भारत आणि फिलीपाईन्स प्रतिबद्ध असल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि फिलीपाईन्सचे अध्यक्ष रॉड्रीगो डुटर्ट यांनी जारी केलेल्या संयुक्त पत्रकात म्हटलं आहे. दोन्ही देशांनी संक्षरण आणि सागरी सुरक्षेमध्ये सहकार्य अधिक बळकट करण्यावर भर दिला असल्याचं राष्ट्रपती कोविंद यांनी म्हटलं आहे.
*****
***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 13.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 13 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...