Sunday, 20 October 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 20.10.2019 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 20 October 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २० ऑक्टोबर २०१ सायंकाळी ६.००
****

          पाकिस्तानी सैन्याकडून वारंवार संघर्ष विरामाचं उल्लंघन होत असल्यामुळं प्रत्युतरादाखल भारतीय सैन्यानं आज पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी तळ असलेल्या ठिकाणी कारवाई केली. जिथून भारतात दहशतवाद्यांना घुसण्यासाठी मदत केली जात होती, अशा पाकिस्तानच्या चौक्यांनाही भारतीय लष्करानं लक्ष्य बनवलं. यावेळी भारतीय सैन्यानं तोफांचाही वापर केला. यावेळी झालेल्या कारवाईत दहशतवाद्यांचे अनेक तळ उद्ध्वस्त झाले आणि काही जण मारले गेल्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. पाकिस्तानकडून विनाकारण केल्या जाणाऱ्या गोळीबाराला भारतानं हे उत्तर दिलं आहे.

          पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात दोन भारतीय जवान आणि एक नागरिक शहीद झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****

 राज्यातल्या सर्व, म्हणजेच २८८ विधानसभा मतदारसंघांमधल्या शहाण्णव हजार सहाशे एकसष्ट मतदान केंद्रांवर उद्या मतदान शांततेत आणि सुरळीत पार पाडावं, यासाठी निवडणूक आयोग आणि प्रशासन सज्ज असून, मतदान प्रकियेची तयारी पूर्ण झाली आहे. उद्या सकाळी सात वाजता मतदानाला सुरूवात होणार असून, ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत चालणार आहे.

 सर्वच ठिकाणी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली असून, काल ठिकठिकाणी जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी आढावा बैठका घेतल्या. राज्यातल्या अनेक संवेदनशील मतदान केंद्रांवर थेट प्रक्षेपणासाठी वेब कास्टिंग आणि सी.सी.टी.व्ही. कॅमेऱ्यांची व्यवस्था उभारण्यात आली आहे. इंटरनेटची सुविधा उपलब्ध नसलेल्या मतदान केंद्रांवर पोलीस वायरलेस सेट उपलब्ध करून दिले आहेत. जिथे तात्पुरत्या स्वरूपातल्या मंडपांमध्ये मतदान होणार आहे, अशा ठिकाणी अग्निसुरक्षेची व्यवस्थाही केली आहे.

 जवळपास प्रत्येक विधानसभा मतदारसंघांमधली काही मतदान केंद्रं सखी मतदान केंद्रं असणार आहेत. या केंद्रांवरची संपूर्ण व्यवस्था महिला अधिकारी सांभाळणार आहेत.

 इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र किंवा व्ही.व्ही. पॅट यंत्रामध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या, तर त्यासाठी अभियंत्यांची नियुक्तीही करण्यात आली आहे.

 मतदारांना त्यांच्या मतदान केंद्राची माहिती देण्यासाठी मतदार चिठ्ठीचं वितरण करण्यात आलं आहे. ठिकठिकाणी दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, तसंच आजारी असलेल्या मतदारांसाठी व्हीलचेअर, तसंच रुग्णवाहिकांसह इतर वाहनांचीही विशेष व्यवस्था केली आहे. ठिकठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी प्रशासकीय सज्जतेची माहिती आज पत्रकार परिषदेमधे दिली.

 दरम्यान, राज्यात एकूण ३ हजार २३७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून, त्यात २३५ महिलांचा समावेश आहे. या सर्वांच भवितवय उद्या मतपेटीत बंद होणार असून, मतमोजणी २४ तारखेला होणार आहे.
****

 उद्या होत असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या मतदानासाठी अकोला जिल्ह्यातले रिक्षाचालक दिव्यांगांना मतदानासाठी मतदान केंद्रापर्यंत मोफत रिक्षा सेवा पुरवणार आहेत. जिल्ह्यातल्या जवळपास १०० रिक्षा चालकांनी त्यांच्या वाहनावर, आमचा एक दिवस दिव्यांगांसोबत असं लिहून त्यांचा दूरध्वनी क्रमांक लिहिला आहे. दिव्यांगांनी या क्रमांकांवर फोन करून या सेवेचा लाभ घेण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.
****

 महान भारत केसरी कुस्तीपटू, रुस्तम-ए-हिंद दादू चौगुले यांचं आज दुपारी कोल्हापूर इथं एका खाजगी रूग्णालयात निधन झालं. तीन दिवसांपूर्वी त्यांना धाप लागल्यानं उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. न्यूझीलंड ऑकलंड इथं झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत त्यांनी रौप्यपदक पटकावलं होते.
****

 राष्ट्रीय विकासात विधी विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांची महत्त्वाची भूमिका असून, विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांनी उच्च प्रतीचं शिक्षण घेऊन उत्तम न्यायाधीश, वकील, शिक्षक बनून सामाजिक सेवेस प्राधान्य द्यावं, असं आवाहन बंगळुरूच्या कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी केलं. औरंगाबाद इथं महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या ‘राष्ट्रीय विधी विद्यापीठासाठी न्यायपालिकेचे योगदान’ या विषयावर ते आज बोलत होते. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती आर. एम. बोर्डे यांचा सेवागौरव समारंभही झाला. औरंगाबाद इथल्या महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ निर्मितीत न्या. बोर्डे यांचं मोलाचं योगदान आहे, असं सांगून ओक यांनी बोर्डे यांच्या कार्याचा गौरव केला.

 सत्काराला उत्तर देताना न्या. बोर्डे यांनी, राष्ट्रीय विधी विद्यापीठ स्थापन करताना सर्वांचंच सहकार्य लाभलं, त्यामुळेच मोठी जबाबदारी पार पाडता आली, असं मत व्यक्त केलं.
****

 मध्य रेल्वेनं हाती घेतलेल्या कामामुळं नांदेडहून पनवेलकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे २६ तारखेची नांदेड ते पनवेल आणि २७ तारखेची पनवेल ते नांदेड ही विशेष गाडी रद्द करण्यात आली आहे.
****

 राज्यातल्या मतदानाविषयी आकाशवाणी मुंबई प्रादेशिक वृत्त विभागातर्फे एक चर्चात्मक कार्यक्रम उद्या संध्याकाळी सव्वा सात ते आठ या वेळेत प्रसारित करण्यात येणार आहे. राज्यातल्या सर्व प्रादेशिक वृत्त विभागांचे प्रतिनिधी, तसंच आकाशवाणीचे अंशकालीन वार्ताहर या कार्यक्रमात सहभागी होतील.
*****
***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 06.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 06 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...