Regional Marathi
Text Bulletin, Aurangabad
Date – 01 November 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०१
नोव्हेंबर २०१९ दुपारी १.०० वा.
****
अवकाळी किंवा अतिवृष्टीमुळे
बाधित सर्व शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळेल, असं राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत
यांनी म्हटलं आहे. ते काल नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते. आतापर्यंत ६५ मिलिमीटर इतका पाऊस झालेल्या ठिकाणीच
पंचनामे केले जात होते. मात्र, त्यात अवकाळी किंवा अतिवृष्टीचा समावेश नसल्यामुळे शेतकऱ्यांना
भरपाई मिळत नव्हती. आता आर्थिक मदत देण्याच्या नियमांमध्ये अवकाळी पावसाचा समावेश झाल्यामुळे
नुकसानभरपाई मिळण्यास शेतकरी पात्र ठरतील, असं खोत यांनी स्पष्ट केलं. नुकसानग्रस्त
पिकांची पाहणी करण्यासाठी राज्यमंत्री खोत यांनी काल नाशिकचा दौरा केला. आज ते बागलाण
तालुक्यात पाहणी करणार आहेत.
दरम्यान, नाशिक जिल्ह्यातल्या पावसामुळे पिकांच्या
झालेल्या नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि माजी
केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार हे देखील आज नाशिकचा दौरा करत आहेत. इगतपुरी, कळवण तसंच
बागलाण तालुक्यातल्या नुकसानग्रस्त भागाची पवार पाहणी करणार आहेत.
****
नांदेड जिल्ह्यात पावसामुळं झालेल्या पिकांच्या नुकसानीची
पाहणी करून पंचनामे करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. या भागातील पिकांची पाहणी
करून पंचनामे करण्यात यावेत तसंच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आणि पीक विमा देण्यात यावा
अशी मागणी जिल्ह्यातल्या सर्वच लोकप्रतिनिधीनी केली होती. कालपासून शासनाचे प्रतिनिधी
तलाठी आणि कृषी विभागाचे अधिकारी यांनी पंचनाम्यांना सुरुवात केली आहे. ज्या शेतकऱ्यांनी
पिक विमा घेतला आहे त्यांचे आणि ज्यांनी पिक विमा काढला नाही त्याचेही असे दोन्ही प्रकारचे
पंचमाने यात करण्यात येत आहेत.
****
राज्यात अवकाळी पावसामुळे
झालेल्या पीकनुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक पाठवलं जाईल, असं आश्वासन केंद्रीय
गृहमंत्री अमित शाह यांनी दिलं आहे. राजभवनानं एका निवेदनाद्वारे याची माहिती दिली
आहे.
****
भाजप आणि शिवसेनेदरम्यान
राज्यात सत्ता स्थापनेसंदर्भात अद्याप कोणतीही चर्चा झाली नसून शिवसेनेचा मुख्यमंत्री
होईल, असं शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत
होते. शिवसेनेनं ठरवलं तर पक्षाला राज्यात स्थीर सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक संख्याबळ
प्राप्त करता येईल, असं राऊत यावेळी म्हणाले. भाजपला सत्ता स्थापनेसंदर्भात शिवसेनेनं
कोणताही अंतिम इशारा दिलेला नसल्याची माहितीही खासदार राऊत यांनी यावेळी दिली.
****
बहुजन विकास आघाडीसह
दोन अपक्ष आमदारांनी काल भाजपला पाठिंबा दिला. हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखालच्या
बहुजन विकास आघाडीकडे तीन आमदार आहेत. सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा विधानसभा मतदारसंघातून
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडून आलेले अपक्ष आमदार संजय शिंदे आणि कोल्हापूर
जिल्ह्यातले इचलकरंजीचे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला.
आवाडे यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना पाठिंब्याचं पत्र
दिलं. याबरोबरच भाजपला पाठिंबा देणाऱ्या आमदारांची संख्या पंधरा झाली आहे तर शिवसेनेला
पाठिंबा देणाऱ्या आमदारांची संख्या सात झाली आहे.
****
नागरिकांचे मूलभूत अधिकार जपण्यासाठी सरकार कटीबद्ध
असल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. नागरिकांच्या गोपनीयतेचा भंग करणाऱ्या कोणत्याही
मध्यस्थाविरोधात सरकार कठोर कारवाई करेल, असं केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञानमंत्री
रवी शंकर यांनी एका संदेशात म्हटलं आहे. व्हाटसअॅपवर गोपनीयतेचा भंग होत असल्याच्या
प्रकरणांवर सरकार चिंतीत असून हे रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना आखल्या आहेत, असं सरकारनं
व्हाट्सअॅपला विचारलं आहे. या संदर्भात सोमवारपर्यंत उत्तर द्यायला सांगीतलं असल्याचंही
मंत्र्यांनी यासंदर्भात नमुद केलं.
****
बुडापेस्ट इथं सुरु असलेल्या तेवीस वर्षांखालील जागतिक
कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत त्रेपन्न किलो वजनी गटात भारताच्या पूजा गेहलोतनं अंतिम
फेरीत प्रवेश केला आहे. पुजानं २०१८ च्या कनिष्ठ युरोपियन स्पर्धेची सुवर्ण पदक विजेती, तुर्कीच्या झेनेप येतगीलला आठ-चार असं हरवलं. अंतिम
फेरीत पुजाचा सामना जपानच्या हारुनो ओकुनो बरोबर होणार आहे.
****
टोकियो इथं सुरु असलेल्या ऑलिंपिक चाचणी स्पर्धेत
काल, भारताचे मुष्टीयोद्धे शिव थापा आणि पूजा राणी यांनी सुवर्णपदक तर, आशिष यानं रौप्य
पदक पटकावलं आहे. शिव थापानं त्रेसष्ट किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात कझागिस्तानच्या
सनाताली टॉल्टायेव्ह याला पाच- शून्य असं सहज पराभूत केलं. तर महिलांच्या पंच्याहत्तर
किलो वजनी गटात पूजा राणीनं ऑस्ट्रेलियाच्या कॅटलिन पार्करवर विजय मिळवून सुवर्णपदक
जिंकलं.
*****
***
No comments:
Post a Comment