Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 02 November 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक -०२ नोव्हेंबर २०१९ सकाळी ७.१० मि.
****
Ø
शेतीच्या नुकसानासंदर्भात
विमा कंपन्यांनी सरकारी पंचनामे ग्राह्य धरावेत - मुख्यमंत्र्यांची सूचना
Ø
अवकाळी पावसामुळे मराठवाड्याच्या ७२ तालुक्यात २२ लाख हेक्टरवरच्या पिकाचं नुकसान
Ø
शिवसेनेनं
ठरवलं तर स्थिर सरकारसाठी आवश्यक संख्याबळ शक्य - खासदार संजय राऊत
आणि
Ø
औरंगाबाद इथं बनावट नोटा छापून चलनात आणणारी टोळी
जेरबंद
****
अवकाळी पावसामुळे राज्यात
झालेल्या शेतीच्या नुकसानीसंदर्भात विमा कंपन्यांनी सरकारी पंचनामे ग्राह्य धरावेत,
अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. काल मुंबईत काल दूरदृष्यसंवाद
प्रणालीच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी राज्यभरातल्या नुकसानाचा आढावा घेतला, त्यानंतर
वार्ताहर परिषदेत बोलताना, मुख्यमंत्र्यांनी, विमा कंपन्यांनी त्यांच्याकडे असलेलं
अपुरं मनुष्यबळ लक्षात घेता, सरकारी पंचनामेच ग्राह्य धरावेत, असं सांगितलं. शेतकऱ्यांनी
मोबाईलवर नुकसानाचं छायाचित्र काढून संबंधित विभागाकडे पाठवलं, तरी ते ग्राह्य धरलं
जाईल, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. सचिव, जिल्हाधिकारी यासह सर्व वरिष्ठ
अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेवर काम करणाऱ्यांबरोबर संवाद साधावा, आणि नुकसानीचे तातडीनं
पंचनामे करावेत, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं
मदत करण्याबरोबरच अतिरिक्त मदत कशी करता येईल, याबाबत सरकार विचार करत आहे. मंत्रिमंडळाच्या
उपसमितीची या अनुषंगानं आजच बैठक घेतली जाणार असून केंद्र सरकारकडे मदतीची मागणी करणार
असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
कृषी
राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी काल नाशिक जिल्ह्यातल्या सटाणा तालुक्यात नुकसानग्रस्त
पिकांची पाहणी केली. या पावसामुळे द्राक्ष, मका आणि कांद्यासह अन्य पिकांचं नुकसान
झालं असून शेतकऱ्यांना मदतीची ग्वाही खोत यांनी दिली.
****
राष्ट्रवादी कॉंग्रेस
पक्षाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरद पवार यांनी काल नाशिक जिल्ह्यात
अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या विविध भागांची पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी
बोलताना पवार यांनी, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची शेतकऱ्याला किती भरपाई मिळेल
याची माहितीच सरकारी यंत्रणेकडे नाही, याकडे लक्ष वेधलं. राज्य सरकारला नुकसानीची आकडेवारी
सादर करुन मदतीची मागणी करू, असं त्यांनी यावेळी नमूद केलं. सरकारनं यावर सहानुभूतीनं
निर्णय घ्यावा, मात्र अपेक्षित निर्णय न घेतल्यास पुढं काय करायचे ते आपण ठरवू, असा
इशाराही शरद पवार यांनी यावेळी दिला.
****
या अवकाळी पावसामुळे मराठवाड्यातल्या ७२ तालुक्यातल्या
२२ लाख हेक्टरवरच्या पिकाचं नुकसान झालं असून राज्यात
५३ हजार हेक्टरवरची फळपिकं, एक लाख ४४ हजार हेक्टरवरचं भात पीक,
प्रत्येकी दोन लाख हेक्टरवरची ज्वारी तसंच बाजरी,
पाच लाख हेक्टरवरचा मका, तर प्रत्येकी १९ लाख
हेक्टरवरच्या सोयाबीन आणि कपाशीचं नुकसान झालं आहे.
जालना जिल्ह्यात सुमारे चार लाख तेहतीस हजार हेक्टरवरच्या
खरीप पिकांचं नुकसान झालं आहे. तेहतीस टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या सोयाबीन,
मका, बाजरी आणि कापसाचे पंचनामे महसूल आणि कृषी विभागानं सुरू केले आहेत. पालकमंत्री
बबनराव लोणीकर, जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे, जिल्हा कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे
यांनी काल बदनापूर तालुक्यातल्या भराडखेडा इथं नुकसानग्रस्त भागाची पहाणी केली. अवकाळी
पावसामुळे जालना जिल्ह्यात खरीप पिकाचं ३२६ कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक
अंदाज असल्याचं कृषी अधिकारी शिंदे यांनी सांगितलं.
****
परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान झालेल्या
एक लाख ३८ हजार १०७ शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे अर्ज केले असून आजपासून पंचनामे करण्यात
येणार आहेत. जिल्हाधिकारी पी.शिवशंकर यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यासाठी
तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांना प्रत्येकी एक गाव देण्यात आलं आहे. या पावसामुळे
जिल्ह्यात तीन लाख २९ हजार हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालं असून यापैकी एक लाख ५२
हजार हेक्टरवर सोयाबीन तर एक लाख ६८ हजार हेक्टरवरच्या कपाशीचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर
कृषी तसंच महसूल विभागातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्याचंही
जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं
****
लातूर जिल्ह्याच्या औसा मतदारसंघातल्या अनेक शेतकऱ्यांचे
मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून प्रशासनानं या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावेत,
अशा सूचना आमदार अभिमन्यू पवार यांनी दिल्या आहेत. ते काल औसा इथं तातडीच्या आढावा
बैठकीत बोलत होते. या पावसामुळे काढून ठेवलेले सोयबीन, नुकतीच पेरणी केलेली ज्वारी
आणिा हरभरा, ऊस यासह फळबागांचंही नुकसान झालं आहे. आमदार पवार यांनी शिवारात जाऊन या
नुकसानीची पाहणी केली.
****
हिंगोली जिल्ह्याच्या सेनगाव तालुक्यातल्या एका शेतकऱ्यानं
कापणी केलेलं सोयाबीन जाळून टाकलं. कापणी केलेलं सोयाबीन पावसात भिजल्यावर प्रशासनानं
पंचनामे न केल्यानं हे सोयाबीन जाळल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. हिंगोली जिल्ह्यात
झालेल्या नुकसानाचा आढावा घेत आहेत आमचे वार्ताहर .....
कळमनुरी तालुक्यातील खरीप ज्वारी व कापसाचे
१०० टक्के नुकसान झाले आहे. तर सोयाबीन बियाचे ८४.३१ टक्के नुकसान झाले आहे. यासंबंधीचा
प्राथमिक अहवाल कळमनुरीचे तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे यांनी जिल्ह्याधीकाऱ्यांकडे
पाठविलेला आहे. कळमनुरी तालुक्यामध्ये सोयाबीन ४९ हजार ८१४ हेक्कटरवर पेरण्यात आले
होते, त्यापैकी ४२ हजार हेक्कटर वरचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. खरीज ज्वारी १३२२
हेक्कटरवर तर कापूस ९ हजार ७७५ हेक्कटरवर पेरण्यात आला होता.या दोन्हीही पिकांचे १००
टक्के नुकसान झाले आहे. - रमेश कदम.
****
बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना
प्रधानमंत्री पीक विमा योजना आणि राज्य शासनाच्या अतिवृष्टी साठी मिळणाऱ्या भरपाईचा
लाभ देखील मिळू शकेल, यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करू नये, असं आवाहन बीडचे जिल्हाधिकारी
आस्तिक कुमार पांडेय यांनी केलं आहे. ७२ तासात पीक विम्याचे दावे दाखल न करू शकलेल्या
शेतकऱ्यांनाही दिलासा मिळणार असल्याचं पांडेय यांनी सांगितलं.
****
औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री
एकनाथ शिंदे आज दोन दिवसांच्या औरंगाबाद दौऱ्यावर येत आहेत. आज सकाळी ते दहा
वाजता औरंगाबाद विमानतळावर पोहोचतील. आज दिवसभरात ते गंगापूर, खुलताबाद, कन्नड, सिल्लोड,
फुलंब्री आणि औरंगाबाद तालुक्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करतील.
तर उद्या कन्नड, वैजापूर, तालुक्यातल्या पाहणीनंतर दुपारी ते विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांसोबत
ते आढावा बैठक घेणार आहेत.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून
प्रसारित केलं जात आहे.
****
शिवसेनेनं ठरवलं तर पक्षाला राज्यात स्थिर सरकार
स्थापन करण्यासाठी आवश्यक संख्याबळ प्राप्त करता येईल, असं शिवसेनेचे नेते संजय राऊत
यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. भाजप आणि शिवसेनेदरम्यान राज्यात
सत्ता स्थापनेसंदर्भात अद्याप कोणतीही चर्चा झाली नसून शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल,
असं स्पष्ट करतानाच, भाजपला सत्ता स्थापनेसंदर्भात शिवसेनेनं कोणताही अंतिम इशारा दिलेला
नाही, असा खुलासाही राऊत यांनी केला.
****
भाजप शिवसेनेत सध्या सुरू असलेल्या घडामोडी म्हणजे
पोरखेळ असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी
केली आहे. ते काल नाशिक इथं वार्ताहरांशी बोलत होते.
जनतेने आपल्याला विरोधी बाकांवर बसण्याचा कौल दिला
आहे, तो मान्य करून आपला पक्ष विरोधी बाकांवरच बसेल, असं पवार यांनी स्पष्ट केलं.
काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी या घडामोडींसंदर्भात
बोलताना, भाजपकडून शिवसेनेची फसवणूक होत असल्याचं म्हटलं आहे. निवडणुकीपूर्वी ठरलेल्या
समीकरणावर भाजप ठाम नसल्याचं, चव्हाण यांनी म्हटल्याचं पीटीआयचं वृत्त आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी राज्यात
निर्माण होत असलेल्या राजकीय अस्थिरतेला भाजप जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. काँग्रेसची
भूमिका मात्र प्रतीक्षेची असल्याचं त्यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे
****
दरम्यान, राज्यात निर्धारित वेळेत सरकार स्थापन झालं
नाही, तर राष्ट्रपती राजवट लागू होईल, असं भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी
म्हटलं आहे. भाजप शिवसेनेची सत्तावाटपाबाबतची बोलणी दिवाळीमुळे लांबली असून, एक दोन
दिवसांत बोलणी सुरू होतील, असं मुनगंटीवार म्हणाले. येत्या आठ नोव्हेंबरला विद्यमान
सरकारचा कार्यकाळ पूर्ण होत असून, सात तारखेच्या आत नवीन सरकार स्थापन होणं आवश्यक
आहे.
****
औरंगाबाद इथं बनावट नोटा छापून चलनात आणणाऱ्या एका
टोळीला पोलिसांनी जेरबंद केलं आहे. परवा रात्री केलेल्या या कारवाईत पोलिसांनी तीन
युवकांना अटक करून, नोटा छपाईचं साहित्य आणि शंभर रुपये दर्शनी मूल्याच्या एक हजार
पन्नास नोटा जप्त केल्या. शेख समरान, सय्यद सैफ आणि सय्यद सलीम अशी या तिघांची नावं
असून, हे तिघे सहा महिन्यांपासून राहत्या घरीच नोटा छापून चलनात आणत असल्याची माहिती
समोर आली आहे. या तिघांच्या इतर साथीदारांचा शोध पोलिस घेत आहेत.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात
ऑक्टोबर अखेर पर्यंत वार्षिक सरासरीच्या ९३ % म्हणजे ७२१ मिलीमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यात
तुळजापूर कळंब वाशी उमरगा आणि लोहारा तालुक्यात अवकाळी पावसामुळे खरिप पिकांचे नुकसान
झाले आहे. परंतु सप्टेंबर अखेरपर्यंत परंडा तालुक्यात अपेक्षित पाऊस झाला नसल्यामुळे
शासनाने परंडा तालुक्यात खरीप हंगामात दुष्काळ जाहीर केला आहे. जिल्ह्यातील २२३ सिंचन
प्रकल्पात ३२ % म्हणजे २२३ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात पिण्याच्या
पाण्यासाठी सुरु असलेले टॅंकर बंद झाले आहेत.
*****
***
***
No comments:
Post a Comment