Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 20 November
2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक - २०नोव्हेंबर २०१९ सकाळी ७.१० मि.
****
** औरंगाबाद आणि परभणी जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद महिलांसाठी, जालना आणि उस्मानाबाद अनुसूचित जाती, हिंगोली आणि नांदेड अनुसूचित जमातींसाठी तर लातूर आणि बीड इतर मागास प्रवर्गासाठी राखीव
** मराठा
आरक्षणाच्या याचिकांवर २२ जानेवारीला सुनावणी
** दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठ, जम्मू काश्मीर आणि गांधी कुटुंबियांच्या सुरक्षा कपातीच्या मुद्यावरून संसदेत गदारोळ
** राज्यात
सत्ता स्थापनेसंदर्भात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची आज नवी दिल्लीत
बैठक
आणि
** राज्यात
शिवसेने शिवाय सत्ता स्थापन करता येणार नाही - दिवाकर रावते
****
राज्यातल्या जिल्हा परिषद अध्यक्षपदांसाठीच्या आरक्षणाची सोडत
काल मुंबईत काढण्यात आली. औरंगाबाद आणि परभणी जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद खुल्या प्रवर्गातल्या
महिलांसाठी राखीव झालं आहे. जालना जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी, उस्मानाबाद
अनुसूचित जाती महिला, हिंगोली अनुसूचित जमाती, नांदेड अनुसूचित जमाती महिला, लातूर
इतर मागास प्रवर्ग, बीड इतर मागास प्रवर्ग महिलांसाठी राखीव झालं आहे. सोलापूर जिल्हा
परिषदेचं अध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी, नागपूर अनुसूचित जाती महिला, नंदुरबार अनुसूचित
जमाती, पालघर, रायगड अनुसूचित जमाती महिला, कोल्हापूर, वाशीम, अमरावती इतर मागास प्रवर्गासाठी;
ठाणे, सिंधुदूर्ग, सांगली, तसंच वर्धा जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद इतर मागासवर्गातल्या
महिलांसाठी, रत्नागिरी, नाशिक, धुळे, गडचिरोली, गोंदिया, सातारा, अकोला, भंडारा खुल्या
प्रवर्गासाठी तर बुलडाणा, यवतमाळ, जळगाव, अहमदनगर, पुणे आणि चंद्रपूर जिल्हा परिषदेचं
अध्यक्षपद खुल्या वर्गातल्या महिलांसाठी राखीव झालं आहे.
****
मराठा आरक्षणाच्या याचिकांवर आता २२ जानेवारीला सुनावणी होणार
आहे. आरक्षणासंदर्भात न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिकांवर काल सरन्यायाधीश
शरद बोबडे, न्यायमूर्ती संजीव सिन्हा आणि न्यायमूर्ती सुर्यकांत यांच्यासमोर एकत्रित
सुनावणी झाली. या याचिकांमधल्या त्रुटी आणि आक्षेप २२ जानेवारीपर्यंत दूर करण्याचे
आदेश न्यायालयानं याचिकाकर्ते आणि निबंधकांना दिले आहेत. वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश
प्रक्रियेतलं मराठा आरक्षणही न्यायालयानं वैध ठरवलं आहे.
****
दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठातल्या आंदोलक विद्यार्थ्यांवर
पोलिसांनी केलेली कारवाई, जम्मू काश्मीरमधल्या नेत्यांवरची कथित कारवाई आणि गांधी कुटुंबियांच्या
सुरक्षेत केलेली कपात, या मुद्यांचे पडसाद काल संसदेच्या दोन्ही सदनात उमटले. राज्यसभेत
कामकाज सुरू झाल्यानंतर नोबेल
पारितोषिक विजेते अभिजीत बॅनर्जी यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव एकमुखानं मंजूर करण्यात आला. मात्र त्यानंतर
डाव्या पक्षाच्या खासदारांनी, जेएनयूच्या मुद्यावरून घोषणाबाजी सुरू केली. विरोधी पक्षाच्या
खासदारांनी काश्मीरच्या मुद्यावरून घोषणाबाजी सुरू केली. या गदारोळामुळे सभापती व्यंकय्या
नायडू यांनी सदनाचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित केलं.
लोकसभेचं कामकाज सुरू होताच, शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याच्या
मुद्यावर चर्चेला प्रारंभ झाला, मात्र काँग्रेससह द्रमुक आणि डाव्या पक्षांच्या खासदारांनी
अध्यक्षांच्या आसनासमोरच्या हौद्यात उतरून घोषणाबाजी सुरू केली. अध्यक्ष ओम बिर्ला
यांनी या गदारोळातच प्रश्नोत्तराचा तास सुरू ठेवला. घोषणाबाजी करणाऱ्या सदस्यांवर कारवाईचा
इशारा अध्यक्षांनी दिला. काँग्रेसचे नेते अधीररंजन चौधरी यांनी गांधी कुटुंबियांच्या
सुरक्षेत कपातीचा मुद्दा उपस्थित केला. याच मुद्यावर स्थगन प्रस्तावही देण्यात आला
होता, मात्र अध्यक्षांनी त्यांना हा मुद्दा सदनासमोर मांडण्याची परवानगी दिली नाही.
त्या निषेधार्थ विरोधी सदस्यांनी सभात्याग केला.
त्यानंतर सुरू झालेल्या शून्य प्रहरात, नांदेडचे खासदार प्रतापराव
चिखलीकर यांनी नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचं झालेल्या नुकसानीपोटी विशेष
पॅकेज जाहीर करण्यात यावं, अशी मागणी केली.
लातूर जिल्ह्यातल्या नुकसानग्रस्त पिकांचं सर्वेक्षण करुन शेतकऱ्यांना
तात्काळ मदत जाहीर करा अशी मागणी लातूरचे खासदार
सुधाकर श्रृंगारे यांनी केली. जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी उपाययोजना
करणं आवश्यक असून, यासाठी जलशक्ती मंत्रालयाअंतर्गत हर घर जल, हर घर नल ही योजना राबवून
प्रत्येक घरात पाणी देण्याचा प्रयत्न करावा, असंही ते म्हणाले.
****
राज्यात सत्ता
स्थापनेसंदर्भात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये काल दिल्लीतली
नियोजित बैठक पुढे होऊ शकली नाही. आज सायंकाळी पाच वाजता ही बैठक होणार आहे. माजी पंतप्रधान
इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्तच्या विविध कार्यक्रमांमध्ये काँग्रेसचे नेते सहभागी
झाल्यानं कालची ही बैठक रद्द झाल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी
सांगितलं.
दरम्यान, राज्यात सत्ता स्थापनेबाबत काँग्रेस
आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं सावध पवित्रा घेतल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख
उद्धव ठाकरे यांनीही २२ नोव्हेंबरला पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक बोलावली
आहे. ठाकरे या बैठकीला मार्गदर्शन करून पक्षाची पुढील भूमिका निश्चित करतील, असं पीटीआयच्या
वृत्तात म्हटलं आहे.
****
राज्यात ऑक्टोबर - नोव्हेंबर मध्ये अवकाळी पावसानं
नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत
देण्यासाठीचा शासन आदेश काल जारी करण्यात आला. यानुसार खरीप पिकांसाठी प्रती
हेक्टर आठ हजार रुपये, तर फळबागा, बारमाही पिकांसाठी प्रती हेक्टरी १८ हजार रुपयांची मदत वाटप केली जाणार
आहे. राज्यातल्या ३४ जिल्ह्यांच्या ३२५ तालुक्यातल्या शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित
केलं जात आहे.
****
राज्यात शिवसेने शिवाय सत्ता स्थापन करता येणार नाही
असं शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी म्हटलं आहे. अवकाळी पावसानं औरंगाबाद जिल्ह्यात
पिकांच्या झालेल्या नुकसानीची रावते यांनी काल पाहणी केली तसंच शेतकऱ्यांशी संवाद साधला.
त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. ते म्हणाले.
शिवसेने शिवाय सत्ताच बसू शकत नाही या महाराष्ट्रातील
परिस्थिती शंभर टक्के आहे शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवलं शिवाय या महाराष्ट्रात कोणालाही
सत्तेत सामील होता येत नाही त्यामुळे शिवसेनेचा जो शेतक–यांसदंर्भात कार्यक्रम आहे
पुढे नेण्याचा आमचा निर्धार आहे.
जिल्ह्यात शिवसेनच्या वतीनं विविध गावात सुरू करण्यात
आलेल्या शेतकरी मदत केंद्राला रावते यांनी भेट दिली. पिकांचं नुकसान झालं असलं तरी
जनावरांसाठी आणि पिण्यासाठी मुबलक प्रमाणात
पाणी उपलब्ध झाल्यानं शेतकरी आनंदीत असल्याचंही रावते यांनी यावेळी सांगितलं.
****
उस्मानाबाद शहरात काल दुपारी
एक वाजून चाळीस मिनिटानी भूगर्भातून मोठा आवाज झाला. लोहारा आणि तुळजापूर तालुक्यातल्या
नळदुर्ग आणि जळकोट परिसरातही असा आवाज झाला. हा भूकंप नसून, भूगर्भातल्या हालचालींमुळे
हा आवाज येत असल्याची माहिती लातूर इथल्या भूकंपमापन केंद्रानं दिल्याचं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
****
प्रधानमंत्री मातृवंदन योजनेअंतर्गत
हिंगोली जिल्ह्यात पाच कोटी १८ लाख १० हजाराचं अनुदान वाटप करण्यात आलं असून चौदा हजार
पन्नास मातांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर
सदर योजनेसाठी जिल्ह्यातील चौदा हजार पन्नास मातांना
तीन टक्के अनुदान वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्याला दिलेल्या उद्दिष्ट पैकी 77 टक्के
उद्दिष्ट हिंगोली जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने पूर्ण केले आहे. जिल्ह्यातील वसमत
तालुक्यात सर्वाधिक 3277 लाभार्थी आहेत तर औंढा तालुक्यात सर्वात कमी 2125 लाभार्थ्यांनी
हा लाभ घेतला आहे बाळाला प्रथम जन्म देणाऱ्या मातांना अनुदान मिळत असून या योजनेमुळे
गरीब कुटुंबातील महिलांना आर्थिक आधार मिळत आहे.
****
परभणी जिल्ह्यात काल जागतिक
शौचालय दिन विविध उपक्रमांनी साजरा झाला. नागरिकांमध्ये स्वच्छतेची संस्कृती रुजवण्याच्या
हेतुनं हा दिवस पाळण्यात येतो. महापौर मिना वरपूडकर यांच्या हस्ते जंतूनाशक औषधी आणि
स्वच्छ सर्वेक्षणच्या स्टीकरचं वाटप करण्यात आलं. जिल्ह्यात
शालेय विद्यार्थ्यांच्या मदतीनं स्वच्छता फेरी, गाव बैठका, शौचालय बांधकामाचा शुभारंभ,
आशाताई, अंगणवाडीताई, सरपंच आणि ग्रामसेवकांशी संवाद बैठका असे विविध उपक्रम राबवण्यात
आले.
****
केंद्र सरकारच्या आयुष्यमान
भारत या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी उस्मानाबाद जिल्ह्यातली एक लाख बत्तीस हजार चौऱ्यांशी
कुटुंबं पात्र ठरली आहेत. त्यात शहरी भागातली एकोणीस हजार तर ग्रामीण भागातली एक लाख
बारा हजार कुटुंबं आहेत. जिल्ह्यात सुमारे एकवीस कोटी रुपयांच्या शस्त्रक्रिया आणि
आरोग्यसेवा या योजनेतून देण्यात आल्या असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
औरंगाबादचे विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी काल हिंगोली
जिल्ह्याच्या सेनगाव तालुक्यातल्या केंद्रा बुद्रुक या गावाला भेट देऊन शेतकऱ्यांशी
संवाद साधला. हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीनं
बाधित झालेल्या पिकांचे पंचनामे पूर्ण झाले असून, राज्यपालांच्या सूचनेनुसार तातडीनं
शेतकऱ्यांना मदत देणं सुरू झालं असल्याची माहिती केंद्रेकर यांनी यावेळी दिली. परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यातल्या येलदरी जलाशयाची
पाहणीही केंद्रेकर यांनी काल केली. यावेळी त्यांनी धरणाच्या सुरक्षिततेबाबत माहिती
जाणून घेतली आणि कर्मचाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या.
****
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
मराठवाडा विद्यापीठाचा केंद्रीय युवक महोत्सव उद्यापासून सुरू होणार आहे. कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांनी काल औरंगाबाद
इथं वार्ताहरांशी बोलतांना ही माहिती दिली. यात सुमारे दोनशे महाविद्यालय सहभागी होणार असल्याचं
त्यांनी सांगितलं.
****
No comments:
Post a Comment