Wednesday, 20 November 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 20.11.2019 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 20 November 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २० नोव्हेंबर २०१९ सायंकाळी ६.००
****

 अवकाळी पावसामुळे राज्यभरात झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचं पथक परवा २२ नोव्हेंबरपासून तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहे. पाच सदस्यांचं हे पथक राज्याच्या विविध भागात पाहणी करून, शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून नुकसानाचा आढावा घेणार असल्याचं, राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सूत्रांनी सांगितल्याचं, पीटीआयच्या बातमीत म्हटलं आहे. राज्यभरात सुमारे एक कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांचं चौऱ्याण्णव लाखावर हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालं असून, औरंगाबाद विभागात सोयाबीन आणि कपाशीचं मोठं नुकसान झालं असल्याचं या अधिकाऱ्यांनी सांगितलं. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी दहा हजार कोटी रुपये मदत जाहीर केली होती. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी खरीप पिकांसाठी हेक्टरी आठ हजार तर फळबागा आणि बारमाही पिकांसाठी हेक्टरी अठरा हजार रुपये मदतीचा शासन निर्णय जारी केला आहे. मात्र राज्य प्रशासनानं केंद्र शासनाकडे सात हजार दोनशे कोटी रुपये मदतीची मागणी केली असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

 दरम्यान, राज्यातल्या शेतकऱ्यांना सरकारने अंतरिम मदत दिली असून, शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सरकार कटिबद्ध आहे, असं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी म्हटलं आहे. ते आज संसदेबाहेर बातमीदारांशी बोलत होते.
****

 राज्यात अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विनाशर्त संपूर्ण कर्जमाफी देण्याची मागणी, माजी केंद्रीय कृषी मंत्री तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केली आहे. पवार यांनी आज दिल्लीत संसद भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेऊन या मागणीचं निवेदन सादर केलं. या पावसामुळे सोयाबीन, ज्वारी, बाजरी, मका या धान्यपिकांसह कांदा, टमाटा आदी भाजीपाल्याचंही मोठं नुकसान झाल्याचं पवार यांनी म्हटलं आहे. राज्यात सध्या राष्ट्रपती राजवट असल्यामुळे या प्रकरणी पंतप्रधानांनी तातडीनं लक्ष घालण्याची गरजही पवार यांनी व्यक्त केली. नवीन हंगामासाठी शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याज दराने कर्जही उपलब्ध करून द्यावं, आणि खासगी सावकारांपासून शेतकऱ्यांची सुटका करावी, अशी मागणीही पवार यांनी या निवेदनातून पंतप्रधानांकडे केली आहे.
****

 चिटफंड आणि आर्थिक गैरव्यवहारांना प्रतिबंध घालण्यासाठी कठोर कायदा करण्याची गरज आज लोकसभेत अनेक सदस्यांनी व्यक्त केली. चिटफंड दुरुस्ती विधेयकावर आज लोकसभेत चर्चा सुरू आहे, त्यावेळी विविध पक्षांच्या अनेक सदस्यांनी या चर्चेत सहभाग घेऊन, आपली मतं मांडली. उस्मानाबादचे शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी या चर्चेत सहभागी होत, अशा प्रकारे सर्वसामान्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्यांना कठोर शिक्षेची तरतूद करावी, अशी मागणी केली. सध्या अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर या चर्चेला उत्तर देत आहेत.
****

 सामाजिक कार्यकर्ते आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयने आरोपपत्र दाखल केलं आहे. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या दोघांविरोधात पुणे न्यायालयात आरोपपत्र दाखल केल्याचं पीटीआयचं वृत्त आहे.
****

 जळगाव इथल्या घरकुल घोटाळ्या प्रकरणी कारागृहात असलेले माजी मंत्री सुरेश जैन यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणी धुळे विशेष न्यायालयाने जैन यांना १०० कोटी रुपये दंड आणि ७ वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली आहे, मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे पाच लाख मुचलक्यावर तीन महिन्यासाठी जामीन मंजूर करण्यात आला असल्याचं, या वृत्तात म्हटलं आहे.
****

 औरंगाबाद महानगरपालिकेला कायम स्वरूपी आयुक्त देण्याची मागणी विधान परिषद सदस्य आमदार अंबादास दानवे यांनी केली आहे. आज त्यांनी मुंबईत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन, याबाबतचं निवेदन सादर केलं. औरंगाबाद महानगरपालिकेची निवडणूक नजिकच्या काळात होणार असून या पार्श्वभूमीवर कायम स्वरूपी आयुक्त मिळणे गरजेचं असल्याचं दानवे यांनी या निवेदनात नमूदनात म्हटलं आहे.
****

 धुळे जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातल्या चारही पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांची आज घोषणा झाली. या सर्व ठिकाणी येत्या सात जानेवारीला मतदान होणार असून मतमोजणी आठ जानेवारीला होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा आचारसंहिता लागू झाली आहे.
****

 सोलापूर जिल्ह्यात आज दुपारी झालेल्या रस्ता अपघातात तीन जण ठार तर दोन जण जखमी झाले. सांगोला- मीरज रस्त्यावर दोन छोटी मालवाहू वाहनं आणि एका दुचाकीची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला. जखमींना मिरज येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
*****
***

No comments: