Friday, 1 November 2019

Text - AIR News Bulletin, Aurangabad 01.11.2019....Evening Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 01 November 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०१ नोव्हेंबर २०१९ सायंकाळी ६.००
****
अवकाळी पावसामुळे राज्यात झालेल्या शेतीच्या नुकसानीचे तातडीनं पंचनामे करावेत, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलताना या संबंधी माहिती दिली. विमा कंपन्यांनी या कामी पुढाकार घ्यावा, त्यांच्याकडे असलेलं अपुरं मनुष्यबळ लक्षात घेता कंपन्यांनी सरकारी पंचनामेच ग्राह्य धरावेत. शेतकऱ्यांनी मोबाईलवर छायाचित्र काढून संबंधित विभागाकडे पाठवले तरी ते ग्राह्य समजले जातील, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. सचिव, जिल्हाधिकारी यासह सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केवळ कार्यालयात बसून समन्वयाचं काम न करता प्रत्यक्ष जागेवर काम करणाऱ्यांबरोबर संवाद साधावा, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं मदत करण्याबरोबरच आणखी अतिरीक्त मदत कशी करता येईल, याबाबत सरकार विचार करत आहे. मंत्रिमंडळाच्या उपसमितीची या अनुशंगानं उद्याच बैठक घेतली जाणार असून केंद्र सरकारकडे मदतीची मागणी करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
****
अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतपिकांचे त्वरित पंचनामे करावेत असे आदेश राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज प्रशासनाला दिले आहेत. खोत यांनी आज नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली. या पावसामुळे द्राक्ष, मका आणि कांद्यासह अन्य पिकांचं नुकसान झालं असून शासन शेतकऱ्यांना नक्कीच मदतीचा हात देईल असंही खोत यावेळी म्हणाले.
****
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी आज नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या विविध भागांची आज पाहणी केली. त्यांनी इगतपुरी तालुक्यातील घोटी टोल नाका परिसरात नुकसान झालेल्या द्राक्ष बागेची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी दिंडोरी तालुक्यात खेडेगाव इथं शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
अवकाळी पावसामुळे संपूर्ण खरीपाची पिकं उध्वस्त झाली असली तरी शेतकऱ्यांना त्याची किती भरपाई मिळेल याची माहिती सरकारी यंत्रणेकडे नसल्याची टीका पवार यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना केली. पक्षाच्या सर्व लोकप्रतिनिधींसह राज्य सरकारला नुकसानीची आकडेवारी सादर करुन मदतीची मागणी करू, असं त्यांनी यावेळी नमूद केलं. सरकारनं यावर सहानुभूतीनं निर्णय घ्यावा, मात्र अपेक्षित निर्णय न घेतल्यास पुढं काय करायचे ते आपण ठरवू, असा इशाराही शरद पवार यांनी यावेळी दिला.
****
जालना जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे सुमारे चार लाख तेहतीस हजार हेक्टरवरील खरीप पिकांचं नुकसान झालं आहे. तेहतीस टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या सोयाबीन, मका, बाजरी आणि कापसाचे पंचनामे महसूल आणि कृषी विभागानं सुरू केले आहेत. पालकमंत्री बबनराव लोणीकर, जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे, जिल्हा कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी आज बदनापूर तालुक्यातल्या भराडखेडा इथं नुकसानग्रस्त भागाची पहाणी केली. अवकाळी पावसामुळे जालना जिल्ह्यात खरीप पिकाचं ३२६ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचं कृषी अधिकारी शिंदे यांनी यावेळी सांगितलं.
****
धुळे जिल्ह्यात अतिवृष्टीमुळं झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचं काम जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानं आजपासून सुरु करण्यात आलं आहे. कृषी आणि महसूल विभागानं संयुक्तपपणे सविस्तर पंचनामे करून आठ नोव्हेंबरपर्यंत अहवाल सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी दिले आहेत.
****
गडचिरोली जिल्ह्यातल्या कोरची तालुक्याला परतीच्या पावसाचा मोठा फटका बसला असून, धानपिकाचं नुकसान झालं आहे. हलक्या धानाची कापणी होऊन धानाच्या शेतात ठेवलेल्या कडपांचं सर्वाधिक नुकसान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
कोल्हापूर जिल्ह्यात पुरामुळे झालेली नुकसान भरपाई देण्यासाठी जिल्हा प्रशासनानं राज्य शासनाकडे दोनशे सोळा कोटी रुपयांची मागणी केल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ तालुक्यातल्या उंडेगाव इथं एका तरुण शेतकऱ्यानं आज आत्महत्येचा प्रयत्न केला. सोयाबीन पिकाचं नुकसान झाल्यामुळे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या प्रकाश इंगोले यांच्यावर औंढा इथल्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
****
जळगाव जिल्ह्यातल्या पाचोरा तालुक्यातील लोहारा इथं मधमाशांच्या हल्ल्यात एक शेतकरी आज मृत्यूमुखी पडला आहे. काशीनाथ राजपूत हे आज सकाळी शेतात जात असताना त्यांच्यावर आग्यामोहळाच्या मधमाशांनी हल्ला चढ‍वला होता. उपचारांसाठी पाचोरा रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.
****

No comments: