Regional Marathi
Text Bulletin, Aurangabad
Date – 20 December 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २० डिसेंबर
२०१९ दुपारी १.०० वा.
****
केंद्र सरकारनं अर्थव्यवस्थेत अनेक सुधारणा करून शिस्त आणि सकारात्मकता आणली असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत ॲसोचॅमच्या शताब्दी समारोहात बोलत होते. सरकार कोणत्याही आव्हानांना घाबरत नसल्याचं सांगत, पंतप्रधानांनी, गेल्या पाच वर्षात देश सक्षम झाला असून, पन्नास खर्व डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचं उद्दीष्ट पूर्ण करू शकेल, असा विश्वास व्यक्त केला.
****
भारतीय वंशाच्या विदेशी नागरिकांचा भारतातला प्रवास सुलभ होण्यासाठी सरकारने ओसीआय कार्डधारकांना ३० जून २०२० पर्यंत नियमात सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. २० वर्षांपर्यंत वयोमर्यादेच्या ओसीआय कार्डधारकांना पासपोर्ट नव्याने जारी करताना, ओसीआय कार्डही नव्याने जारी करणं २००५ च्या नियमानुसार बंधनकारक होतं. या नियमात येत्या जून महिन्यापर्यंत सूट देण्यात आली आहे.
****
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार नाताळपूर्वी होण्याचे संकेत काँग्रेस पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्यानं दिले आहेत. खातेवाटपाबाबत चर्चा पूर्ण झालेली असून, काही खात्यांची तीनही पक्षांमध्ये अदलाबदल होण्याची शक्यता असल्याचं या नेत्यानं सांगितल्याचं, पीटीआयचं वृत्त आहे. २३ किंवा २४ तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होईल, असं या वृत्तात म्हटलं आहे. सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील आणि छगन भुजबळ तर काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि नीतीन राऊत हे सहा मंत्री आहेत.
****
राज्यातल्या चार महानगरपालिकांच्या प्रत्येकी एका रिक्त पदाच्या पोटनिवडणुकीकरता येत्या २७ डिसेंबरला प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी ही माहिती दिली. यामध्ये नांदेड- वाघाळा, परभणी, अहमदनगर आणि जळगाव या चार महानगरपालिकांमधल्या प्रत्येकी एका जागेचा समावेश आहे. या यादीवर तीन जानेवारीपर्यंत हरकती आणि आक्षेप स्वीकारण्यात येणार असून, अकरा जानेवारी २०२० रोजी अंतिम मतदार यादी जाहीर होणार असल्याचं, मदान यांनी सांगितलं.
****
नाशिक महापालिकेच्या महासभेत आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरून गोंधळ उडाला. भाजप नगरसेवकांनी या संदर्भात प्रस्ताव मांडून राहुल गांधी यांचा निषेध करण्याची मागणी केली. त्याला काँगेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध केला. नागरिकत्व कायद्यातील सुधारणाबद्दल केंद्र सरकारचे अभिनंदन करण्यात आलं, त्यास राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध दर्शवल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
स्वच्छतेचा संदेश देणारे महान संत गाडगेबाबा यांना आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्तानं सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे.
नांदेड इथं, संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. जिल्ह्यात ठिकठिकाणी शाळा, महाविद्यालये, ग्राम पंचायत परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. कंधार तालुक्यात महात्मा फुले माध्यमिक शाळेत संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
वाशिम जिल्ह्यात संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त ' माझं वाशिम, स्वच्छ वाशिम ' या अंतर्गत शहरातल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. या मध्ये विविध सामाजिक संघटना तसंच महिला मंडळासह वाशिम नगर परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ पवन बनसोड यांच्यासह अनेक नागरिक सहभागी झाले.
अमरावती इथं संत गाडगेबाबा विद्यापीठाचा छत्तीसावा दीक्षांत समारंभ आज साजरा होत आहे. कुलपती महामहीम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री संजय धोत्रे, कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांच्या उपस्थितीत हा समारंभ होत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे
****
अकोला जिल्ह्यातल्या चतारी ग्रामीण रुग्णालयात जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या मार्गदर्शनात सिकलसेल जनजागरण सप्ताहानिमित्त मार्गदर्शन शिबीर घेण्यात आलं. या शिबीरात सिकलसेल आजारांविषयी माहिती, लक्षणे आणि उपाययोजनांबाबत नागरिकांना माहिती देण्यात आली. एड्सची लक्षणं, कारणं आणि उपचारांबाबतही माहिती देण्यात आली, लग्नापूर्वी सिकलसेल आणि एड्स तपासणी करूनच युवक-युवतींनी लग्न करावं असं आवाहन यावेळी करण्यात आली.
****
हिंगोली इथं सुरक्षेच्या कारणास्तव बस आगार प्रमुख आणि पोलिसांच्या बैठकीनंतर सर्व बसगाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात जिल्ह्यातल्या कळमनुरी इथं बंदची हाक देण्यात आली होती. यादरम्यान जमावानं दोन बसचं नुकसान केल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
No comments:
Post a Comment