Tuesday, 21 April 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 21.04.2020 TIME – 7.10 AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 21 April 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक२१ एप्रिल २०२० सकाळी ७.१० मि.
****
** कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं आंतरमंत्रालयांची सहा पथकं विविध राज्यात पाठवली. मुंबई आणि पुण्यातही दोन पथकं
** पालघर जिल्ह्यातल्या जमावानं हत्या केलेल्या प्रकरणाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न न करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन
** टाळेबंदी शिथिलतेच्या काळात आजिबात गाफिल न राहण्याच्या उद्धव ठाकरे यांच्या प्रशासनाला सूचना
** राज्यात आणखी ४६६ कोरोना विषाणू बाधित रूग्ण; नऊ जणांचा मृत्यू
** आणि
** उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष नारायण समुद्रे यांचं अपघाती निधन
****
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं आंतरमंत्रालयांची सहा पथकं विविध राज्यात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना विषाणूबाबतच्या स्थितीचा जागेवर आढावा घेऊन, ही पथकं राज्यातल्या अधिकाऱ्यांना निर्देश देणार असून, त्याचा अहवाल केंद्राला पाठवणार आहे. यापैकी दोन पथकं राज्यातल्या मुंबई आणि पुणे इथं येणार आहेत.
****
पालघर जिल्ह्यातल्या तीन जणांची जमावानं हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी तातडीनं कारवाई करून यातील प्रमुख पाच हल्लेखोर आणि सुमारे शंभर जणांना पकडलं असून गुन्हे अन्वेषण विभाग याचा कसून तपास करत असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. मृतांमध्ये दोन साधू होते मात्र या प्रकरणाला कुणीही धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करू नये, असं आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी काल सामाजिक संपर्क माध्यमावर बोलतांना केलं.

एक तर तिथल्या दोन पोलिसांना आपण तात्काळ suspend  केले नाही हे सगळे आपण करतो आहोत आणि गेले काही दिवस तिकडे हवाचा चालेले आहे. चोरी फिरतात रात्रीचे त्याच्यामध्ये कोणती घ्यावी कारण नाही कोणीकडे धर्मा मध्ये आग लावण्याचे कारण शोधू नये मी अत्यंत नम्रपणे आणि आत्मविश्वासाने सांगतोय या सगळ्या गोष्टी मध्ये जे–जे कोणी जबाबदार आहेत त्यातली जवळपास शंभराच्या वरती तुरुंगात आहेत नऊ अल्पवयीन मुले आहेत त्यांना सुधारगृहात पाठवले आहे आणखीन काही लोक फरार आहेत शोधून काढून त्यांना शिक्षा केल्या सरकार गप्प बसणार नाही

दरम्यान, या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांची दूरध्वनीवरून चर्चा केली. या घटनेला जातीय वळण देण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरूद्ध कारवाई करण्याची त्यांनी यावेळी मागणी केली.
राज्य सरकारनं या प्रकरणी यापूर्वीच उच्चस्तरीय चौकशी सुरू केली आहे. गुन्हे तपास विभागाचे पोलिस महानिरीक्षक अतुलचंद्र कुलकर्णी या प्रकरणाचा तपास करत असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं.
****
राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्र्वभूमीवर सुरू टाळेबंदीची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे निर्देश केंद्र सरकारनं दिले आहेत. काही राज्य आणि केंद्रशासित प्रदेश टाळेबंदीच्या काळात बंदी असलेल्या उपक्रमांना सुरू करण्याच्या सूचना देत असल्याच्या पार्श्र्वभूमीवर हे निर्देश देण्यात आले आहेत. सर्व मुख्य सचिवांशी या संदर्भात संवाद साधण्यात आला असल्याचं केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी काल सांगितलं. 
****
टाळेबंदी काही प्रमाणात शिथिल करण्यात आल्यानं आजिबात गाफिल राहू नका, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातल्या जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त आणि पोलिस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. एप्रिलचा शेवटचा आठवडा आणि मे महिन्याचा मध्य हा या साथीचा प्रादुर्भाव वाढतो वा कमी होतो हे पाहण्याचा कालावधी आहे. ही लढाई आता कुठे सुरू झाली असून पुढील तीन महिने आपाल्याला गाफील न राहता काम करावं लागणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
कोरोना विषाणू बाधित रूग्णांची काळजी घेतांना इतर आजाराच्या रूग्णांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, त्यामुळे जिल्ह्यातले खासगी डॉक्टर्स आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांची सेवा घेन जिल्ह्यातल्या नागरिकांना आरोग्य सेवा मिळतील, वेळेवर लसीकरण, बाळंतपण तसंच महत्वाच्या शस्त्रक्रिया होतील याची खात्री करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
****
कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या व्यक्ती अथवा ज्यांना उपवास करू नका असा डॉक्टरांनी सल्ला दिलेल्या नागरिकांनी रमजानच्या काळात उपवास करू नये मात्र इतर व्यक्ती उपवास करू शकतात, असं संयुक्त अरब अमिरातीच्या फतवा परिषदेनं याबाबतचा फतवा काढून सांगितलं आहे. वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींनीही उपवास नाही केला तरी चालेल, असंही परिषदेनं म्हटलं आहे. पवित्र कुराणात दिलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसारच हे फतवे काढल्याची माहिती शेख अब्दुल्ला बीन बयाह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या फतवा परिषदेच्या ऑनलाईन बैठकीत देण्यात आली.
सध्याच्या काळात मुस्लीम बांधवांनी घरीच स्वतंत्रपणे प्रार्थना करावी, शुक्रवारीही एकत्र येन प्रार्थना करू नये, त्याऐवजी दुहरची प्रार्थना करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. ईदच्या दिवशीही कुठल्याही प्रवचनाशिवाय प्रार्थना करावी, असं आवाहनही परिषदेनं केलं आहे. याशिवाय या काळात गरिबांना अधिकाधिक मदत करावी, जकातचा निधी देशातल्या देशात खर्च करावा तसंच प्रशासनानं दिलेल्या आदेशाचं कोणत्याही प्रकारे उल्लंन करू नका असंही संयुक्त अरब अमिरातीच्या फतवा परिषदेनं म्हटलं आहे.
****
देशात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रूग्णांची संख्या दुप्पट व्हायला आता अधिक वेळ लागत असल्याची दिलासादायक माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. टाळेबंदी सुरू होण्यापूर्वी साडे तीन दिवसात रूग्णसंख्या दुप्पट होत होती, मात्र टाळेबंदीनंतर साडे सात दिवसांनी रूग्णांची संख्या दुप्पट होत असून गेल्या १४ दिवसात २३ राज्यातल्या ५९ जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित रूग्ण आढळला नसल्याचंही आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी काल सांगितलं.
****
राज्यात काल आणखी ४६६ नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. राज्यातला एकूण रुग्णांचा आकडा चार हजार ६६६ झाला आहे. या आजारानं राज्याल काल नऊ जणांचा मृत्यू झाला, एकूण मृतांची संख्या २३२ झाली आहे. राज्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होण्यामागची कारणे सांगतांना आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले,

आकडा वाढण्याचं कारणही आहे आपण जी गोष्ट प्रोटोकॉल मध्ये आहे सांगतो प्रोटोकॉल मध्ये गोष्ट आय. सी एम आर नी सांगितलेली आहे जी नियमाला धरुन आहे  कुठेही गोष्ट टाळण्याच काम महाराष्ट्र सरकार करत नाही याच कारण अस आहे की महाराष्ट्रात ज्या टेस्ट झालेल्या आहेत त्या देशांमध्ये कुठेही झालेले नाहीत  तर हजार टेस्ट ६७ हजार टेस्ट झालेल्या आहेत मुंबईमध्ये पन्नास हजाराच्या वर टेस्ट झालेल्या आहेत त्यामुळे सहाजिक आहे याठिकाणी टेस्ट मोठ्या संख्येने होत आहेत त्यामुळे आपण Contact tracing मोठ्या पद्धतीने करतो आहोत महाराष्ट्र मध्ये जवळजवळ ३६८ containment zone  वर आपण महाराष्ट्रमध्ये घराघरांमध्ये जाऊन कोणाला ताप आहे का सर्दी आहे का तुम्हाला काही लक्षणे आढळतात या सगळ्या गोष्टी आवलोकन करण्याच काम  करण्याचं काम करतायेत जिथे ही शंका आली त्या शंकेच्या अनुषंगाने   त्यांच्या कोणत्याह. तडजोड न करता आपण सर्वांच्या टेस्ट करण्याचे काम होते.
****
औरंगाबाद शहरातले सात कोरोना विषाणू बाधित रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना काल रुग्णालयातून सुटी देण्यात आली. रविवारी पाच जणांना घरी सोडण्यात आलं होतं, त्यामुळे औरंगाबाद शहरातले १२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. शहरात आता १४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
दरम्यान, शहरातल्या आसेफिया कॉलनितल्या एका ६५ वर्षीय महिलेचा अहवाल काल सकारात्मक आला. समतानगर मधल्या कोरोना विषाणू बाधित रुग्णाच्या संपर्कातल्या दहा जणांची काल तपासणी करण्यात आली.
***
नंदूरबार इथंही काल आणखी तीन रुग्णाचे कोरोना विषाणू चाचणी अहवाल सकारात्मक आले आहेत. यामुळं आता इथली रूग्णसंख्या ४ झाली आहे.
****
नाशिक जिल्ह्यातल्या मालेगावमध्ये काल दोन कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मालेगावमध्ये एकूण मृतांची संख्या आठ झाली आहे.
****
अहमदनगर इथं काल दोन व्यक्तींचे अहवाल सकारात्मक आले असून हे दोन्ही बाधीत काही दिवसांपूर्वी मृत्यु पावलेल्या रुग्णाची मुलं आहेत. त्यामुळे अहमदनगर इथं कोरोना विषाणू बाधित रुग्णाची संख्या आता ३१ झाली आहे.
****
सोलापूरात काल नव्याने दहा रुग्ण कोरोना विषाणू बाधित असल्याचे आढळले आहेत. त्यामुळे आता सेालापूर शहरातील कोरोना बाधितांचा कडा २५वर पोहचला आहे. ज्या भागात हे रुग्ण आढळून आले आहेत तो परिसर प्रशासन प्रतिबंधित केला असून  नियंत्रण क्षेत्र म्हणून जाहीकेला आहे, असं जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितलं.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात उमरगा तालुक्यातल्या तिनही कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा १४ दिवसांनंतरचा अहवाल नकारात्मक आल्यानं उस्मानाबाद जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तिंचे तपासणी अहवालही  नकारात्मक आले आहेत. जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर राजाभाऊ गलांडे यांनी काल ही माहिती दिली. यापुढेही सामाजिक अंतर राखणं, मास्क लावणं, दुसऱ्या जिल्ह्यातून आलेल्या व्यक्तींची वैद्यकीय तपासणी करून घेणं गरजेचं असून, नागरिकांनी दक्षता घेण्याचं आवाहन गलांडे यांनी केलं.
याबरोबरच मराठवाड्यातले नांदेड, हिंगोली, लातूर आणि बीड असे पाच जिल्हे कोरोना विषाणूमुक्त आहेत.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
मुंबईत ५३ पत्रकारांना कोरनिा विषाणूची बाधा झाल्याचे आढळून आलं आहे यामध्ये प्रामुख्याने कॅमेरामन आणि वृत्तवाहिन्यांच्या पत्रकारांचा समावेश आहे मुंबई महापालिकेने केलेल्या तपासणीमध्ये आढळून आलं
****
राज्यात घरोघरी वृत्तपत्र वाटपावर घातलेल्या बंदीबाबत येत्या दोन दिवसात खुलासा करावा असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं केंद्र सरकार, राज्य सरकार आणि नागपूर महानगरपालिका आयुक्त यांना नोटीस बजावून दिले आहेत. महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघ आणि नागपूर श्रमिक पत्रकार संघ यांनी राज्य सरकारच्या वादग्रस्त निर्देशाविरुद्ध याचिका दाखल केली आहे. या याचिकेच्यासुनावणी दरम्यान न्यायमूर्ती नितीन सांबरे यांनी हे निर्देश दिले आहेत. वृत्तपत्रं वितरणावरील बंदी अवैध, अतार्किक आणि राज्यघटनाविरोधी असून या बंदीमुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी झाली आहे. तसेच, ही बंदी सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निर्णयांची पायमल्ली करणारी आहे असा दावा याचिकाकत्यांनी केला आहे. यावरील पुढील सुनावणी येत्या २३ तारखेला होणार आहे.
औरंगाबाद खंडपीठानंही सरकारच्या या निर्णयाबाबतच्या वृत्ताची दखल घेतली आहे. याप्रकरणी सरकारला २७ एप्रिलपर्यंत आपलं म्हणणं दाखलं करण्यास सांगितलं आहे.
****
हिंगोली इथं जिवनावश्यक सेवांची दुकानं पुन्हा एक दिवसाआड  सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंतच उघडण्याचा आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी काल जारी केला. याआधी, दुकानं याच वेळेत रोज उघडण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र, क्षमतेपेक्षा जास्त गर्दी मोंढा परिसर आणि बाजारात आढळून आल्यानं नवीन आदेश देण्यात आला. त्यामुळे टाळेबंदीच्या काळात शहरात उद्या २२ एप्रिलनंतर २४, २६, २८ आणि ३० एप्रिल  आणि  दोन मे रोजी जिवनावश्यक सेवेची दुकाने चालू राहतील, असं या आदेशात म्हटलं आहे.
****
नांदेड जिल्ह्याच्या किनवट इथं कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनानं दोन उपचार केंद्र उभारली आहेत. गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयात  पन्नास खाटांचं समर्पित कोव्हीड आरोग्य काळजी केंद्र आणि नवीन तहसिल इमारतीत शंभर खाटांचं  कोव्हीड काळजी केंद्र  उभारण्यात आलं असल्याची  माहिती सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिली आहे. कोरोना सदृश्य लक्षणं असलेल्या रुग्णास इथं दाखल केलं जाणार आहे.
****
हिंगोलीराज्य राखीव पोलीस गट क्रमांक १२ चे नाशिक आणि मालेगावमधून १९२ तर मुंबईतून ८५ जवान दाखल झाले आहेत. या सगळ्याचं विलगीकरण करण्यात आलं असून त्यांचे लाळेचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत ४५७ जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आलं असून १७० जणांचे तपासणी अहवाल नकारात्मक आले आहे.
****
परभणी इथं जमावबंदी आदेशाचं आदेशाचं उल्लघंन करणाऱ्या १६ आरोपींविरुद्ध १० गुन्हे दाखल झाले आहेत. जिल्ह्यात अद्यापपर्यंत २६१ गुन्हे दाखल असून ७०५ आरोपीविरूद्ध राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि भारतीय दंड संहितेनुसार कारवाई करण्यात आली आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या सर्व बँकांचे दैनंदिन कामकाज भारतीय रिझर्व बँकेने निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार सकाळी १० ते दुपारी ३ यावेळेत होणार आहे. जिल्ह्यातल्या शासकीय खरेदी केंद्र आणि बाजार समितीच्यावतीनं कापूस, तूर, हरभरा खरेदी सुरु करण्यात येणार असून जिल्ह्यातल्या राष्ट्रीय महामार्ग तसेच महानगर पालिका आणि नगर परिषदे अंतर्गत रस्ते दुरुस्ती आदी कामांना सुरुवात करण्यास जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी काल आदेश काढून परवानगी दिली आहे. मात्र यामध्ये सामाजिक अंतराचा नियम पाळणे बंधनकारक करण्यात आले आहे.
****
परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यातल्या चारठाणा इथं महाराष्ट्र बँकेत जनधन खात्यातले पैसे काढण्यासाठी खातेदारांनी काल मोठी गर्दी केली होती. या गर्दीमुळे बँकेसमोर सामाजिक अंतर नियमाचं ल्लंघझाल्याचं पाहावयास मिळालं.
****
नांदेड इथल्या जनता विकास परिषदेनं एक लाख पन्नास हजार रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहायता निधीला दिला आहे. परिषदेच्या वतीनं याचा धनादेश काल जिल्हाधिकारी डॉक्टर विपीन टणकर यांच्याकडे देण्यात आला. लातूर जिल्ह्यातल्या उदगीर इथल्या मराठवाडा जनता विकास परिषदेच्या शाखेनंही मुख्यमंत्री सहाय्यता निधीला पंच्चावन  हजार ५५५ रुपयांची मदत दिली आहे. या रकमेचा धनादेश तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला तर परभणीच्या शाखेनं २८ हजार पाचशे रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहायता निधीला दिला आहे.
****
उस्मानाबाद इथल्या रामकृष्ण विद्युत आयुर्वेदिक फार्मसी महाभृंगराज तेलाचे निर्माते एस. आर. कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ मुख्यमंत्री सहायता निधीला पन्नास हजार रुपयांचा मदत निधी देण्यात आला आहे. उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी  दीपा मुधोळ मुंडे यांच्याकडे हा धनादेश सोपवण्यात आला.
****
जालना शहरातल्या महात्मा फुले मार्केट परिसरात भाजीपाला आणि फळविक्री करणाऱ्या २० विक्रेत्यांवर सुरक्षित सामाजिक अंतर न राखल्याबद्दल नगरपालिकेच्या पथकानं पोलिसात गुन्हे दाखल केले आहेत. नगर पालिकेच्या पथकानं चार किराणा दुकानदारांकडूनही प्रत्येकी दोन हजार रुपयांचा दंडही वसूल केला आहे.
****
राज्यात लागू टाळेबंदीमुळं दिव्यांग व्यक्तींच्या समस्या लक्षात घेवून कारंजा नगर पालिकेने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. कारंजा नगरपालिकेनं शहरातल्या ५११ दिव्यांगाच्या खात्यामध्ये प्रत्येकी ११५० रुपये याप्रमाणे एकूण ५ लाख ८७ हजार ६५० रुपये वर्ग केल्याची माहिती मुख्यधिकारी डॉ.अजय कुरवाडे यांनी दिली आहे.
****
नाशिक जिल्ह्यात महिनाभरापासून बंद असलेले उद्योग सुरु होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाल्यानंतर ऑनलाइन परवानगीसाठी उद्योजकांनी धाव घेतली आहे. काल सायंकाळी पाच वाजेपर्यंत १ हजार ८० उद्योजकांनी ऑन लाईन अर्ज दाखल केले आहेत. अन्य सोपस्कार पूर्ण करुन आज काही उद्योग प्रत्यक्षात सुरु होण्याची शक्यता आहे.
****
देशात सुरू असलेल्या टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर विधान सभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वैद्यकीय आणि शिक्षण क्षेत्रातल्या विविध तज्ञांशी या क्षेत्रातल्या समस्या आणि त्यावर करावयाचे संभाव्य उपाय यावर विस्तृत चर्चा केली. दोन वेगवेगळ्या सत्रात झालेल्या या चर्चेत शिक्षण आणि वैद्यकीय क्षेत्रातले विविध मान्यवर सहभागी झाले होते.
****
राज्य सरकारच्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या मूल्यांकनात नांदेड जिल्हा ग्रीन झोन मध्ये असल्यामुळे टाळेबंदीत काही प्रमाणात शिथिलता देत जिल्ह्यात सशर्त व्यवहार सुरू करण्यात आले आहेत. काल नांदेड कृषि उत्पन्न बाजार समितीत ज्वारी, गहू आणि हरभऱ्यासह हळदीची मोठ्या प्रमाणावर आवक झाली. मात्र बाजारात भाव कोसळल्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. 

लॉक डाऊनलोड आता भाव कमी होऊन गेलं  कुंडल भावाचे कमी होऊन गेलो चार हजोर मागू लागले  आम्हाला कमीत कमी सहा हजार  मिळावेत अशी अपेक्षा होती आता कुठे पाच हजार दोनशे, चार हजार अस सुरु झालं काय मतलब आहे आता याला भाव तर राहाना शेतक–यांना  हळद आणलं बाजारामध्ये त्याला चार हजार पेक्षा जास्त भाव मिळायला लागला. साठ हजार खर्च झालायं गहू, ज्वारी, गहू घेतला शेतकराने खायला तीन हजार आता सतराशे,अठराशे ज्वारी  तर सांगू नकाच रुपये चार हजार पाच हजार अडीज हजार घेतलेली  आज तीन हजार घेतलेली  ती कुठं आज सतराशे,अठराशे तुर चार हजार, पाच हजार शेतक–यांचे शंभर टक्के नुकसान आहे. काय होणार यामध्ये हजार, बाराशे औषधी महाग लेबर मिळाणार.
****
शासकीय कार्यालयामध्येही पाच ऐवजी दहा टक्के कर्मचाऱ्याना उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्याप्रमाणे कर्मचाऱ्याची उपस्थिती दिसून आली. नांदेड जिल्हा ग्रीन झोनमध्ये असला तरी जिल्ह्याच्या सर्व सिमा बंदच ठेवण्यात आल्या आहेत. सीमेवर प्रत्येक ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर रहदारी बंद आहे.
दरम्यान, कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नांदेड जिल्ह्यात तीन मे पर्यंत जमावबंदी आदेश कायम राहणार असल्याचं जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी काल वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं.
****
जालना जिल्हा रुग्णालयात फुफ्साच्या आजारानं ग्रस्त असलेल्या एका ६२ वर्षीय महिलेचा काल मृत्यू झाला. पाच दिवसांपूर्वी भरती झालेल्या या महिलेचा कोरोना विषाणू विषयक चाचणी अहवाल नकारात्मक आला होता. दरम्यान, जिल्हा रुग्णालयातल्या विलगीकरण कक्षात भरती असलेल्या २१ रुग्णांच्या लाळेचे  नमुने काल तपासणीसाठी पाठवण्यात आले असून २७५ जणांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे.
****
औरंगाबाद शहरातल्या बेगमपुरा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देवकते यांना येमेन देशाच्या नागरिकासोबत गैरवर्तन केल्याबद्दल निलंबित करण्यात आलं आहे. गेल्या २९ मार्च रोजी त्यांनी येमेन नागरिकत्त्व असलेल्या आणि औरंगाबादमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याला पैसे मागितले आणि मारहाण केल्याची तक्रार मुंबईच्या येमेन वाणिज्य दूतावासाकडे केली होती. त्यानंतर याप्रकरणाची खात्याअंतर्गत चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात आलं आहे.
****
राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या संकेतस्थळावर विविध पदांच्या भरतीसाठी पूर्णत: खोटी जाहिरात प्रसिद्ध झाली असून याबाबत संबंधितांवर गुन्हा दाखल केला जाणार आहे. विभागाच्या ई- ग्रामपंचायत संकेतस्थळावर ही जाहिरात प्रसिद्ध झाली असली तरी यात नमूद कोणतही पद भरण्याचं  शासनाच्या विचाराधिन नाही. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगार तरुणांची दिशाभूल होन आर्थिक घोटाळा होण्याचा प्रयत्न उघड झाला असल्यानं या जाहिरातीकडे दुर्लक्ष करण्याचं आवाहन विभागानं केलं आहे.
****
उस्मानाबाद तालुक्यातले ढोकीचे माजी जिल्हा परीषद सदस्य, जिल्हा दूध संघाचे माजी अध्यक्ष नारायण किसनराव समुद्रे यांचं काल रात्री ढोकी जवळ रस्ता अपघातात निधन झालं.  ते ६२ र्षांचे होते. ढोकीचे सरपंच, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलं होतं. आज सकाळी ११ वाजता त्यांच्या पार्थिवावर ढोकी इथं अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
****
नाशिक जिल्ह्यातल्या निफाड तालुक्यात मुंबई -आग्रा रस्त्यावर शिरवाडे वणी इथं काल रात्री रुग्णवाहिका आणि ट्रॅक्टर यांच्यात सामोरा समोर धडक होऊन झालेल्या अपघातात तीन जण ठार झाले, तर एक जण जखमी झाला. ही रुग्णवाहिका जळगाव जिल्ह्यातल्या पाचोरा इथल्या एका रुग्णाला घेऊन नाशिककडे येत होती. मृतांमध्ये रुग्णवाहिकेतल्या तीन वृद्धांचा समावेश आहे.
****
औरंगाबाद शहरात जळगाव रोडवर जाधव मंडीतून भाजीपाला घेऊन जाणाऱ्या दांम्पत्याला महानगरपालिकेच्या ट्रकनं धडक दिल्यानं झालेल्या अपघाताया दाम्पत्याचा मृत्यू झाला. काल सकाळी हा अपघात झाला. प्रकाश जाधव आणि मोनिका जाधव हे आठ महिन्यांपासून शहरात भाजी विक्रीचा व्यवसाय करत होते. आरोपी ट्रकचालकाला पोलिसांनी अटक केली आहे.
****
मोठी मागणी असलेला कोकणातला हापूस आंबा गुजरातमध्ये पाठण्यासाठी येत्या गुरुवारी म्हणजेच २३ एप्रिल रोजी एक विशेष गाडी धावणार आहे. टाळेबंदीमुळे कोकण रेल्वेची प्रवासी वाहतूक बंद असली तरी मालवाहतूक सुरू असून तिचा फायदा कोकणातल्या आंबा बागायतदारांना होणार आहे.
अधिक माहिती देत आहे आमचे वार्ताहर...

लॉक डाऊनलोड रस्त्यावरची वाहतूक बंद करण्यात आल्याने आंब्याच्या वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता या पार्श्वभूमीवर रत्नागिरीचे माजी आमदार बाळ माने यांनी आंब्याची कोकण रेल्वेची वाहतूक होण्यासाठी प्रयत्न केले त्यामुळे आता कोकण रेल्वेची विशेष गाडी सोडण्यात येणार आहे पहिल्या फेरीत दोन
व्हॅन मधून प्रत्येकी एक हजार पेटया जाणार आहे रेल्वेतून पेटी मागे केवळ ५५ रुपये आणि चढ – उतारा करिता ४० रुपये इतका खर्च येईल ट्रकमधून आंबा पाठविला गेला तर एका पेटीत अडीशे रुपये खर्च येत असल्याने रेल्वेच्या वाहतुकीमुळे शेतकऱ्याची एक भेटीमागे दीडशे रुपयांची बचत होणार आहे त्याचा फायदा कोकणातल्या आंबा बागायतदारांना नक्कीच होणार आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी प्रमोद कोनकर रत्नागिरी
****
परभणी जिल्ह्यातल्या सेलूचे उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी पाच जणांविरूद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. १८ एप्रिल रोजी घडलेल्या या प्रकरणात शासकीय कामात अडथळा आणणे, संचारबंदीचे उल्लंघन करणे, साथीचा रोग पसरण्यास कारणीभूत ठरणे आदि कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. निवृत्त पोलिस अधिकाऱ्यांची दोन मुलं आणि एका मुलीचा आरोपीत समावेश आहे. याप्रकरणी तीन तरूणांसह एक मोटर सायकलही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
****
लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतमालाच्या खरेदी विक्रीचे व्यवहार आजपासून सुरु करण्यात येणार आहे. आज तूर, उद्या सोयाबीन, तर गुरुवार आणि शुक्रवारी हरभऱ्याचा लिलाव निघणार आहे. या बाजार समितीत खरेदी विक्रीसाठी मार्केट यार्डात दररोज ५० शेतकरी वाहनास प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती  कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ललितकुमार शहा यांनी दिली.
****
उस्मानाबाद जिल्हयात २०१९-२० मध्ये भारतीय अन्न महामंडळामार्फत तूर आणि हरभरा खरेदी करण्यासाठी ११ खरेदी केंद्र मंजूर करण्यात आले आहेत. त्यापैकी फक्त उस्मानाबाद, गुंजोटी आणि कानेगाव या तीनच ठिकाणी ग्रेडरची नियुक्ती करण्यात आली आहे. अन्य दस्तापूर, नळदुर्ग, कळंब, ढोकी, वाशी, भूम, तुळजापूर आणि लोहारा इथल्या खरेदी केंद्रावर टेक्नीकल ग्रेडर नसल्यामुळे या ठिकाणी खरेदी बंद आहे. या खरेदी केंद्रांवर ग्रेडर नियुक्त करून तूर आणि हरभरा खरेदी तात्काळ सुरु करावी, अशी मागणी उस्मानाबादचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी महामंडळाकडे केली आहे. 
****
रमजानच्या काळात खरेदीसाठी गर्दी टाळण्यासाठी औरंगाबाद शहरात ३० ते ३५ ठिकाणी फळ केंद्रांची व्यवस्था करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. फळ केंद्राची यादी लवकरच जाहीर केली जाईल, तसंच त्यांच्या वेळाही प्रशासन निश्चित करेल, असं यावेळी सांगण्यात आलं.
****
परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर पोलीस स्थानकात कामानिमित्त आलेल्या एका इसमाची फिर्याद नोंदवून घेऊ नका असे सांगत पोलिस अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करणाऱ्या दाम्पत्याविरूद्ध जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सरकारी कामात अडथळा आणण्या सोबत विविध कलमान्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयानं या पती -पत्नीला गुरूवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
****
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी टाळेबंदी लागू झाल्यानं राज्यातल्या नाभिक बांधवाचा व्यवसाय बंद आहे. त्यामुळे  नाभिक समाजास आर्थिक मदत आणि जीनावश्यक वस्तू  देण्याच्या  मागणीचं निवेदन काल परभणी इथं महाराष्ट्र नाभिक महामंडळातर्फे  जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं.
****


No comments:

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 02 اکتوبر 2025‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 02 October-2025 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبر...