Wednesday, 15 April 2020

Text - AIR News Bulletin, Aurangabad 15.04.2020....Evening Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 15 April 2020

Time 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १५ एप्रिल २०२० सायंकाळी ६.००

****

·      लॉकडाऊनसंदर्भात नव्यानं जारी दिशानिर्देशांचं कठोर पालन करण्याची केंद्रीय गृहमंत्रालयाची सर्व राज्यसरकारांना सूचना.

·      देशातल्या सर्व जिल्ह्यांची हॉटस्पॉट, नॉनहॉटस्पॉट आणि ग्रीन झोन मध्ये विभागणी.

·      देशभरात कोरोनाबाधितांची संख्या ११ हजार ४३९; राज्यात दोन हजार ८०१ रुग्ण.

आणि

·      यंदा पावसाळा सामान्य; सरासरी एवढा पाऊस होण्याचा हवामान खात्याचा अंदाज.

****

कोरोना विषाणू प्रादुर्भावावर नियंत्रण आणण्यासाठी देशात लावलेल्या लॉकडाऊनच्या संदर्भात नव्यानं जारी करण्यात आलेल्या दिशानिर्देशांचं कठोर पालन व्हावं यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयानं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिलं आहे. केंद्रीय गृह सचिवांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात या दिशानिर्देशांची कडकपणे अंमलबजावणी करण्यास सांगितलं आहे, गरज असल्यास संबधित राज्यं आपल्या स्थानिक गरजेनुसार हे दिशानिर्देश आणखी कडक करू शकतात, असंही गृहमंत्रालयानं म्हटलं आहे. या सर्व दिशानिर्देशांचा प्रसार-प्रचार करण्यासही सर्व राज्यांना सूचित करण्यात आलं आहे.

दरम्यान, केंद्रीय कॅबिनेट सचिवांनी आज जारी केलेल्या दिशा निर्देशांच्या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांचे मुख्य सचिव आणि पोलिस महानिदेशकांसोबत दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून एक बैठक घेतली. या बैठकीत सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त या सर्वांनी सहभाग घेतला.



या दिशानिर्देशांमध्ये नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी काही व्यवहार सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. २० एप्रिल नंतर नियंत्रण क्षेत्रा बाहेरच्या भागात त्याची अंमलबजावणी सुरू होणार आहे. यात मालवाहतूक करणारी वाहनं, वीज दुरूस्ती कामगार, प्लंबर, मोटर मेकॅनिक यासारखे स्वयंरोजगार करणाऱ्या कामगारांना सूट देण्यात आली आहे. मनरेगाची कामं सुरक्षित अंतर ठेवून सुरू करण्यात येणार आहेत. तसंच कृषीशी संबधित काम सुरू रहाणार असून केंद्र सरकार आणि राज्य सरकारांची कार्यालयंही सुरू रहाणार आहेत. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यावर मनाई करण्यात आली असून मद्य, गुटखा यासारख्या वस्तुंच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी तसंच कार्यालयात अथवा सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. पाचपेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यावर बंदी असून कार्यालयात प्रत्येक शिफ्ट मध्ये एका तासाच अंतर ठेवणं बंधनकारक ठेवण्यात आलं आहे. कामगारांसाठी सॅनिटायझरची व्यवस्था आणि तापमोजणी करणं आवश्यक असल्याचंही सरकारनं जाहीर केलं आहे. 

****

केंद्र सरकारनं लॉकडाऊन काळात जनतेला पिण्याचं स्वच्छ आणि शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यासाठीही दिशा निर्देश दिले आहेत. पिण्याच्या पाण्याची कमतरता आहे त्या ठिकाणीही आवश्यक साधनांच्या माध्यमातून पाणी उपलब्ध करून देण्यास सांगण्यात आलं आहे. याशिवाय पाण्याच्या शुद्धतेसाठी क्लोरिनच्या गोळ्या किंवा ब्लिचिंग पावडरचा उपयोग करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

****

देशातल्या सर्व जिल्ह्यांची हॉटस्पॉट, नॉनहॉटस्पॉट आणि ग्रीन झोन मध्ये विभागणी करण्यात आली आहे. १७० जिल्हे हॉटस्पॉट तर २०७ जिल्हे नॉनहॉटस्पॉट म्हणून चिन्हित करण्यात आले आहेत. कोरोना विषाणूचा अधिक संसर्ग असलेले भाग निश्चित करण्यात आले असून, या भागात घरोघरी सर्वेक्षण केलं जाणार असल्याचं, केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. आज नवी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी ही माहिती दिली. कोरोनाविषाणू बाधितांच्या प्रमाणानुसार राज्यांना पीपीई किट्स स्वसंरक्षण साहित्य संच पुरवले जात असल्याचं अग्रवाल यांनी यावेळी सांगितलं. लॉकडाऊनच्या काळात मजूरांचं स्थलांतर होऊ शकणार नाही, असं यावेळी गृहमंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं. स्थलांतरित मजुरांसाठी मदत शिबीरांमधून व्यवस्था करण्यात आली असून, राज्यांच्या आवश्यकतेनुसार मदत पुरवली जाईल, असंही यावेळी सांगण्यात आलं.

जिल्हा पातळीवर आपत्ती निवारण योजना तयार करण्याचे निर्देश देण्यात आले असून, कोविड रुग्णालय, कोविड आरोग्य केंद्र तसंच दक्षता केंद्र स्थापन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातल्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्यासही सांगण्यात आलं आहे.

****

गेल्या चोवीस तासात एक हजार ७६ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, देशभरातली कोरोनाबाधितांची संख्या ११ हजार ४३९ रुग्ण झाली आहे. यापैकी ३७७ रुग्णांचा मृत्यू झाला असून, एक हजार ३६ रुग्ण पूर्ण बरे झाले आहेत.

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दोन हजार ८०१ झाली आहे. गेल्या चोवीस तासात राज्यभरात नवीन एकशे सतरा कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

****

लॉकडाऊन असतांनाही मुंबईहून उत्तर प्रदेश इथल्या आपल्या मूळ गावी जाण्याच्या प्रयत्न करत असलेल्या २५ स्थलांतरित कामगारांना आज सकाळी मुंबई पोलिसांनी पकडलं. हे सर्वजण एका छोट्या ट्रकमध्ये लपून बसले होते. मुंबईत रोजंदारीवर काम करणारे हे सर्व जण सांताक्रूज इथून उत्तरप्रदेशातल्या मूळ गावी जात होते. या सर्वांच्या जेवणाची सोय झाली होती मात्र तरीही निराश झाल्यामुळे त्यांना आपल्या मूळ गावी जायचं होतं असं पोलिसांनी सांगितलं.

****

यंदा पावसाळा सामान्य राहणार असून, सरासरी एवढा पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. आज दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी पहिला दीर्घकालीन अंदाज वर्तवताना ही माहिती दिली. यंदा नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन सुमारे आठवडाभरानं लांबणार असून, पुण्यात १० जूनला तर मुंबई ११ जूनला मोसमी पाऊस दाखल होण्याचा अंदाज आहे. पावसाच्या परत जाण्याचा कालावधीही सुमारे दहा दिवस लांबण्याची शक्यता असल्याचं यावेळी सांगण्यात आलं.

****

संपूर्ण देशात सरकारी संस्थांमार्फत गव्हाची खरेदी सुरू होत आहे. या वर्षी अवकाळी पाऊस आणि गारपिटीनंतरही देशात गव्हाचं विक्रमी उत्पादन झालं आहे, या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची विक्री होण्यासाठी सरकारी खरेदी संस्थांच्या मदतीची गरज आहे, यामुळे ग्राहक कल्याण मंत्री रामविलास पासवान यांनी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना गव्हाची खरेदी सुरू करण्यासाठी सर्व आवश्यक व्यवस्था करण्यास सांगितलं आहे.

****

कृषि मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी आज नवी दिल्लीत अखिल भारतीय कृषी परिवहन कॉल सेंटरचा प्रारंभ केला. नाशवंत वस्तुंना एका राज्यातून दुसऱ्या राज्यात नेण्यासाठी लॉकडाऊनच्या काळात या कॉल सेंटरचा उपयोग होणार आहे. १८०० १८० ४२०० आणि १४ ४८८ हे या कॉल सेंटरचे दूरध्वनी क्रमांक असून कोणत्याही वेळेस या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. यामुळे राज्यांना एकमेकांशी समन्वय साधणं सोपं होणार आहे.

****

कोरोना विषाणू संसर्गाच्या अनुषंगानं केंद्र सरकारच्या वतीनं प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत महिलांच्या जनधन खात्यात प्रत्येकी पाचशे रूपये आणि प्रधानमंत्री किसान योजने अंतर्गत प्रत्येकी दोन हजार रूपये रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येत आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या लाभार्थ्यांविषयीची माहिती अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक श्रीकांत कारेगावकर यांनी दिली आहे. ते म्हणाले -

जनधन योजनेच्या अंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यामध्ये एकूण सात लाख पस्तीस हजार महिलांची खाती आहेत. ज्या खात्याला प्रत्येकी पाचशे रूपये प्रमाणे केंद्र सरकारनं पैसे पाठवलेले आहेत एप्रिल महिन्याचे. आणि एका महिन्याला साधारण २७ कोटी रूपये रक्कम येत आहे.तीन महिने मिळून ऐंशी कोटी रक्कम जिल्ह्यामध्ये वितरीत होणार आहे. पीएम किसान योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रूपये प्रमाणे केंद्र सरकारनं पैसे पाठवलेले आहेत. ती रक्कमही या महिन्यामध्ये जमा झालेली आहे. त्याच्यामध्ये साडे तीन लाखांच्या वर Account PM Kisan Beneficiary चे आहेत.

****

नांदेड जिल्ह्याच्या भोकर तालुक्यात किनी इथल्या भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत ग्राहकांनी आज पैसे उचलण्यासाठी एकच गर्दी केली होती. सामाजिक अंतर पाळण्याच्या नियमाला खातेधारकांनी हरताळ फासल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. भोकर तालुक्यातलं किनी हे महाराष्ट्रातलं शेवटचं गाव असून, तेलंगणा राज्यातला निर्मल जिल्हा इथून जवळ आहे. हा जिल्हा कोरोना बाधीत रेड झोन मध्ये आहे, कोरोनाचे रूग्ण आढळलेलं तेलंगणातलंल म्हैसा हे गावही इथून जवळ असल्याचं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

जालना जिल्ह्यात भोकरदन इथं प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत मोफत तांदूळ वाटप सुरू आहे. केंद्रीय अन्न पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज या कामाची पाहणी केली.

****

लातूर जिल्ह्यातल्या औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी आपल्या मतदारसंघातल्या जनतेला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मदत करण्यासाठी आवाहन केलं होतं. या आवाहनाला प्रतिसाद देत औसा तालुक्यातील नांदुर्गा आणि माळकोंडजी इथल्या ग्रामस्थांनी प्रधानमंत्री सहायत्ता निधीसाठी ३२ हजार रूपयांची मदत केली.

****

नांदेड जिल्ह्यात हिमायतनगर तालुक्यात पवना गाव शिवारात दस्तगीर वाडी इथं काल रात्री २४ महिला पुरुष तेलंगणा राज्यातून आले आहेत. त्यांना आज सकाळी हिमायतनगर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेऊन विलगीकरणात ठेवलं आहे

****

कोरोनाग्रस्त हॉटस्पॉट जाहीर झालेली राज्यं किंवा जिल्ह्यातून प्रवास करून येणाऱ्या नागरिकांनी औरंगाबाद जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी पोलीस प्रशासनाची परवानगी घेणं अत्यावश्यक आहे. जिल्हाधिकारी उदय चौधरी आणि पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी याबाबत सूचना जारी केली आहे. विनाकारण अथवा भावनिक कारणे दाखवून परवानगी शिवाय प्रवेश करू इच्छिणाऱ्या लोकांवर बंदी घालण्यात येत आहे. खाजगी संसेच सरकारी रुग्णवाहिकेमधून येणारे रुग्ण अथवा चालक यांनी देखील संबंधित जिल्हा प्रशासनाची परवानगी घेणे अत्यावश्यक आहे

****

दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे प्रवर्तक कपिल वाधवान यांचा जामीन रद्द करण्याची मागणी अंमलबजावणी संचालनालय - ईडीने मुंबई उच्च न्यायालयाकडे केली आहे. कुख्यात गुंड इकबाल मिर्चीसोबत संशयास्पद आर्थिक व्यवहार केल्याप्रकरणी ईडीने वाधवान यांना जानेवारी महिन्यात अटक केली होती. त्यांना सत्र न्यायालयाकडून जामीन देण्यात आला आहे. कपिल वाधवान आणि त्यांचे कुटुंबीय लॉकडाऊनचा नियम मोडून महाबळेश्वरला आल्यानंतर त्यांना सध्या पाचगणीत विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. वाधवान यांनी जामीनाच्या नियमांचा भंग केल्याबद्दल त्यांचा जामीन रद्द करावा, असं या याचिकेत म्हटलं आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.05.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 01 June 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...