Sunday, 2 May 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 02 May 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 02 May 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २ मे २०२१ सायंकाळी ६.१०

****

कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. कोविड लसीची हिली मात्रा घेतलेल्या नागरिकांनी दुसरी मात्रा अवश्य घ्यावी, आणि १८ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी, नोंदणी करुन लसीकरण करुन घ्यावं. प्रत्येक नागरिकाने सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं. नाक आणि तोंडाला मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात वेळोवेळी साबणाने धुवावेत. हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा.

****

** पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे समाधान औताडे विजयी

** पश्चिम बंगाल, आसाम आणि केरळमध्ये सत्तारुढ पक्षांची सरसी; तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये सत्तारुढ पिछाडीवर

** औरंगाबाद इथं २७ तर जालना जिल्ह्यात आज १५ कोविड बाधितांचा मृत्यू

** उस्मानाबाद जिल्ह्यातल्या चार पोलिसांना ‘पोलीस महासंचालकांचं सन्मानचिन्ह’ जाहीर 

आणि

** मराठवाड्यात अनेक भागात अवकाळी पाऊस

****

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार समाधान औताडे यांनी त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे उमेदवार भगिरथ भालके यांच्यावर ३ हजार ७३३ मतांनी विजय मिळवला. मतमोजणीच्या ३८ व्या फेरी अखेर औताडे यांना १ लाख ९ हजार ४५० मतं तर भालके यांना १ लाख ५हजार ७१७ मतं मिळाली. या निवडणुकीत १९ उमेदवार रिंगणात होते, पण औताडे आणि भालके वगळता इतर उमेदवारांना एक हजार मतांचा टप्पा गाठणंही अवघड झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

चार राज्य आणि एका केंद्र शासित प्रदेशात सुरु असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीतील ताज्या स्थितीनुसार पश्चिम बंगाल, आसाम आणि केरळमध्ये सत्तारुढ पक्षांची सरसी होत असल्याचं दिसून येत आहे. मात्र तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये सत्तारुढ पक्ष पिछाडीवर दिसत आहेत. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने तीन जागांवर विजय मिळवला असून, २०६ जागांवर त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत. भाजपाने ८० जागांवर आघाडी घेतली आहे. तामिळनाडूमध्ये द्रविड मुनेत्र कळघमनं २३४ पैकी एक जागा जिंकली असून २२ जागांवर आघाडी मिळवली आहे. सत्तारुढ ऑल इंडिया अण्णा द्रविड मुनेत्र कळघमनं ८१ जागांवर, काँग्रेस १५, भाजपा तर भाकप आणि माकप प्रत्येकी २ जागांवर आघाडीवर आहे.

आसाममध्ये सत्तारुढ भाजप १२१ पैकी ५७ जागांवर आघाडीवर असून, काँग्रेस २८, तर आसाम गण परिषद ११ जागांवर आघाडीवर आहे.

केरळमध्ये १४० जागांपैकी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं चार जागांवर विजय मिळवला असून, ५३ जागांवर आघाडी मिळवली आहे. काँग्रेस पक्षानं २४ जागांवर तर भाकपनं १६ जागांवर आघाडी मिळवली आहे.

पुद्दुचेरीमध्ये ३० जागांपैकी ऑल इंडिया एन आर काँग्रेसनं पाच जागा जिंकल्या असून, तीन जागांवर आघाडी मिळवली आहे, तर भाजपनं तीन जागांवर विजय मिळवला आहे. काँग्रेसनं एका जागेवर विजय मिळवला असून, दोन जागांवर काँग्रेस उमेदवार आघाडीवर आहेत. 

****

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी पश्चिम बंगालमधल्या तृणमूल काँग्रेसच्या विजयाबद्दल पक्षाध्यक्ष तसंच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचं अभिनंदन केलं आहे. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीतल्या द्रविड मुनेत्र कळघमच्या उत्तम कामगिरीबद्दल पक्षाचे अध्यक्ष एम के स्टॅलिन यांचंही पवार यांनी अभिनंदन केलं आहे.

****

इथेनॉलचं उत्पादन वाढण्यासाठी केंद्र सरकारनं ऊसासोबतच आता भात आणि मक्याच्या वापरालाही परवानगी दिली आहे. तसंच, ऊसाचा रस, काकवी आणि मळीपासूनही थेनॉल निर्मितीची परवानगी दिली असून, कारखान्यांनी अतिरिक्त ऊस इथेनॉलसाठी वापरावा असंही सूचित करण्यात आलं आहे.

कृषी अर्थव्यवस्थेचा विकास, तसंच आयात इंधनावरचं अवलंबित्व कमी करण्याच्या उद्देशानं सरकारनं पेट्रोलमध्ये इथेनॉलचं प्रमाण येत्या २०२२ पर्यंत दहा टक्के तर, पुढे २०२५ पर्यंत वीस टक्के करण्याचं ठरवलं आहे.

****

कोविडवरील उपचारासाठीचं फ्रान्समधून पाठवलेलं २८ टन साहित्य आज भारतात दाखल झालं. यात रुग्णालयांसाठी ८ ऑक्सिजन जनरेटर आणि इतर वैद्यकीय उपकरणांचा समावेश आहे. ही मदत म्हणजे भारत-फ्रान्स मैत्रीचा पुरावा असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी म्हटलं आहे.

****

महाराष्ट्रात कोविड संसर्गाला आळा घालण्याच्या दृष्टीनं, अन्य ठिकाणाहून होणारा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश या दोन राज्यांना संवेदनशील उगमस्थान म्हणून घोषित करण्यात आलं आहे. राज्य सरकार तर्फे जारी एका आदेशात सदर माहिती देण्यात आली. या दोन राज्यातून येणाऱ्या प्रवाशांसाठी कोविड प्रतिबंधक नियमावली लागू असेल.

****

औरंगाबाद इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात आज २७ कोविड बाधितांचा मृत्यू झाला, मृतांमध्ये अहमदनगर जिल्ह्यातले ७, जालना दोन, तर बीड तसंच बुलडाणा जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका मृताचा समावेश आहे. उर्वरित १६ मृत औरंगाबाद जिल्ह्यातले असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

जालना जिल्ह्यात आज दिवसभरात १५ कोविड बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची संख्या आता ७९८ झाली आहे. दरम्यान, आज दिवसभरात ९३५ नवीन रुग्ण आढळून आले. जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता ४७ हजार ९५७ झाली आहे. उपचारानंतर कोरोना विषाणूमुक्त झालेल्या ७६४ रुग्णांना आज सुटी देण्यात आली. आजपर्यंत जिल्ह्यातले ४० हजार १२५ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. तर बाधित असलेल्या सात हजार ३४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

उस्मानाबाद जिल्हा पोलीस दलातल्या चौघांना ‘पोलीस महासंचालकांचं सन्मानचिन्ह’ जाहीर झालं आहे. यामध्ये संजय बाबर, शांताराम वाघमोडे, इजहार अहमद शेख, वाहेद गफुर मुल्ला या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. राज्य पोलीस दलातल्या कर्तव्यनिष्ठ, उत्तम-उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी-अंमलदारांना राज्य पोलीस महासंचालकांतर्फे पुरस्कृत केलं जातं. वर्ष २०२० साठी ७९९ पोलिस या सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रासाठी पात्र ठरले आहेत.

 ****

औरंगाबाद जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोविड संसर्ग रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत राबवण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांनी समाधान व्यक्त केलं आहे. आज औरंगाबाद इथं कोविड आढावा बैठकीनंतर ते बोलत होते. दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागातील संसर्गाचं प्रमाण वाढत असून, पोलिसांनी स्वत:च्या आरोग्याची काळजी घेत संचारबंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी खबदारीपूर्वक काम करण्याची सूचना देसाई यांनी केली. पोलिसांच्या कुटुंबियांच्या आरोग्य उपचार सुविधांची विशेष काळजी घेण्यात यावी. ऑक्सिजन साठा, औषधी, खाटांची उपलब्धता पोलिसांसाठी राखीव ठेवण्यात याव्यात तसेच पोलीस वसाहती अधिक सुविधांयुक्त करण्यासाठीच्या बाबींची पूर्तताही प्राधान्याने करावी, अशा सूचना देसाई यांनी केल्या.

****

मराठवाड्याच्या अनेक भागात आज अवकाळी पावसानं हजेरी लावली. नांदेड शहरात आज सलग दुसऱ्या दिवशी विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे वातावरणातील उष्णता कमी झाली आहे. शहरातल्या काही भागात विद्युत पुरवठा विस्कळीत झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

परभणी शहरासह जिल्ह्यात आज अवकाळी पावसानं हजेरी लावली. पालम, गंगाखेड, सोनपेठ तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे उन्हानं त्रस्त झालेल्या नागरिकांना काही काळ दिलासा मिळाला आहे.

****

हिंगोली जिल्ह्यात वसमत तसंच कळमनुरी तालुक्याच्या अनेक भागात विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळे आंबा, केळी, चिकू, पपई या फळबागांचं नुकसान झालं आहे.

****

जालना जिल्ह्यात अनेक भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. जिल्ह्याच्या अनेक भागात ढगाळ वातावरण आहे.

****

औरंगाबाद शहर परिसरातही आज सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या.

 

दरम्यान, मुंबईत नजिक अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं हवामानात आज बदल झाला आहे. उत्तरेकडून वाहणारे थंड वारे आणि बंगालच्या उपसागरावरून वाहणारे वारे यामुळे मध्य महाराष्ट्रात गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्याच्या फुलंब्री तालुक्यातल्या जानेफळ गावात ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांचं कोविड लसीकरण झालेलं आहे. गावचे सरपंच कृष्णा गावंडे यांच्या पुढाकारानं गावकऱ्यांची सर्वप्रथम कोरोना तपासणी करण्यात आली. यात एकाही व्यक्तीचा अहवाल बाधित आला नाही. यानंतर लसीकरण करण्यात आलं. या गावात आजपर्यंत एकही नागरिक कोरोना बाधित झालेला आढळलेला नाही.

****

औरंगाबाद जिल्ह्याच्या ग्रामीण भागात वाढत असलेल्या कोरोना बाधितांच्या पार्श्वभूमीवर मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी आज गंगापूर इथं उपजिल्हा रूग्णालयास भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. याठिकाणी आवश्यक ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची उपलब्धता तसंच रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्याच्या सूचन त्यांनी संबंधितांना दिल्या.

****

नांदेड जिल्ह्यात कंधार तालुक्याच्या गुंटूर शिवारात मिर्चीच्या शेतात लावलेली  गांजाची आठ झाडं पोलिसांनी छापा टाकून जप्त केली. या प्रकरणी कंधार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

//*********//

 

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 12.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 12 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...