Monday, 3 May 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 03 May 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 03 May 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३ मे २०२१ सायंकाळी ६.१०

****

कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. कोविड लसीची हिली मात्रा घेतलेल्या नागरिकांनी दुसरी मात्रा अवश्य घ्यावी, आणि १८ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी, नोंदणी करुन लसीकरण करुन घ्यावं. प्रत्येक नागरिकाने सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं. नाक आणि तोंडाला मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात वेळोवेळी साबणाने धुवावेत. हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा.

****

** कोविड -१९च्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी केंद्र सरकारचे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय,

** राष्‍ट्रीय पात्रता आणि प्रवेश पदव्युत्तर परीक्षा ३१ ऑगस्टपर्यंत स्‍थगित तर १०० दिवस कोविड व्यवस्थापन कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायम सरकारी नोकर भरतीच्यावेळी प्राधान्य देणार

** देशात कोविड मृत्यूदर एक टक्क्यांपर्यंत कमी झाल्याचा आरोग्य मंत्रालयाचा दावा

आणि

** औरंगाबाद जिल्ह्यात ३४ कोविड बाधितांचा मृत्यू तर बीड जिल्ह्यात एक हजार २५६ नवे बाधित रुग्ण

****

देशात कोविड -१९च्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध व्हावं यादृष्टीनं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. यामुळे कोविड रुग्णावर उपचार करण्यासाठी वैद्यकीय व्यावसायिकांची वाढ होण्यास मदत होणार आहे. बैठकीत राष्‍ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा- नीट पदव्युत्तर परीक्षा किमान चार हिने स्‍थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे कोविडच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्रशिक्षित डॉक्‍टर्सची उपलब्‍धता वाढेल. या वर्षी ही परीक्षा ३१ ऑगस्टपूर्वी होणार नाही. परीक्षेची तारीख घोषित केल्यानंतर विद्यार्थ्यांना तयारीसाठी किमान एक महिन्याचा कालावधी दिला जाईल.

वरिष्‍ठ डॉक्‍टर्स आणि प्राध्यापकांच्या निगराणीखाली वैद्यकीय आंतरवसिता करत असलेल्या विद्यार्थ्यांना कोविड व्यवस्थापनाच्या कामात सहभागी करुन घेण्यासही बैठकीत मान्यता देण्यात आली. दूरध्वनीवरुन सल्ला देण्यासाठी तसंच सौम्य लक्षण असलेल्या रुग्णांची देखरेख करण्याच्या कामामध्ये एम बी बी एसच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची सेवा घेण्यात येणार आहे. पदव्युत्तर वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यांची निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून घेण्यात येत असलेली सेवा कायम ठेवण्यात आली आहे. वरिष्‍ठ डॉक्‍टर्स आणि नर्सच्या मार्गदर्शनाखाली बी एस्सी, जनरल नर्सिंग और मिड वाइफरी नर्सची सेवा घेण्यासही मान्यता देण्यात आली. किमान १०० दिवस कोविड व्यवस्थापन कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आगामी कायम सरकारी नोकर भरतीच्यावेळी प्राधान्य दिलं जाईल. कोविड रुग्ण सेवा करणाऱ्या सर्व वैद्यकीय विद्यार्थी आणि व्यावसायिकांचं लसीकरण केलं जाईल तसंच त्यांना सरकारी विमा योजनेचा लाभ दिला जाईल. याशिवाय १०० दिवस कोविड व्यवस्थापन कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पंतप्रधान विशिष्‍ट कोविड राष्‍ट्रीय सेवा पुरस्कार दिला जाईल.

****

देशात कोविड मृत्यूदर हा एक टक्क्यांपर्यंत कमी झाला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिली. सध्या देशात १२ राज्यात एक लाखाहून अधिक तर ७ राज्यात ५० हजार ते एक लाखापर्यंत रुग्ण असल्याचं त्यांनी वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं. देशाच्या विविध भागांत रेल्वेमार्फत प्राणवायूचा पुरवठा केला जात आहे. यापुढे प्राणवायुच्या साठ्याजवळच कोविड रुग्णालय उभारणार असून प्राणवायुच्या उत्पादन आणि पुरवठ्यावर भर दिला जाणार आहे. देशात १४ नायट्रोजन प्रकल्प निवडले गेले असून त्याठिकाणी नियोजन करुन प्राणवायू बनवला जाणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. प्राणवायूचा काळाबाजार न करण्याचं आवाहनही त्यांनी नागरिकांना केलं आहे.

****

आकाशवाणीचे प्रख्यात इंग्रजी वृत्त निवेदक सुशील जावेरी यांचं आज गुजरातमध्ये अहमदाबाद इथं कोरोना विषाणू बाधेनं निधन झालं. ते ९० र्षांचे होते. बाधित आढळल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.

जवळपास चार दशक त्यांनी दिल्लीत आकाशवाणीच्या समाचार सेवा विभागात वृत्त निवेदनाचं काम केलं. स्पष्ट इंग्रजी च्चार आणि प्रभावशाली आवाजाची देणगी लाभलेले जावेरी यांनी आपलं प्रारंभिक शिक्षलंमध्ये घेतलं होतं. मेलविले डि मेलो यांच्या ऐतिहासिक प्रसारणपासून प्रेरित होऊन ते आकाशवाणीच्या सेवेत आले होते.

****

इंडियन प्रिमीअर लीग - पीएल क्रिकेट स्पर्धेत आज अहमदाबादमध्ये खेळला जाणारा कोलकाता नाइट राडर्स आणि रॉयल चैंलेजर्स बंगलोर दरम्यानचा सामना स्थगित करण्यात आला आहे. कोलकाता नाइट राडर्सचे दो खेळाडू कोरोना विषाणू संसर्ग बाधित आढळल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. या सामन्याची नवीन तारीख नंतर घोषित केली जाईल, असं संयोजकांनी सांगितलं.

****

जालना जिल्ह्यातल्या सात रस्त्यांच्या कामासाठी केंद्रीय मार्ग निधीतून शंभर कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज दिली. या कामांमध्ये जालना, भोकरदन, घनसावंगी, बदनापूर आणि परतूर तालुक्यातल्या दोन नवीन रस्त्यांसह पाच रस्त्यांच्या नूतनीकरण आणि देखभाल दुरुस्तीच्या कामांचा समावेश आहे. जिल्ह्यासाठी भरीव निधी मंजूर केल्याबद्दल दानवे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले आहेत.

****

हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव इथं संत नामदेव कृषी उत्पन्न बाजार समितीत आज जवळपास दोन हजार क्विंटल हळदीची आवक झाली. पंधरा दिवसाच्या बंद नंतर कृषी उत्पन्न बाजार समिती सुरू ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिल्यानं आज हळदीची आवक झाली असून सरासरी साडे सहा ते सात हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. खरीप हंगाम सुरू होत असल्यानं हळदीची आवक वाढली असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं.

****

औरंगाबाद शासकीय वैद्यकीय रुग्णालय घाटीत आज ३४ कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील २३, अहमदनगर सहा, जालना दोन आणि नाशिक, हिंगोली, बुलडाणा जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. औरंगाबाद जिल्ह्यात या विषाणू संसर्गानं आतापर्यंत दोन हजार ५८० रुग्ण दगावले आहेत. जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या एक लाख २६ हजार १७६ झाली असून अकरा हजार ७७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

बीड जिल्ह्यात आज एक हजार २५६ नवे कोविड बाधित रुग्ण आढळले. यामध्ये सर्वाधिक अंबाजोगाई २३७, त्याखालोखाल बीड २७९, केज १४३, परळी १२२, आष्टी १०१, माजलगाव ८८, पाटोदा ६५, धारुर ६४, गेवराई तसंच वडवणी प्रत्येकी  ५५ आणि शिरुर इथल्या ४७ जणांचा समावेश आहे.

****

औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात खासदार इम्तियाज़ जलील यांच्या वतीनं तीन रुग्णवाहिकांची मोफत सेवा आज सुरु करण्यात आली. या रुग्ण वाहिका सेवेचं उद्घाटन शासकीय वैद्यकिय रुग्णालयातील कोवीड केंद्रामध्ये अहोरात्र सेवा देणाऱ्या परिचारीका, वार्ड बॉय, सुरक्षा रक्षक यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर उपस्थित होत्या.

****

परभणी जिल्ह्यात कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं संपूर्ण जिल्ह्यात निर्बंध लागू केले असतांना देखील आज सकाळी शहरातील बाजारपेठांमध्ये नागरिकांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली. वसमत रस्त्यालगत तसंच मध्यवस्तीत नागरिकांनी केलेल्या गर्दीमुळं वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली. गंगाखेड इथल्या बाजारपेठेतही नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

परभणी जिल्ह्यात जिंतूर शहरातील तंत्रनिकेतन महाविद्यालयातील नवीन बांधकाम असलेल्या मुलींच्या वस्तीगृहात शंभर खाटांचं कोविड रूग्णालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून याबाबत जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्याकडे मागणी करण्यात आली होती. या प्रस्तावाला जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ मान्यता दिली असून जिल्हा शल्यचिकित्सक यांना संबंधित कोविड सुश्रूषा केंद्राला वैद्यकीय सेवा सुविधा पुरविण्याचे आदेश दिले आहेत.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात कोविड प्रतिबंधासाठी लागू असलेल्या संचारबंदीच्या काळात नियमांच उल्लंघन करणाऱ्या ८० दुकाने, विनामास्क फिरणाऱ्या  ३ हजार ३३१ नागरिक तसंच १ हजार १७७ आस्थापनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगांवकर यांनी दिली आहे. या प्रकरणी एकूण १५ लाख ६५ हजार ७८ रुपये दंड वसूल करण्यात आला. प्रशासनानं दिलेल्या सर्व नियमांचे तंतोतंत पालन करून प्रशासनास सहकार्य करावं असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केलं.

****

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी आज परभणी इथं जिल्हा सामान्य रूग्णालय तसंच जिल्हा परिषद इमारत इथं उभारण्यात आलेल्या कोविड केंद्राला भेट देऊन कोविड बाधित रूग्णांशी संवाद साधला. जिल्हा सामान्य रूग्णालयाला एका रूग्णवाहिकेची नितांत आवश्यकता असल्याचं निदर्शनास आल्यानंतर चव्हाण यांनी आमदार निधीतून दहा दिवसात रूग्णवाहिका उपलब्ध करुन देण्याचं आश्वासन दिलं.

//**********//

 

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 13.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 13 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...