Monday, 3 May 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 03.05.2021 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

 ०३ मे २०२ सकाळी ११.०० वाजता

****

चार राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम बंगाल, आसाम आणि केरळमध्ये सत्तारुढ पक्षांची सरशी तर, तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये सत्तारुढ पक्षांना पराभव स्वीकारावा लागला. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसनं स्पष्ट बहुमत मिळवत, सत्ता कायम राखली. तामिळनाडूमध्ये सत्तारुढ ऑल इंडिया अण्णा द्रविड मुनेत्र कळघम पक्षाला पराभव स्वीकारावा लागला. आसाममध्ये सत्तारुढ भाजपनं १२१ पैकी ६० जागा जिंकल्या. केरळमध्ये १४० जागांपैकी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं ६२ जागांवर विजय मिळवला.

****

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार समाधान अवताडे यांनी विजय मिळवला. अवताडे यांनी त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्यावर तीन हजार ७३३ मतांनी विजय मिळवला.

****

औरंगाबाद शहरात ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी महानगरपालिकेकडे सध्या लसींचा साठा उपलब्ध नाही, त्यामुळे ४५ वर्षांवरील नागरिकांचं आज लसीकरण होणार नाही. त्यांनी लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये, असं आवाहन मनपा आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी केलं आहे. तसंच १८ ते ४४ वर्षे वयोगटातल्या नागरिकांसाठी महानगरपालिकेच्या मुकुंदवाडी, सादात नगर आणि कैसर कॉलनी, या आरोग्य केंद्रांवर सकाळी दहा ते चार या वेळेत लसीकरण सुरू राहणार आहे.

****

नांदेड जिल्ह्यात कंधार तालुक्याच्या गुंटूर शिवारात मिर्चीच्या शेतात लावलेली गांजाची आठ झाडं पोलिसांनी छापा टाकून जप्त केली. याचं बाजार मूल्य एक लाख, पंधरा हजार रुपये नोंदवलं गेलं आहे. या प्रकरणी कंधार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

****

नांदेड जिल्ह्याच्या देगलूर-बिलोली विधानसभा मतदार संघातील काँग्रेसचे युवानेते जितेश अंतापूरकर यांची काल प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली.  जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी त्यांना काल याबाबतचं नियुक्तीपत्र प्रदान केलं.

****

मराठवाड्याच्या अनेक भागात काल अवकाळी पावसानं हजेरी लावली. यामध्ये विभागात सात जणांचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला. आजही मराठवाडा आणि विदर्भात गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 13.04.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 13 April 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छ...