आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०५ मे २०२१ सकाळी ११.०० वाजता
****
तृणमुल काँग्रेस पक्षाच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी आज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री
म्हणून शपथ घेतली. राज्यपाल जगदीप धानखर यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत तृणमुल काँग्रेसनं स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता
कायम राखली. ममता बॅनर्जी या तिसऱ्यांदा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान
झाल्या आहेत.
****
वनविभागाचे तत्कालिन प्रधान सचिव विकास खारगे यांच्या समितीच्या शिफारशी मान्य
करून, मोहफुलांवरील निर्बंध हटवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. मोहफुलांच्या
माध्यमातून आदिवासींचे सक्षमीकरण करणं शक्य होणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव
ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.
****
देशातल्या पहिल्या ‘ड्राईव्ह इन लसीकरण केंद्रा’चं काल मुंबईत खासदार राहुल शेवाळे
यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. दिव्यांग व्यक्तींना लसीकरण केंद्रात जाण्यास
अडचणी येत असताना या व्यक्तींना गाडीतून लसीकरण केंद्रावर आणून गाडीतच लस दिली जाते
आणि गाडीतून घरी सोडण्यात येतं.
****
कोरोनामुळे लागू केलेल्या निर्बंधाचा फटका राज्यातल्या पर्यटन व्यवसायाला बसला
असून, पर्यटन व्यवसायातली राज्याची दरमहा दीड ते दोन हजार कोटींची उलाढाल, ठप्प झाली
आहे. पर्यटनाशी निगडीत विविध घटकांच्या उपजीविकेवरही याचा परिणाम झाला आहे. या सर्व
घटकांच्या नुकसानीचं सर्वेक्षण करण्याचा निर्णय महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळानं
घेतला आहे.
****
नांदेड शहरात नियमभंग करणाऱ्या नऊ व्यापारी संस्थाकडून एकूण २१ हजार रुपयांचा दंड
वसूल करण्यात आला. परभणीतही १३ दुकानदारांकडून ५३ हजार रूपयांचा आणि विनामास्क फिरणाऱ्या
३७ नागरिकांकडून, सात हजार २०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आल्याचं, आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
****
सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातल्या अंत्योदय शिधापत्रिका धारकांसाठी
शासनाने एप्रिल, मे आणि जून २०२१ साठी नियमित नियतन साखर प्रति शिधापत्रिका एक किलो
याप्रमाणे मंजूर केलं आहे. सदर महिन्यात जिल्ह्यासाठी दोन हजार ३४ क्विंटलचे नियतन
शासनाकडून प्राप्त झालं आहे.
****
No comments:
Post a Comment