आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०७ मे २०२१ सकाळी ११.०० वाजता
****
भारतात आतापर्यंत कोरोना प्रतिबंधक लसीच्या १६ कोटी ४९ लाख ७३ हजार ५८ मात्रा देण्यात
आल्या आहेत. काल दिवसभरात २३ लाख ७० हजार २९८ जणांना लस देण्यात आली, यामध्ये १८ ते
४४ या वयोगटातल्या दोन लाख ६२ हजारांहून अधिक जणांचा समावेश आहे.
****
द्रविड मुनेत्र कळघम पक्षाचे नेते एम. के. स्टॅलिन यांनी आज तामिळनाडूच्या मुख्यमंत्री
पदाची शपथ घेतली. राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ
दिली. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत द्रमुक पक्षानं स्पष्ट बहुमत मिळवलं आहे.
दरम्यान, अभिनेते कमल हसन यांनी स्थापन केलेल्या मक्कल निधी मय्यम या पक्षाच्या
उपाध्यक्षांसह आठ वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. विधानसभा
निवडणुकीत या पक्षाचा मोठा पराभव झाला.
****
राज्यात ज्याठिकाणी कोविड बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे, असा सर्व ठिकाणी पूर्ण
आणि कठोर टाळेबंदी लावण्याचा विचार करावा, अशी सूचना मुंबई उच्च न्यायालयानं राज्य
सरकारला केली आहे. कोविड १९ संबंधित दाखल विविध याचिकांवर काल मुख्य न्यायाधीश दिपांकर
दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीष कुलकर्णी यांच्या खंडपीठाकडे सुनावणी झाली, त्यावेळी न्यायालयानं
ही सूचना दिली.
****
३० जून पर्यंत राज्यातल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई न करण्याचे आदेश मुंबई उच्च
न्यायालयानं विविध महानगरपालिका, नगरपरिषदा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले आहेत.
यापूर्वी ही मुदत सात मे पर्यंत होती. राज्यातला कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव
पाहता तूर्तास कोणालाही बेघर करणं योग्य नाही, असं न्यायालयानं म्हटलं आहे.
****
परभणी इथल्या जिल्हा शासकीय रुग्णालयातल्या कोविड केंद्रांच्या प्राणवायू प्रकल्पामध्ये
गळतीच्यावेळी मोठी समय सूचकता, धाडस दाखवून प्राणवायूची गळती रोखल्याबद्दल अभियंता
सुनील कुलकर्णी यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार फौजिया खान यांनी कौतूक
केलं आहे. कुलकर्णी यांच्या निवासस्थानी खान यांनी काल भेट दिली.
****
१८ ते ४४ वयोगटातल्या नागरिकांच्या पहिल्या डोससाठी औरंगाबाद महानगरपालिकेच्या
आरोग्य विभागानं शहरात सहा आरोग्य केंद्रावर सुविधा सुरु केली आहे. लसीकरणासाठी कोविन
वेबपोर्टलवर नोंदणी करण्याचं आवाहन आरोग्य विभागानं केलं आहे.
****
No comments:
Post a Comment